शेतकऱ्यांसाठी लंगर आयोजित केल्यामुळं अनिवासी भारतीयाला शिक्षा झालिये

भारतातले शेतकरी केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात ऑगस्ट २०२० पासून आंदोलन करत आहेत. सुरुवातीला शांतता मार्गानं सुरू असलेल्या या आंदोलनाला अनेकदा हिंसक वळणही लागलेलं आहे. या आंदोलना संबंधी रोज वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतात. अशीच एक बातमी नुकतीच समोर आलिये.

ती म्हणजे एका अनिवासी भारतीयाला शेतकऱ्यांसाठी लंगर आयोजित केल्यामुळे विमानतळावरूनच अमेरिकेला परत पाठवण्यात आलं आहे.

नक्की विषय काय झालाय?

अमेरिकास्थित ७१ वर्षीय दर्शनसिंग धालीवाल यांना २३-२४ ऑक्टोबरच्या रात्री दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अमेरिकेला परत पाठवण्यात आलं. त्यांचे बंधू आणि पंजाबचे माजी मंत्री सुरजितसिंग राखरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, धालीवाल यांना दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लंगर आयोजित केल्याबद्दल शिक्षा म्हणून परत पाठवण्यात आलं.

आता हे दर्शनसिंग धालीवाल कोण आहेत?

दर्शनसिंग हे मूळचे पटीयाळा जवळच्या राखरा गावचे. ते १९७२ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी अमेरिकेतल्या मिलवॉकी शहरात स्थलांतरित झाले. तिकडे मेकॅनिकल इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर, काही काळ त्यांनी कामचलाऊ नोकऱ्या केल्या. त्यानंतर त्यांनी गॅस स्टेशन आणि पेट्रोल पंपच्या बिझनेसमध्ये उडी घेतली. आता अमेरिकेतल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यांचे पंप आणि गॅस स्टेशन आहेत.

त्यांचे धाकटे बंधू सुरजितसिंग राखरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, धालीवाल यांनी मिलवॉकी इथं त्यांनी स्वखर्चानं महात्मा गांधींचा पुतळा बसवला आहे. तिथल्या फुटबॉल ग्राऊंड आणि विद्यापिठासाठी देणगीही दिली आहे. सोबतच २००४ मध्ये तमिळनाडूतल्या त्सुनामीग्रस्त नागरिकांसाठी मदत सामुग्री आणि आरोग्य कर्मचार्‍यांची टीमही पाठवली होती.

मग धालीवाल यांना भारतातून परत का पाठवलं?

राखरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘विमानतळ प्राधिकरणानं धालीवाल यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मदत करणं थांबवण्यास सांगितलं. धालीवाल फक्त सीमेवर लंगर आयोजित करत होते. ते २३ ऑक्टोबरच्या संध्याकाळी फ्लाइटनं दिल्लीत आले. त्यानंतर, त्यांची ५-६ तास चौकशी केली आणि त्याच फ्लाइटनं अमेरिकेला परत पाठवण्यात आलं.’

गेल्या वर्षभरात धालीवाल चार वेळा भारतात आले, प्रत्येकवेळी त्यांची तास-दोन तास कसून चौकशी करण्यात आली. याआधीही ते भारतात यायचे मात्र तेव्हा त्यांची अशी चौकशी कधीच झाली नव्हती.आमचं कुटुंब शिरोमणी अकाली दलाचं समर्थन करतं, पण धालीवाल यांनी भारतात कधीच कोणत्याही राजकीय कार्यात भाग घेतला नाही, असं सुरजितसिंग राखरा यांचं म्हणणं आहे.

आता या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करावा अशी मागणी पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी केली आहे. गेले काही महिने सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर अजूनही तोडगा निघालेला नाही आणि आता धालीवाल यांना परत पाठवल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.