जमीनदार घरातील महिला जेव्हा ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरते.

शहरातील चकचकीत रस्त्यावर पांढरीफेट चारचाकी पळवणारी महिला अनेकांना वरचढ वाटते. पण, गावाकडे अगदी डोंगर कपारीत शेतीसाठी सहावारी साडीत जीप आणि ट्रॅक्टर वाहने चालवणारी महिला मात्र आजही आम्हाला दुय्यम वाटते. पण, कोणतेही काम कमी दर्जाचे नसते. तर काम आणि मेहनतच आपला दर्जा वाढवते अशा एका वहिनींना आज जाणून घेऊया..

साताऱ्यातील रेठरे बुद्रुक गावच्या नूतन मोहिते या ‘आदर्श शेतकरी’ म्हणून ओळखल्या जातात. याच परिसरातील आबासाहेब मोहिते या जमीनदार कुटुंबातील नूतन मोहिते. कर्नाटकातील नागरमुणोळी हे त्यांचं माहेर. लग्नानंतर सुरुवातीची काही वर्षे सुखात गेलीही,

पण एक दिवस सुखवस्तू कुटुंबातील या सुनेवर मळ्यात जाऊन शेतातील काम करण्याची वेळ आली.

त्यानंतर गेली ३५ वर्षे त्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत आहेत. हळदी आणि ऊसाची शेती सोबत ५० ते ६० जनावरे यांचा सांभाळ करणाऱ्या नूतन वहिनी यांना अनेक पुरस्कारानी गौरवण्यात आले आहे.

गावात कधीही घराबाहेर न पडणाऱ्या नूतन वहिनी जेव्हा शेतीसाठी जीप आणि ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरतात तेव्हा अनेक लोक अवाक होऊन केवळ पाहत राहतात. आणि हा बदल आता नाही तर २२ वर्षापूर्वीचा आहे. आणि त्या केवळ ट्रॅक्टर नाही तर बैलगाडीही तितक्याच ताकदीने पळवतात.

नूतन वाहिणींची मुले ५ वर्षाची असताना त्या मुलांना घेऊन शेतात जायच्या. पहाटे ५ वाजता जेव्हा शेताला पाणी पाजायचे असायचे तेव्हाही मुलांना शेतीकडेला झोपवून त्या काम करायच्या. स्वत:च्या कामाबद्दल त्या आवर्जून सांगतात की ,

या कामात कसलं कौतुक वाटायला पायजे. आपल्या वाट्याला जे आलंय, ते करायला पाहिजे ना?, हे काम गड्याचं आणि हे बाईचं असं काही नसतंया. मी जी कामं करते, ती बाईंनी करायची नाहीत, असं कुठं लिहिलंय का?.

सासऱ्यांच्या निधनानंतर शेतीची जबाबदारी मला घ्यावी लागली. शेतीचा व्याप मोठं होतं, नवऱ्याला एकट्याला जमत नव्हतं. त्यांना शेतीच्या कामाची सवय नव्हती. एक वर्षे शेतीच खूप नुकसान झाले. त्याचा संसाराला फटका बसला. आर्थिक घडी विस्कटली.

सासऱ्यांच्या पश्चात काहीतरी करणं गरजेचं होतं मग मलाच वाटलं आपण स्वतः शेतीत लक्ष घालावे असा विचार करून वहिनी या धाडसी निर्णयापर्यंत पोहोचल्या.

वहिणीनी रोज शेतात जाऊन भांगलन करण्यापासून ते बैलगाडी जुंपण्यापासून सगळी काम शिकून घेतली. शेतीची काम गतीनं व्हावीत म्हणून ट्रॅक्टरने मेहनत करणं गरजेचं होतं, म्हणून त्या ट्रॅक्टर चालवायला शिकल्या.

ग्रामीण भागात चौकटीत राहणाऱ्या स्त्रीचे गोडवे गायले जातात. त्याचमुळे चौकट मोडली म्हणून वैनींची निंदा केली गेली, पण या निंदेची पर्वा न करता ही बाई बैलगाडी, ट्रॅक्टर, जीप ही वाहन चालवत राहिली. सगळ्यांच्या नाकावर टिच्चून शेतातली सगळी काम करत राहिली.

स्त्रीवाद नावाच्या संकल्पनेपासून दूर असलेल्या या वैनींनी ३५ वर्षापूर्वी पुरुषसत्तेला आव्हान दिलं. शेतीतही अनेक आधुनिक प्रयोग केले. अनेक बक्षीस मिळवली.

म्हणूनच त्यांच्या शेतीक्षेत्रातील भरीव कामगिरीचा महाराष्ट्र सरकारने ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्कार’देऊन गौरव केला आहे.

नूतन वहिनी जशा नामवंत शेतकरी आहेतच, पण त्यासोबत त्या बंदुकीही चालवतात. पिकांचा उपद्रव करणाऱ्या रानडुक्करांचा स्वतः बंदूक हाती घेऊन त्यांनी बंदोबस्त केला आहे. त्याना संगणकही चालवता येतो. त्यांची शिकण्याची उर्मी अशी की, म्हशींची धार काढण्यापासून ते अलीकडच्या काळातील फेसबुक वापरण्यापर्यंत त्या सगळं शिकल्या आहेत.

नूतन वहिणींचा हा प्रवास ‘शेतकरी नवरा नको म्हणणाऱ्या अनेक तरुणींच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.

मुलींनी आधुनिक विचार नक्की जोपासावेत.पण, मातीशी असलेली नाळ कधीही विसरू नये,असेच यातून शिकावे लागेल.

  • पूजा कदम

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.