नुसरत गातही नव्हता तेव्हा त्याला वडिलांचा कव्वालीचा वारसा सोपवण्यात आला

काली काली जुल्फो के फंदे ना डालो, हमें जिंदा रेहने दो ए हुस्नवालो…..

इंस्टाग्रामवर या गाण्याचे लाखोंमध्ये रिल्स बनवले गेले आहेत. हे गाणं गाणाऱ्या गायकाचे फॅन्स फक्त भारत आणि पाकिस्तानातच नाही तर जगभरात आहेत. कव्वालीचा शेहनशाह असलेले नुसरत फतेह अली खान. रात्र जशी जशी गडद होत जाते तसा तसा नुसरत समजू लागतो म्हणतात. पण नुसरत ज्यावेळी गायकी करण्याच्या मूडमध्ये नव्हता तेव्हाची हि गोष्ट.

मूळचे भारतीय असलेले नुसरत फतेह अली खान फाळणीमुळॆ पाकिस्तानात स्थलांतरित झाले. घरात कव्वाली आणि गायनाचं वातावरण पिढ्यांपासून चालत आलेलं. वडील फतेह अली खान, काका मुबारक अली खान आणि सलामत अली खान यांचा पेशाचं गायनाचा होता. आता याचा परिणाम साहजिकपणे नुसरतवर होऊ लागला. भाऊ फारूक अली खान आणि नुसरतला हार्मोनियम वाजवणे, कव्वाली गाणे शिकवलं जाऊ लागलं. 

पण नुसरतला या सगळ्यांचा वैताग यायचा. वडीलधारी मंडळी नुसरतला आणि त्याच्या भावाला चॉकलेटचं आमिष दाखवून तालमीला बोलवायचे आणि गाणी गायला लावायचे. पण नुसरतचं गाण्यात मन लागत नसे. नुसरतच्या वडिलांची इच्छा होती कि आपला मुलगा डॉक्टर वा इंजिनिअर व्हावा पण खंडणी ओळख असलेली कव्वाली गाणं त्याने सोडू नये. नुसरत गाण्याच्या नावावर निव्वळ टाईमपास करत असायचा.

१९६४ साली फतेह अली खान यांचं निधन झालं आणि सगळ्यांना धक्का बसला. आता गायकीची गादी कोण चालवणार यावर प्रशचिन्ह उभे राहिले. नुसरतचे काका असलेल्या मंडळींचं वय झालं होतं त्यामुळे खानदानी ओळख असलेला पेशा संपुष्टात येण्याची चिन्ह दिसू लागली होती. शेवटी हि जबाबदारी नुसरतवर सोपवण्यात आली. पण नुसरतला मुख्य पद देण्यावरही मोठा राडा झाला. 

ज्यावेळी दस्तारबंदी म्हणजे कव्वाली ग्रुपचं प्रमुखपद नुसरतला देण्याची घोषणा झाली तेव्हा तिथल्या काही लोकांनी यावर आक्षेप घेतला कि कव्वालीचं प्रमुखपद देताय खरं पण याला अगोदर काहीतरी गाऊन दाखवायला हवं. नुसरतला काहीच गायला येत नव्हतं. न गाताही नुसरतची दस्तारबंदी झाली.

वडिलांच्या मृत्यूच्या चाळीस दिवसांनंतर नुसरतने पहिल्यांदा कव्वाली गायली आणि उपस्थित लोकांची मने जिंकली. वडिलांच्या मृत्यूचा आणि अपमानाचा मोठा घाव नुसरतच्या मनावर झाला होता. यानंतर धार्मिक स्थळांवर जाऊन नुसरत गाऊ लागला. घरी कव्वालीचा रियाज आणि अभ्यास सुरु केला, यामुळे हळूहळू छोटेखानी कार्यक्रम मिळू लागले.

ज्यावेळी शेवटचे काका मुबारक यांचं निधन झालं तेव्हा सगळी जबाबदारी नुसरतवर आली. अत्यंत यशस्वीरीत्या नुसरतने आपली कव्वाल पार्टी पुढे चालवली. दुसऱ्या शहरांमधून त्याच्या कव्वालीला फर्माईश येऊ लागल्या. एकसे बढकर एक शेर शायरी, रागदारी यामुळे नुसरत भरपूर प्रसिद्ध झाला. भाऊ फारूकसुद्धा या कव्वाली ग्रुपमध्ये हार्मोनियम वाजवायला साथ करू लागला. 

१९८५ साली युनायटेड किंगडमच्या दौऱ्यामुळे नुसरत जगभरात लोकांचा आवडता गायक बनला. फक्त भारत पाकिस्तानच नाही तर कॅनडा, युरोप आणि अमेरिकासारख्या देशांमधून दौऱ्याची मागणी नुसरतला केली जाऊ लागली. हॉलीवूडचा ग्रेटेस्ट म्युझिक कम्पोजर मायकल ब्रुकसोबत नाईट सॉंग नावाचा अल्बम नुसरतने केला, आणि तो प्रचंड हिट झाला. यात गिटार आणि हार्मोनियमची जुगलबंदी चांगलीच गाजली.

हैराण हो इस बात पे के तुम कौन हो क्या हो, हात आओ तो बुद्ध वरना खुदा हो…

तुम्हे दिल्लगी भूल जानी पडेगी….मेरा पिया घर आया…..सानू एक पल चेन ना आवे…अशा अनेक लिजेंडरी गाण्याची रचना नुसरत फतेह अली खान यांनी केली. बॉलीवूडने तर अनेक गाणी वापरली.

आजही तरुण पिढी आणि नाईन्टीजची पिढी यांना जोडणारा दुवा म्हणून नुसरतला ओळखलं जातं. देश आणि धर्म यांच्यापलीकडेही कलाकाराचं नातं असतं सांगणारा नुसरत नावाचा कव्वाल शेहेनशाह १६ ऑगस्ट १९९७ रोजी आपल्यातून निघून गेला. पण जगभरात रिमिक्स गाणी, नेटफ्लिक्सच्या दणदणाटात नुसरत ऐकणारी पब्लिक ग्रेटच म्हणावी लागेल…..

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.