नुपूर शर्मा प्रकरणावरून देशभरातला मुस्लीम समाज ठिकठिकाणी रस्त्यांवर उतरला आहे

राज्याच्या मीडियामध्ये सकाळपासून फक्त राज्यसभा निवडणुकांचं वारं वाहत आहे. आता दिवसभर यातून काही सुटका नाही, असाच अंदाज घेऊन सर्व चालत होते. मात्र दुपार होताच एकाएकी हे चित्र बदलल्याचं दिसलं. अचानक या बातमीला चिरत गोंधळाचा आवाज माध्यमांमध्ये गुंजायला सुरुवात झाली.

झालं काय?

गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांबाबतीत वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं. त्यावरून कानपूरमध्ये मोठा दंगा झाला. नंतर हा विषय देशभर आणि देशाच्या बाहेर देखील पोहोचला. रोज यात काही ना काही नवीन घडतंच आहे. 

मुस्लिम समाजाच्या भावनांना दुखावणारा हा मुद्दा देशभर हळूहळू पेट घेताना दिसत होतात. त्याचाच आज मोठा स्फोट झाला. देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील लोक रस्त्यावर उतरले आणि नुपूर शर्मांचा विरोध करत त्यांनी गोंधळ करायला सुरुवात केली. त्यांना सांभाळणं पोलिसांना अवघड होऊन गेलं. 

कोणकोणत्या राज्यात दंगे झाले? त्यांचं स्वरूप कसं राहिलं? बघूया… 

सुरुवातीला बातमी आली ‘दिल्ली’वरून…

दिल्लीतील जामा मशिदीत जुमेच्या नमाज पठणासाठी सुमारे १,५०० लोक जमले होते. प्रार्थनेनंतर त्यातील सुमारे ३०० लोक बाहेर आले आणि त्यांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदला यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा निषेध करण्यास सुरुवात केली.  नुपूर शर्मा यांना अटक करण्याची मागणी ते करू लागले. 

त्यावेळी मशिदीच्या शाही इमामांनी सांगितलं की, आंदोलक कोण आहेत हे आम्हाला माहीत नाही, मात्र ते एआयएमआयएमचे आहेत की ओवेसींच्या लोकांचे आहेत, असं वाटतं. त्यांना विरोध करायचा असेल तर ते करू शकतात, पण मशीद समितीकडून निषेधाचे आवाहन करण्यात आलं नव्हतं.

पोलिसांनी १० ते १५ मिनिटांत त्यांच्यावर नियंत्रण मिळवलं. या लोकांनी विनापरवानगी आंदोलन केल्याने त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये देखील जुमेच्या नमाजानंतर पैगंबरांवरील वादग्रस्त विधानावरून निदर्शनं झाली. याशिवाय यूपीतील प्रयागराजमध्येही लोकांनी नमाज अदा केल्यानंतर आंदोलन केलं. तर प्रयागराजमधील खुलदाबाद पोलीस स्टेशन परिसरातील अटाला भागात मुस्लिम समुदायाकडून दगडफेकही करण्यात आली. पीएसीचा ट्रक देखील उडवला. 

भीम आर्मीचे प्रमुख सतपाल तन्वर यांनी नुपुर शर्मा यांची जीभ कापणाऱ्याला एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. तर लखनऊ, देवबंद,  मुरादाबाद, बाराबंकी, उन्नाव भागातही निदर्शने करण्यात आली होती.

ज्यानंतर पोलिसांनी कडक कारवाई करत लोकांना घटनास्थळावरून हटवलं. यावेळी त्यांना लाठीमार करावा लागला. इथली संवेदनशीलता बघून पोलिसांनी १४४ लागू केलं आहे. 

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालच्या कोलकाता सहित हावडामध्ये लोकांनी प्रदर्शनं करण्यास सुरुवात केली. इथे कालपासून वातावरण तापलेलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आवाहन करूनही लोक ऐकायला तयार नव्हते. हावडाच्या उलुबेरिया, पांचला, ६ नंबर राष्ट्रीय महामार्ग आणि पिरताला भागात  मुस्लीम समाजातील लोकांनी रस्ते अडवले. जाळपोळ करून वाहतूक बंद करण्यात आली.

