राज ठाकरेंवर ‘ब्रिजभूषण’ ट्रॅप शरद पवारांनी लावला का..? क्रोनॉलॉजी काय सांगते..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजी होणारा नियोजित अयोध्या दौरा स्थगित झाला..

का..?

अनेक तर्क-वितर्क लावले गेले…

मात्र युपीचे खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे हा दौरा थांबवावा झाला असं म्हटलं गेलं.

२२ मेला राज ठाकरेंची पुण्यात सभा झाली आणि भर सभेत त्यांनी सांगितलं की,

माझ्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणं हा एक सापळा होता, त्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजेच २३ मे रोजी मनसे नेत्यांनी काही जुने फोटो पोस्ट केले आणि या सगळ्या प्रकरणात एकच खळबळ उडाली. हे फोटो आहेत..

ब्रिजभूषण शरणसिंह आणि शरद पवार यांचे. बाजूलाच सुप्रिया सुळे देखील दिसतायेत.

या ‘फोटो बॉम्ब’मुळे आता अशी चर्चा आहे की, ब्रिजभूषण’ ट्रॅपमागे पवारांचा अदृष्य होता का..?  राज ठाकरे म्हणतायेत तसं ब्रिजभूषण यांना महाराष्ट्रातून रसद पुरवली का ? सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू…

पहिला मुद्दा हा फोटो कुठला आहे ? 

मनसे नेत्यांनी शेअर केलेल्या फोटोत राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणारे खासदार ब्रिजभूषण सिंग आणि खासदार शरद पवार-सुप्रिया सुळे एकत्र पाहायला मिळतायत. 

अशी माहिती मिळतेय की हा फोटो २०१८ साली मावळमध्ये झालेल्या एका कार्यक्रमातील आहेत.  सन्मान लाल मातीचा, बहुमान मावळवासियांचा, असं या फोटोतील बॅनरवर लिहिलेलं दिसत आहे. बृजभूषण सिंह हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय कुस्ती महासंघांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तर शरद पवार हे राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत.

थोडक्यात हा फोटो एका कुस्ती स्पर्धेतील असल्याचं दिसतंय…

आता या फोटोचं- राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांचं आणि शरद पवारांचं कनेक्शन कसं लावलं जातंय यासाठी क्रोनॉलॉजी समजून घ्या…

तुम्हाला आठवत असेल तर २०१८ मध्ये शरद पवारांच्या पंचाहत्तरीचा सोहळा चालू होता. तेंव्हा राज ठाकरे म्हणाले होते कि, महाराष्ट्रात कुठलीही घटना असो, त्यात बहुदा पवार साहेबांचा हात असतोच असतो..राज्याच्या राजकारणात जे काही चालू असतं त्यात पवारांचा अदृश्य हात कुठे असेल हे सांगता येत नाही…

आता २०१८ मध्ये राज ठाकरे काय बोलले हे सांगण्याचं प्रयोजन म्हणजे राज ठाकरेंच्या गेल्या काही काळातील पवारांच्या थेट विरोधातील भूमिका… 

अलीकडच्या राज ठाकरेंच्या काही सभा पाहिल्यास त्यांचा रोख जेवढा महाविकास आघाडीवर होता त्याहीपेक्षा जास्त शरद पवारांच्या विरोधात होता. राष्ट्रवादीने, शरद पवारांनी काय केलं याबद्दल बोलत होते. गेल्या ४ सभांमध्ये राज ठाकरेंच्या भाषणात राज ठाकरे यांचा रोख शरद पवारच्या विरोधात होता.

  • २ एप्रिल पाडव्यानिमित्त झालेल्या सभेत राज ठाकरेंनी, “शरद पवारांना जातीयवाद हवा आहे. यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलं, राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीवाद वाढला, जातीय वाद पेटवला. असा आरोप राज ठाकरेंनी केलेला.  
  • दुसऱ्या सभेत म्हणजेच, १३ एप्रिल ला ठाण्यातल्या उत्तर सभेत पुन्हा राज ठाकरेंनी पवारांवर आरोप केले कि, पवारसाहेब देववगैरे काही मानत नाहीत ते नास्तिक आहेत. संभाजी ब्रिगेड वैगेरे या संघटना राष्ट्रवादीनंच काढल्यात. ते बाबासाहेब पुरंदरेंना टार्गेट करतात. छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर मुसलमान मतं गेली तर काय करायचं.. म्हणून पवार छत्रपतींचं नाव घेत नाही असाही गंभीर आरोप त्यांनी केलेला.
  • तिसऱ्या सभेत म्हणजेच १ मे रोजी औरंगाबादेत पुन्हा राज ठाकरेंनी अशी टीका केली कि, शरद पवारांना हिंदू शब्दांचीच ॲलर्जी आहे,  महाराष्ट्रात शरद पवारांवर जातीय तेढ निर्माण केला यावर मी ठाम आहे. पवार हे शिवाजी महाराजांबद्दल बोलत आहेत. अठरा पगड जाती महाराष्ट्रासाठी झटत होत्या. पण, आज महाराष्ट्र जातीत सडतोय, असे म्हणत राष्ट्रवादीनेच जातीवाद पेरल्याचा आरोप त्यांनी केलेला.

