नूरजहाँ यांचं गायनाच्या क्षेत्रातलं श्रेष्ठत्व दस्तूरखुद्द लता दीदींनीही मानलं होतं

भारताला अनेक दिग्गज कलाकार लाभले आहेत. त्यांचं कौशल्य आणि त्यांची महानता संपूर्ण जगाने स्वीकरली आहे. त्यातच भारतीय संगीताचं काय म्हणणं! भारताच्या संगीताने तर जगभराला वेड लावलंय. हे संगीत ग्लोबली पोहोचवण्यामध्ये संगीतकारांप्रमाणे गायकांचाही मोठा वाटा आहे. मोहम्मद रफी, किशोर कुमार, आशा भोसले अशा कित्येक गायकांचं नाव यात येईल. यातील भारतरत्न आणि गाण कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकरांचं नुकतंच निधन झालंय.

लता मंगेशकरांच्या तोडीचं कुणीच नाही असं नेहमीच बोलल्या जातं. मात्र लतादीदींबद्दल एक फॅक्ट म्हणजे, त्यांचं आणि एका गायिकेची नेहमीच तुलना केली जाते. ही गायिका म्हणजे ‘नूरजहाँ’. यांची तुलना नेहमी केली जात असली तरी त्यातील एक सत्य हे देखील आहे की खुद्द लता मंगेशकरांनी नूरजहाँ यांचं श्रेष्ठत्व मान्य केलं होतं. तरीही ही तुलना होते, हा विषय वेगळा.

कोण होत्या नूरजहाँ?

नूरजहाँ यांची आजची ओळख ‘पाकिस्तानी गायिका’ म्हणून ओळख आहे. मात्र खरं तर त्या ‘हिंदुस्थानच्या’ गायिका होत्या. म्हणजेच त्या काळातील त्या गायिका होत्या जेव्हा भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्र तयार झालेली नव्हती आणि देश ‘एक’ होता, म्हणजेच हिंदुस्थान होता. मात्र फाळणीनंतर त्या पाकिस्तानला शिफ्ट झाल्या कारण त्यांची जन्मभूमी फाळणीत पाकिस्तानच्या हद्दीत गेली होती.

लाहोरपासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर एक ठिकाण आहे ‘कसूर’ म्हणून. हीच त्यांची जन्मभूमी. २१ सप्टेंबर १९२६ ला एका अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मात्र त्यांचं जन्मतःच नाव नूरजहाँ असं नव्हतं. तर ते होतं ‘अल्लाह वसाई’. त्यांचं कुटुंब गाणं गाऊन आपली उपजीविका भगवायचं. अशातच दीवान सरदारी लाल यांनी त्यांची प्रतिभा ओळखली आणि अल्लाह वसाई यांना घेऊन कोलकात्याला आले.

कोलकात्यात दीवान सरदारी लाल यांनी एका थिएटरमध्ये पैसे लावले होते, म्हणून तिथे काम करण्यासाठी ते अल्लाह वसाई यांना घेऊन आले. इथूनच त्यांची कला क्षेत्रातील वाटचाल सुरु झाली. तेव्हा कलाक्षेत्रात नाव बदलण्याची परंपरा होती. त्यानुसार अल्लाह वसाई देखील ‘नूरजहाँ’ बनल्या.

त्यांना पहिला ब्रेक मिळाला तो १९३५ मध्ये आलेल्या ‘गॅबी गोला’ या चित्रपटातून. तेव्हा त्या फक्त ९ वर्षांच्या होत्या. तेव्हाच हिंदुस्तानाला त्यांच्या आवाजाची जादू कळाली. इतक्या अप्रतिम गळ्याची मुलगी कोण? हे बघायला सिनेक्षेत्रातले दिग्गज येऊ लागले. जेव्हा त्यांची भेट नूरजहाँ सोबत व्हायची तेव्हा त्यांच्या आवाजाचे फॅन त्यांच्या सौंदर्याला देखील भुलायचे, असं त्यांचं सौंदर्य होतं. म्हणूनच तर दुसऱ्याच वर्षी म्हणजेच १९३६ मध्ये आलेल्या ‘शीला’ चित्रपटात त्यांना अभिनयाची संधी देखील मिळाली. यात त्यांनी पहिल्यांदा गायनासोबत अभिनयही केला.

