या एका घटनेनंतर नूतननं संजीव कुमारसोबत कधीच काम केलं नाही…

हिंदी सिनेमाचे इतिहासात काही घटना वर्षानुवर्षे चर्चिल्या जातात. जर या घटना स्पायसी असतील तर त्याचे वारंवार पारायण देखील होते. अशीच एक खळबळजनक घटना घडली होती. पन्नास वर्षांपूर्वी. ज्यावेळी एका सिनेमाच्या सेटवर अभिनेत्री नूतन हिने अभिनेता संजीव कुमार यांच्या श्रीमुखात थप्पड लगावली होती. हे थप्पड प्रकरण त्या काळात मीडियामध्ये प्रचंड गाजले होते.

दोन्ही बाजूने यावर चर्चा होत होत्या. वाचकांमध्ये देखील दोन गट पडले होते आणि ते आपापली बाजू ही हिरीरीने मांडत होते. आज ५०-५५ वर्षानंतर आपण जेव्हा या घटनेकडे बघतो त्यावेळेला त्या काळाशी सुसंगत असलेल्या ‘कल्चर’ ला गृहीत धरूनच आपण त्या घटनेचा विचार करू शकतो. हे का घडलं याचा शोध घ्यायचा असेल तर आपल्याला थोडंसं मागे जायला लागेल.

अभिनेत्री नूतन हि हिंदी सिनेमातील आघाडीच्या अभिनेत्री पैकी एक.

तिच्या अभिनयात रंगलेल्या सीमा, सुजाता, बंदिनी, सरस्वती चंद्र हे चित्रपट भारतीय सिनेमातील माइल स्टोन असे सिनेमे होते. साधं सात्विक सुशील सौंदर्य, संवेदनशील चेहरा आणि अभिनयाची विलक्षण जाण असलेली कलाकार. यामुळे पन्नास आणि साठ च्या दशका मध्ये एकाहून एक अप्रतिम चित्रपट नूतनने दिले. तिच्यासाठी खास भूमिका लिहिल्या गेल्या. नूतनच्या चित्रपटाने भारतीय सिनेमा समृद्ध होत गेला. साठच्या दशकाच्या उत्तरार्धात अनेक अभिनेत्री रुपेरी पडद्यावर आल्या तरी नूतन, मीनाकुमारी यांना डिमांड कायम होती.

दुसऱ्या बाजूने हरीभाई जरीवाला अर्थात संजीव कुमार यांचा रुपेरी पडद्यावरील प्रवेश साठच्या दशकामध्येच झाला.

गुजरात मध्ये रंगभूमीवर वावरणारा हा कलाकार अभिनयाच्या बाबत खूपच सक्षम असा कलावंत होता. परंतु साठ चे दशक त्याच्यासाठी फारसं लकी नव्हतं. कारण या काळातील चित्रपटात त्याला मारधाड, पोशाखी आणि बालिश भूमिकाच कराव्या लागल्या. त्याच्या अभिनयाला साजेशा भूमिका त्याला खरं तर सत्तरच्या दशकातच मिळाल्या.

आता आपण मूळ किस्याकडे!

१९६६ साली ए भीमसिंग दिग्दर्शित ‘गौरी’ या चित्रपटात पहिल्यांदा संजीव कुमार आणि नूतन एकत्र आले. त्या काळातील फिल्म मॅगझीन मध्ये नेहमीप्रमाणे या दोघांचे फोटो आणि अफेअरच्या खोट्या खोट्या चर्चा सुरू झाल्या. सिनेमाच्या प्रमोशनसाठी या गोष्टी होतच असतात याची जाणीव दोघांना देखील होते. त्यामुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. हा सिनेमा आला आणि गेला फारसा चालला नाही. १९६८ साली ‘देवी’ या चित्रपटासाठी पुन्हा हेच पेयर कास्ट केले गेले. दक्षिणेकडील एस मधुसुदनराव हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. आता पुन्हा फिल्मी मॅगझीन मधून यांच्या दोघांच्या रोमान्सच्या चर्चा वाढू लागल्या. नूतनने याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले पण नंतर नंतर त्याचा अतिरेक होवू लागला.