याचदरम्यान त्यांनी १७ एप्रिलला अयोध्या दौरा घोषित केला.

दौरा जाहीर होताच भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला कडाडून विरोध केला. राज ठाकरे -ब्रिजभूषण सिंह या दोन्ही नेत्यांमधला संघर्ष वाढतच चालला होता. आणि तितक्यात राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केला.  

  • यानंतर पुण्यात २२ मे ला सभा झाली. त्या भाषणात राज ठाकरे म्हणतात की,  माझा अयोध्या दौरा काही जणांना खुपला. त्यासाठी विरोधाचा सापळा रचला गेला. तसेच त्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली जात होती, त्यामुळे अयोध्येला न जाण्याचा निर्णय घेतला,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित करण्यामागील भूमिका स्पष्ट केली होती.  

म्हणजेच त्यांचा रोख शरद पवारांवर होता असं म्हणलं जातंय. 

कारण त्यात मनसेकडून फोटो पोस्ट करून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणाऱ्या विरोधामागे पवारांचा हात होता, असं अधोरेखित करण्याचा प्रयत्न सुरुय. तेच दुसरीकडे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द होण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे की,

“राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला बृजभूषण सिंह यांनी विरोध केला. ते भाजपाचे खासदार आहेत, राष्ट्रवादीचे नाही. असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे.  मग अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे ब्रिजभूषण सिंह आणि शरद पवारांचा यांचा काय संबंध आहे ?”

या सर्व चर्चांवर शरद पवारांची अजून तरी प्रतिक्रिया आलेली नाहीये मात्र बृजभूषण सिंह यांनी हिंदी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

त्यांनी हा फोटो ३ वर्षांपूर्वीचा कुस्तीच्या कार्यक्रमाचा असल्याच सांगितलय दुसरीकडे ब्रिजभूषण सिंग यांनी शरद पवार यांच्यासोबत आपले संबंधअसल्याची जाहीर कबुली दिली.मला शरद पवारांना भेटायचे असेल तर आम्ही लपुनछपून भेटणार नाही.  ते आजही मला भेटले तर मी त्यांच्या पायाही पडेन, वो बडे दिलवाले है..राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडून काही गोष्टी शिकाव्यात, असा सल्लाही बृजभूषण सिंह देतात.

आता या सगळ्या राजकारणावर ज्येष्ठ पत्रकार तसेच राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांच्याशी बोल भिडूने चर्चा केली असता, त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली कि,  

राज ठाकरे म्हणतात महाराष्ट्रातून रसद पुरवली पण कुणी पुरवली याबद्दल त्यांनी सांगितलंच नाही. त्यानंतर त्यांचा रोख देवेंद्र फडणवीसांकडे असावा अशीही चर्चा झाली. मग तो रोख राष्ट्रवादीकडे वळवण्यासाठी जुने फोटो उकरून व्हायरल केले जातायेत. पण याला फारसा अर्थ नाही. कारण स्वतः ब्रिजभूषण सिंह यांनी स्पष्ट केलंय कि, मी भाजपचा खासदार आहे आणि मी जे काही केलं ते माझ्या पक्षासाठी केलं आहे”. 

“ब्रिजभूषण सिंह यांना हाताशी धरून शरद पवारांनी राज ठाकरेंना टार्गेट केलं असावं का ? असा जो प्रश्न निर्माण केला गेला तो मनसेचा बालिशपणा आहे.  कारण सलग ६ वेळेस खासदार म्हणून निवडून आलेला भाजपचा नेता एका दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांचं ऐकायला काय राजकारणात नवखा आहे का?

कितीही संबंध चांगले असले तरीही दुसऱ्या एका नेत्याने फूस लावल्यावर त्याला बळी पडणाऱ्या नेत्यांपैकी तो नाहीये. ब्रिजभूषण सिंह हे राजकारणातले वस्ताद आहेत. त्यांची समजूत भाजपचे ज्येष्ठ नेते काढू शकले नाहीत ते शरद पवारांचं कसं ऐकतील ? मनसेने जे प्रयत्न चालवले आहेत त्यातून ते स्वतःचं हसं करून घेतायेत. आणि हे अगदी पहिल्या सभेपासून चालू आहे”,

असं मत विजय चोरमारे यांनी व्यक्त केलं आहे.

हि सगळी क्रोनॉलॉजी पाहता आणि मनसेने चालू केलेलं राजकारण पाहता राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणाऱ्या विरोधामागे खरंच शरद पवार असावेत का..? या प्रश्नाची चर्चा राजकीय वर्तुळात चालूच आहे…

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.