त्यांचं गाणं ऐकून त्यांना लगेच खुपसाऱ्या चित्रपटांच्या ऑफर यायला सुरुवात झाली. त्यांनी ‘इजिप्त का सितारा’, ‘फखरे इस्लाम’, ‘दहशतवादी’, ‘सजनी’ आणि ‘रेड सिग्नल’ यांसारख्या चित्रपटांमध्येही आपल्या गायकीची कमाल तर दाखवलीच, मात्र त्यानंतर अतिशय सुंदर चेहरा आणि कमाल आवाजही त्यांनी अनेक चित्रपटांत आजमावला. ‘ससुराल’, ‘उमीद’, ‘चांदनी’, ‘धीरज’, ‘फरियाद’ आणि ‘दुहाई’ अशा अनेक चित्रपटांचा त्यात समावेश आहे.

मग आलं ते वर्ष जेव्हा संगीत निर्मिती क्षेत्रातील बाप माणूस म्हणून ओळखले जाणारे ‘संगीतकार गुलाम हैदर’ यांच्याशी त्यांची भेट झाली. १९४२ चं ते साल. गुलाम हैदर यांनी ‘खानदान’ चित्रपटातून नूरजहाँच्या आवाजाचा देशभरात डंका वाजवला. हो, हे गुलाम हैदर म्हणजेच लता दीदींचे गुरु, त्यांनीच लता दीदींना घडवलं. खानदानची सर्वच गाणी तुफान गाजली.

खानदान त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासाठी महत्त्वाचा ब्रेक तर ठरलाच मात्र इथेच त्यांच्या वयक्तिक आयुष्याला नवीन वळण मिळालं. खानदान चित्रपटाचे दिग्दर्शक ‘शौकत हुसैन रिझवी’ त्यांच्या जवळ आले. आणि लग्न करून ते आयुष्यभराचे साथीदार झाले.

१९४२ मुळे १९४३ मध्ये नूरजहाँ यांचीच धमाल होती. संगीत दिग्दर्शक के दत्ता, सज्जाद हुसैन आणि गायक-अभिनेता सुरेंद्र यांची साथ त्यांना मिळाली. त्यानंतर आलं १९४५ साल. यावर्षी त्यांचे चार चित्रपट प्रदर्शित झाले आणि चारही चित्रपट हिट ठरले. ‘जीनत’ या चित्रपटाने तर चांगलीच खळबळ उडवून दिली. या चित्रपटात एक कव्वालीही होती, ती म्हणजे ‘आहें न भरी शिकवे न किये’. यामध्ये गायिका कल्याणी आणि जोहराबाई अंबाले याही नूरजहाँसोबत होत्या. तिघींची मिळून लोकांच्या हृदयात या कव्वालीबद्दल विशेष स्थान निर्माण केलं.

श्याम सुंदर हे तिसरे संगीतकार होते ज्यांनी नूरजहाँला यशाच्या उंचीवर नेलं. मग १९४६ साल जे त्यांच्या आयुष्यातील संस्मरणीय वर्ष ठरलं. कारण यावर्षी त्यांना महान संगीत दिग्दर्शक ‘नौशाद साहेब’ यांची साथ मिळाली. तो चित्रपट होता ‘अनमोल घडी’. चित्रपटाच्या नावाप्रमाणे ही संधी नूरजहाँसाठी खरोखर अनमोल ठरलो. या चित्रपटातील गाण्यांनी सर्व रेकॉर्ड तोडून टाकले.

मग आलं १९४७ चं साल ज्याने हिंदुस्तानच्या गायिकेला पाकिस्तानची गायिका बनवलं.

१९४७ साली फाळणीनंतर त्या त्यांचे पती शौकत हुसैन रिझवी यांच्यासोबत पाकिस्तानात गेल्या. तिथे गेल्यावर त्यांनी ‘शाहनूर’ स्टुडिओची उभारणी केली. भारतात घेतलेल्या अनुभवाचा त्यांना इथे फायदा झाला. त्यांनी पंजाबी चित्रपट ‘चनवे’चं दिग्दर्शन केलं आणि अशा पद्धतीने ‘पाकिस्तानच्या पहिल्या महिला दिग्दर्शक’ झाल्या.

चित्रपट, गाणी यांच्यासाहित त्यांची ‘प्रेम प्रकरणं’ देखील पाकिस्तानात खूप गाजली. 