यात पोलिसांची वाहनं आणि बुथ यांचाही समावेश होता. आंदोलकांना हटवण्यासाठी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर दगडफेक आणि बॉम्बफेक करण्यात आली. गोळीबाराचे आरोपही झाले आहेत. तेव्हा बचावासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कलम १४४ लागू केलं आहे.

पंजाब

पंजाबमधील शाही इमाम मौलाना मोहम्मद उस्मान रहमानी लुधियानवी यांच्या आवाहनानंतर, १०० हुन जास्त ठिकाणी प्रदर्शने करण्यात आली. लुधियानातील ऐतिहासिक जामा मशिदीसमोर जुमेच्या नमाजानंतर मजलिस अहरार इस्लाम हिंदतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या पुतळ्याचं दहन देखील करण्यात आलं.

या आंदोलनादरम्यान शहापूर रोडवर बॅरिकेडिंग करत पोलिसांनी काही काळ वाहतूक थांबवली. आंदोलन संपताच पोलिसांनी वाहतूक खुली केली.

WhatsApp Image 2022 06 10 at 7.53.19 PM

कर्नाटक

कर्नाटकच्या बेळगावातील फोर्ट रोडवरील मशिदीजवळ काही लोकांनी नुपूर शर्मा यांचा पुतळा विजेच्या तारेला लटकवला. मात्र, पालिका अधिकाऱ्यांसह पोलिसांनी तातडीने हा पुतळा तिथून हटवला. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात लोकांविरूद्ध समुदायांमधील शत्रुत्व भडकावणे आणि सामाजिक शांतता भंग करणे, या कलमांअंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. 

झारखंड 

झारखंडमधील रांची इथेही निदर्शने करण्यात आली. बघता बघता आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. आंदोलनादरम्यान हिंसक जमावाने विरोध करताना वाहनांना आग लावली. तोडफोड करत दगडफेकही केली. तर रस्त्यावर गोळीबार झाल्याचंही सांगितलं जातंय. परिस्थिती थोडी तणावपूर्ण असून सध्या ती नियंत्रणात आहे, असं पोलिसांनी सांगितलं. 

मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आलं. रांची जिल्हा प्रशासनाने शहरातील हिंसाचारग्रस्त भागात संचारबंदी लागू केली असून लोकांना घरीच राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

जम्मू काश्मीर

जम्मूकाश्मीरच्या श्रीनगर भागासहित काही ठिकाणी प्रदर्शनं करण्यात आली. यावेळी घोषणाबाजी केली गेली. ज्यामध्ये पैगंबरांचा अपमान करण्याऱ्या व्यक्तीचं शीर कापून आणण्याचं देखील बोललं गेलं.

तेलंगणा

तेलंगणातही आंदोलकांनी नमाज पठणानंतर हिंसाचार केला. राजधानी हैदराबादमधील मक्का मशिदीबाहेर ही निदर्शने करण्यात आली. नंतर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना दूर केलं. त्यानंतर या भागात पोलिस दल आणि सीआरपीएफ यांना तैनात करण्यात आलं. 

बिहार 

बिहारमध्येही ठिकठिकाणी आंदोलन झालं. नवादा इथल्या सद्भावना चौक पाटणा रांची रोडजवळ लोकांतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. प्रशासनाने शांत राहण्याचं आवाहन करूनही लोक ऐकत नव्हते. पाटणा-रांची रोड पूर्णपणे जाम करून लोक आंदोलन करू लागले. भागलपूर, मुजफ्फरपूर आणि भोजपूरमध्येही निदर्शने सुरु झाली.

मात्र इथलं वातावरण बऱ्यापैकी शांत राहिलं.

यामध्ये महाराष्ट्राने देखील नंबर लावला…

महाराष्ट्रात नवी मुंबई, पनवेल, सोलापूर, औरंगाबाद, जालना अशा अनेक शहरांमध्ये आंदोलनं झाली आहेत. मात्र, अजूनतरी इथून हिंसाचार झाल्याचं वृत्त नाही. मात्र या निदर्शनात महिला आणि लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.

अशाप्रकारे देशभरातील १० पेक्षा जास्त शहरांत आज नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त मुद्यावरून दंगे झाले. एकाएकी हे सर्व चित्र तयार झालं आणि त्यातही नमाजानंतर अशी प्रदर्शने झाली, यातून साम्य दिसून आलं. त्यामुळे आता नक्की यामागे कोण असणार? याचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरु केला आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.