अंकोरवाट मंदिराऐवजी आता हे भारतातलं मंदिर जगातलं सर्वात मोठं मंदिर असेल…

जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर आहे कुठे आहे? असा प्रश्न तुम्हाला केला तर त्याचं उत्तर तुम्ही काय द्याल? असेल भारतातच कुठेतरी, नाहीतर स्पेसिफिकली साऊथमध्ये असेल, तर काही जण उत्तर देतील कंबोडिया मधील अंकोरवाट हे जगातील सगळ्यात मोठे हिंदू मंदिर आहे.

अंकोरवाट हे जगातील सगळ्यात मोठे हिंदू मंदिर आहेच. सोबतच ते जगातील सगळ्यात मोठे धार्मिक स्थळ सुद्धा आहे. हे मंदिर तब्बल ४०० एकर जमिनीवर बांधलेले आहे.

पण आता यात बदल होणार आहे कारण जगातील सगळ्यात मोठे हिंदू मंदिर भारतातच बांधले जाणार आहे.

सगळ्यांना इस्कॉनबद्दल माहीत असेलच. आता इस्कॉन म्हटल्यावर कोरीव दगडांनी बांधलेले आणि संगमवरी फरशा असलेले भव्य दिव्य मंदिर आठवणार नाहीत असं होणार नाही. तर आता इस्कॉनकडून भारतातच जगातील सगळ्यात मोठ्या मंदिराचं बांधकाम करण्यात येत आहे.

तर इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा कॉन्शिअस म्हणजेच इस्कॉनचे मुख्यालय भारतातील पश्चिम बंगालच्या मायापुरमध्ये आहे. त्यामुळे इस्कॉन जगभरातील भव्य दिव्य मंदिरांप्रमाणेच मायापुरमध्ये सुद्धा एक भव्य मंदिर बांधत आहे. ज्याचं बांधकाम २०१० मध्ये सुरु करण्यात आलं होतं. परंतु लॉकडाऊनच्या काळात बांधकाम करायला उशीर झाल्यामुळे या मंदिराचं उदघाटन २०२४ मध्ये होणार आहे.

इस्कॉनचं मुख्यालय असलेल्या या मंदिराचं नाव असेल टेम्पल ऑफ वैदिक प्लॅनिटोरियम.

टेम्पल ऑफ वैदिक प्लॅनिटोरियम हे जगातील सगळ्यात मोठ्या अंकोरवाट मंदिरापेक्षा तर मोठं आहेच सोबतच या मंदिराचा घुमट हा ताजमहालपेक्षा सुद्धा मोठा आहे. हे मंदिर इस्कॉनच्या बाकी मंदिरांपेक्षा वेगळ्या धाटणीचं आहे. या मंदिराची निर्मिती अमेरिकेच्या कॅपिटॉल हिल्सप्रमाणे करण्यात आलीय.

कॅपिटॉल हिल्सच्या प्रेरणेमुळे या मंदिरावर कळसाऐवजी घुमट आहे. तसेच या मंदिराचा रंग बाकी मंदिरांप्रमाणे गुलाबी नसून पांढरा आहे तर घुमटाचा रंग निळा आहे. हे मंदिर तब्बल ११३ मीटर उंच असेल आणि या मंदिराच्या निर्मितीसाठी एकूण १०० मिलियन डॉलर खर्च केले जात आहेत.   

या मंदिराची निर्मिती आता होत असली तरी याची संकल्पना मात्र जुनी आहे.

भक्तवेदांत स्वामी श्रीला प्रभुपदा यांनी १९६६ मध्ये अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात इस्कॉनची स्थापना केली होती. इस्कॉनची स्थापना केल्यांनतर अल्पकाळातच १९७७ मध्ये त्यांचे निधन झाले. परंतु मृत्यूपूर्वीच १९७६ मध्ये त्यांनी या मंदिराची संकल्पना मांडली होती. त्यांनी ही संकल्पना त्यांचे अमेरिकन अनुयायी विशाखा माता आणि यदूबरा प्रभू यांना सांगितली होती.

या दोन अनुयायांना आपली संकल्पना सांगितल्यानंतर त्यांनी आपले तिसरे अनुयायी अंबरीश प्रभू यांना या मंदिरासाठी निधी देण्याची आज्ञा केली होती. अंबरीश प्रभू हे फोर्ड कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचे पणतू आहेत. ते एक व्यावसायिक सुद्धा होते. त्यामुळे त्यांनी या मंदिरासाठी तब्बल ३० मिलियन डॉलर दान केले होते.

श्रीकृष्णाच्या उपदेशांवर आधारलेल्या इस्कॉनमध्ये श्रीकृष्णाची भक्ती केली जाते. श्रीकृष्णाने सांगितलेल्या तत्वज्ञानाला प्रमाण मानले जाते.  

श्री कृष्णाने सांगितलेली सृष्टी निर्मितीची संकल्पना या मंदिराच्या माध्यमातून सगळ्यांना समजावून सांगण्यात येणार आहे. 

हे मंदिर प्रामुख्याने एक प्लॅनेटोरियम आहे. भागवत पुराणात सृष्टीचे वर्णन सांगितले आहे. त्या वर्णनात सृष्टी कायम फिरत असते. त्यामुळे या मंदिराचा घुमट स्थिर न राहता तो कायम फिरत राहणारा असेल.

हे मंदिर बहुमजली आहे. या मंदिराच्या प्रत्येक मजल्यावर तब्बल १० हजार भक्तांच्या राहण्याची जागा आहे. इस्कॉनच्या सिद्धांतानुसार भक्तांनी कृष्णाच्या भक्तीत सदैव तल्लीन राहावं असं मानलं जातं त्यामुळे ही व्यवस्था करण्यात आलीय.

या मंदिराच्या निर्मितीमुळे जगातील सगळ्यात मोठ्या हिंदू मंदिराचा किताब आता कंबोडियाच्या अंकोरवाट या विष्णू मंदिराऐवजी टेम्पल ऑफ वैदिक प्लॅनिटोरियमला मिळणार आहे. त्यामुळे भारतातील महत्वाच्या वास्तूंमध्ये या मंदिरांचा समावेश होईल. इस्कॉनचे अनुयायी हे संपूर्ण जगात आहेत. ते या मंदिरात यात्रेसाठी आल्यावर भारतातील पर्यटनात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल हे नक्की.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.