असं म्हणतात यादरम्यान त्या चित्रपट वितरक ‘एम नसीम’ यांच्या जवळ गेल्याने त्यांच्या पतीने त्यांना घटस्फोट दिला. नंतर त्यांचे काही चित्रपट अयशस्वी राहिल्याने एम नसीम देखील दूर झाले. मग त्यांनी त्यांच्यापेक्षा १४ वर्ष लहान असलेल्या ‘एजाज दुर्रानी’ या अभिनेत्याशी लग्न केलं. काही वर्षांनी एका मुलाखतीत त्यांना जेव्हा विचारण्यात आलं होतं, “असे किती अफेअर्स झाले असतील?” तर त्यांनी मोजून उत्तर दिलं होतं “नाही नाही म्हणत १६ झालेत” आणि स्वतःच आश्चर्यचकित झाल्या होत्या.

१९६१ मध्ये आलेल्या ‘गालिब’ चित्रपटानंतर त्यांनी अभिनय करणं सोडलं. मात्र त्यांनी गाणं कधीच नाही सोडलं. त्यांचं म्हणणं होतं, ‘संगीत त्यांच्यासाठी श्वास घेण्यासारखं आहे’. त्यांच्या संगीत क्षेत्रातील कार्याला बघूनच ‘मलिका-ए-तरनुम्म’ हा बहुमान त्यांना  मिळाला होता. त्यांनी प्रसिद्ध शायर ‘फैज अहमद फैज’ यांची कविता ‘मुझसे पहली सी मुहब्बत मेरे महबूब न मांग’ जेव्हा गेली तेव्हा स्वतः फैज यांनी देखील मान्य केलं होतं की नूरजहाँ शिवाय त्याला कुणीच न्याय देऊ शकलं नसतं.

पुढे शौकत हुसैन यांच्यासोबत त्यांना झालेल्या मुलीची कस्टडी घेण्यासाठी त्यांना ‘शाहनूर’ स्टुडियोची मालकी देखील सोडावी लागली.

अशा या नूरजहाँ आणि लता मंगेशकर यांच्यात पाकिस्तान आणि भारतात चाहत्यांकडून नेहमीच तुलना केली जाते. मात्र एकदा स्वतः लता मंगेशकर म्हणाल्या होत्या की, त्या देखील नूरजहाँ यांना आयडियल मानतात. त्यांना अनेकदा लता दीदींनी गाताना बघितल्याने त्या अजून छान गाऊ शकल्या.

त्यांच्या विशिष्ट अशा गायकीत जितकी विविधता होती तितकी त्या काळातील गायकांमध्ये सापडणं दुर्मिळ होतं. त्यांना आरोह-अवरोह यासाठी तालमीची गरज नव्हती, इतकं सहज ते त्यांना जमायचं. त्यांच्या आवाजात वेगळंच माधुर्य आणि रस होता जो लोकांना आकर्षित आणि मोहीत करायचा. त्याला सोबत होती ती त्यांच्या सौंदर्याची. त्यांची एक झलक बघायला मिळावी, म्हणून लोक खूप प्रयत्न करायचे.

मात्र एक गोष्ट अशी की पाकिस्तानात गेल्यानंतर त्या फक्त पंजाबी गाणे गाण्यापर्यंत मर्यादित राहिल्या. त्यांना वेगवेगळ्या भाषेचे, शैलीचे गाण्याची संधी मिळाली नाही. वर्षातून अवघडपणे त्या फक्त २-३ चित्रपटांत गाऊ शकत होत्या. तर लता मंगेशकर यांना सगळ्या भाषेतील संगीत दिग्दर्शकांची साथ मिळाली. त्या वर्षभरात अनेक गाणी गायच्या, सगळे वेगवेगळ्या भाषेतले, शैलीतले.

अनेक संगीतकारांचं म्हणणं आहे की, नूरजहाँ आणि लता बनल्याचं होत्या फक्त संगीतासाठी, गाण्यासाठी! त्या दोघींमध्ये जरी अजूनही तुलना होत असली तरी एक सत्य आहे जे अजरामर आहे ते म्हणजे, लता दीदी आणि नूरजहाँ नेहमी एकमेकींच्या प्रशंसक राहिल्या, एकमेकींचा आदर करत राहिल्या, एकमेकींना प्रोत्साहित करत राहिल्या.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.