‘नूतन तिच्या नवऱ्यापासून घटस्फोट घेऊन संजीव कुमार सोबत लग्न करणार आहे. तसेच तिच्या मुलाची कस्टडी देखील ते कोर्टाकडे मागणार आहेत.’

अशा आशयाच्या बातम्या मीडियामध्ये येऊ लागल्या. आता मात्र नूतन अस्वस्थ झाली. नूतन कुटुंबवत्सल घर गृहस्थी याला महत्व देणारी होती.तिच्या दृष्टीने तिचा संसार जास्त महत्त्वाचा होता. लेफ्टनंट कर्नल रजनीश बहल यांच्यासोबत तिने १९५९ साली लग्न केले होते आणि त्यांचा सुखाचा संसार चालू होता.पण आता या खोट्या अफवा आणि बातम्यांनी नूतन चांगलीच वैतागली होती.

या सर्व बातम्यांचा मागोवा घ्यायचे तिने ठरवले. त्या पद्धतीने तिने पत्रकारितेमध्ये तिच्या ओळखीच्या असलेल्या व्यक्तीला या बातम्यांचा सूत्रधार कोण आहे हे शोधायला सांगितले आणि ज्यावेळेला तिच्या लक्षात आले की अभिनेता संजीव कुमार यांच्याकडून कळत नकळतपणे या बातम्या दिल्या जात आहेत. त्यावेळेला तिचा संताप अनावर झाला! ज्या दिवशी हे घटना घडली त्या दिवशी सकाळीच नूतनने आज संजीव कुमारला कुठल्याही परिस्थितीत जाब विचारायचा असे ठरवले होते.

त्या पद्धतीने तिने संजीव  कुमारला याबाबत विचारले असता त्याने याकडे हसत हसत दुर्लक्ष केले आणि खांदे उडवले. नूतनचा चेहरा रागाने लाल झाला. आपण एवढं सिरीयसली विचारत आहोत आणि समोरचा (खरं तर तो गुन्हेगार आहे) निर्ढावल्या सारखा वागतो आहे हे पाहून तिच्या संतापाचा अतिरेक झाला. आणि आणि तिने सर्वांच्या समक्ष संजीव कुमारच्या थोबाडीत मारली! इस थप्पड की गुंज काफी देर तक फिल्म लाईन मे बनी रही.

दिग्दर्शक एस मधुसुदन राव यांनी मध्यस्थी करून दोघांना बाजूला केले.

शूटिंग ठप्प झाले. निर्माता दिग्दर्शक हादरले. कारण चित्रपट अर्ध्याहून अधिक पूर्ण झाला होता. आणि या दोघांमध्ये जर मतभेद असले तर चित्रपट कसा पूर्ण होणार? पण नूतन आणि संजीव कुमार दोघे प्रोफेशनल कलाकार होते त्यांनी एकमेकांशी बोलणं पूर्णपणे थांबवलं. पण सिनेमा पूर्ण केला. ‘देवी’ हा सिनेमा १९७० साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही पण यातील एक गाणं प्रचंड लोकप्रिय झाले होते.

‘शादी के लिए रजा मंद करली मैने एक लडकी पसंद करली’ त्यानंतर चार वर्षांनी स्टार डस्ट या फिल्म मॅगझीनला मुलाखत देताना नूतनने पहिल्यांदाच या प्रकरणावर विस्तृतपणे माहिती दिली.

त्याकाळात काहींनी नूतनच्या अन प्रोफेशनल आणि अरोगंस असलेल्या कृतीबद्दल बोल लावले. वाचकांमध्ये या विषयावर भरपूर खल झाला कोण बरोबर कोण चूक यावर हरेक व्यक्ती हिरिरी ने बोलू लागला. नूतन चे पती रजनीश बहल मात्र खंबीरपणे आपल्या पत्नीच्या मागे उभे राहिले.

नूतन आणि संजीव कुमार मात्र यानंतर एकाही चित्रपटात एकत्र आले नाहीत!

भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.