हा कलाकार राजकारणात गेला आणि त्याने आंध्र प्रदेश येथील काँग्रेसची सत्ता उलथून लावली

हल्लीच बिहार येथील निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. अनेक जणं राहुल गांधी यांच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवत आहेत. कारणं अनेक असतील. काँग्रेसला अनेक ठिकाणी स्वतःचा हक्काचा बालेकिल्ला सोडून पराभव पत्करावा लागला.

ही गोष्ट १९८३ ची. सिनेसृष्टी गाजवणारा एक अभिनेता राजकारणात प्रवेश करतो काय, आल्या आल्या तो काँग्रेसची सत्ता उलथून लावतो काय.. आंध्र प्रदेश मध्ये त्यावर्षी वेगाने घटना घडत गेल्या. या सर्व घटनांच्या मुळाशी आहे एक व्यक्ती.

ती व्यक्ती म्हणजे नंदामुरी तारका रामाराव.

आजही ते हयात नसले तरी आंध्र प्रदेश मध्ये नंदामुरी अर्थात NTR यांची मोठी छाप आहे.

राजकारणात येणाआधी NTR यांनी तेलगू सिनेसृष्टी गाजवली होती. त्यांचा जन्म २८ मे १९२३ रोजी झाला. पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर सब रजिस्ट्रार म्हणून NTR यांनी मद्रास सेवा आयोगात नोकरी पत्करली. नोकरी जरी करत असले तरी अभिनय क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याचं स्वप्न होतं. म्हणून तीन आठवड्यात त्यांनी नोकरी सोडली.

१९४९ साली ‘मना देसम’ या सिनेमातून त्यांनी तेलगू सिनेसृष्टीत अभिनेता म्हणून पदार्पण केले. २ वर्षानंतर १९५१ साली आलेल्या ‘पाठला भैरवी’ या सिनेमात त्यांनी अभिनय केला. हा सिनेमा प्रचंड गाजला. आजही तेलगू मधील अजरामर सिनेमा म्हणून या सिनेमाकडे पाहिले जाते.

या सिनेमामुळे एक उत्तम अभिनेता म्हणून त्यांना ओळख मिळाली. तीन दशकं अभिनय केलेल्या NTR यांनी अनेक पौराणिक सिनेमात काम केलं.

खुपवेळेस भगवान विष्णू आणि भोलेनाथ शंकराची भूमिका ते करायचे. त्यांनी तब्बल १७ सिनेमांमध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारली आहे. कदाचित भगवान श्रीकृष्णाची चतुराई त्यांना राजकारणात उपयोगी पडली असावी. १९८२ पर्यंत त्यांनी ३०० सिनेमांमध्ये काम केले.

सिनेमात यशस्वी असलेल्या NTR यांनी आंध्र प्रदेशला काँग्रेस राजवटीतून मुक्त करावे, या उद्देशाने TDP म्हणजेच ‘तेलगू देसम पार्टी’ची स्थापना केली. १९८३ साली झालेल्या निवडणुकीत जोरदार प्रचाराच्या जोरावर आंध्र प्रदेशमध्ये NTR यांची हवा झाली.

राजकारणाच्या इतिहासात सर्वप्रथम त्यांनी रथयात्रेचा उपयोग केला.

एक कलाकार असल्याची वेगळी ओळख NTR यांना राजकारणात उपयोगी पडली. या सर्व गोष्टींचा अपेक्षित परिणाम झाला. १९८३ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत २९४ पैकी १९९ जागांवर TDP ने विजयाचा झेंडा रोवला. NTR यांचा उद्देश सफल झाला.

त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अशाप्रकारे NTR यांच्या रूपाने आंध्र प्रदेश ला पहिला बिन काँग्रेसी मुख्यमंत्री लाभला.

दोन वर्षांनंतर बायपास सर्जरी साठी NTR यांना परदेशात जाणे भाग होते. त्यांच्या गैरहजेरीत तत्कालीन राज्यपाल राम लाल यांनी अर्थमंत्री असलेल्या नदेंडला भास्करा यांची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली.

मुख्यमंत्री पद पुन्हा मिळवण्यासाठी NTR यांनी निवडणूक प्रचारासाठी वापरलेल्या रणनीतीचा पुन्हा उपयोग केला. ही रणनीती म्हणजे चैतन्य रथ. संपूर्ण राज्यात त्यांनी या रथ यात्रेचं आयोजन केले. वाढत जाणाऱ्या राजकीय गोंधळामुळे इंदिरा गांधी सरकारने इच्छा नसताना लाल यांच्या जागी शंकर दयाल शर्मा यांना नेमणूक केली.

शर्मांनी पुढे NTR यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर नियुक्त केले.

NTR यांनी त्यांच्या कार्यकालात शाळांमध्ये मध्यान्ह भोजन कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच राज्यातील सर्व भागांमध्ये दारूबंदी घोषित केली. दारूची दुकानं देशाच्या अर्थव्यस्थेला हातभार लावतात.

NTR यांनी दारूबंदी जाहीर केल्याने त्यांच्या पक्षाची लोकप्रियता वाढली मात्र राज्याचा अर्थव्यवस्थेला याचा फटका बसला. १९८४ साली इंदिरा गांधी यांची हत्या झाली. यानंतर राजीव गांधी यांनी काँग्रेसची सूत्र हाती घेतली.

१९८५ सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला देशात अनेक जागांवर विजय मिळवता आला. अपवाद फक्त आंध्र प्रदेशचा.

येथे पुन्हा एकदा NTR यांच्या TDP ने यश मिळवले. यामुळे NTR दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री पदाचा हा संपूर्ण कार्यकाल NTR यांनी अनुभवला. पुढच्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

१९९४ साली डाव्या पक्षांशी युती करून TDP पुन्हा सत्तेत आली आणि NTR मुख्यमंत्री झाले. आपलीच माणसं आपल्या पाठीत वार करतात, तसचं काहीसं NTR बाबतीत झालं. त्यांचा जावई एन. चंद्राबाबू नायडूच्या मनात काहीतरी वेगळे सुरू होते. NTR यांची दुसरी पत्नी पक्षाची सूत्रं हाती घेईल या भीतीने एन. चंद्राबाबू नायडू यांनी कुटुंबाशी फारकत घेतली NTR यांना मुख्यमंत्री पदावरून हटवले. अखेर कौटुंबिक कलह टोकला जाऊन एन. चंद्राबाबू नायडू यांनी NTR यांचं मुख्यमंत्री पद काढून घेतलं.

यामुळे NTR यांना मोठा धक्का बसला. ९ महिन्यानंतर जावईबापू चंद्राबाबूने NTR यांना सरकार आणि पार्टी मधून बाजूला केले.

लक्ष्मी पार्वथी सोबत मिळून राज्यभर दौरे केल्यानंतरही NTR यांना TDP चा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही.

आंध्र प्रदेशच्या राजकारणात जवळपास १० पेक्षा जास्त वर्ष सक्रिय असणाऱ्या NTR यांचं १९९६ साली हृदय बंद पडल्याने निधन झालं. परंतु त्यांच्या दुसऱ्या पत्नीने त्यांच्या अस्थींचं विसर्जन केले नाही.

ज्या व्यक्तीमुळे NTR यांना मनस्ताप सहन करावा लागला, त्या एन. चंद्राबाबू नायडू यांचा निवडणुकीत पराभव झाल्याशिवाय अस्थी विसर्जन करणार नाही, असं लक्ष्मी पार्वथी यांनी ठरवलं होतं.

अखेर ८ वर्षांनंतर विधानसभा निवडणुकीत एन. चंद्राबाबू नायडू यांचा पराभव झाला, तेव्हा लक्ष्मी पार्वथी यांनी पती NTR यांच्या अस्थींचे विसर्जन केले.

एकूणच सिनेसृष्टी गाजवणाऱ्या NTR यांनी आंध्र प्रदेश मधील राजकारणाचा सत्तापालट केला. हाडाचा कलाकार असलेल्या NTR यांना राजकारणातले डावपेच ओळखणं कदाचित जमलं नसेल, पण TDP स्थापन केल्यानंतर आंध्र प्रदेश मध्ये अनेक वर्ष सत्ता उपभोगत असलेल्या काँग्रेसला धूळ चारण्याचं श्रेय NTR यांना दिलं पाहिजे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.