पटेलांनी विलीन केलेल्या काश्मीरला भारताशी जोडण्याचं काम या मराठी माणसाने केलं.

गोष्ट आहे १९४७ सालची. भारताला ब्रिटिशांच्या मगरमिठीतून स्वातंत्र्य मिळाले होते. पण धूर्त इंग्रजांनी हे स्वातंत्र्य देताना फाळणीची मेख मारून ठेवली. मोहम्मद अली जिना  यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगने मुसलमानांचा वेगळा पाकिस्तान बनवला.

भारताला तुकड्यात स्वातंत्र्य मिळाले.

भारत-पाकिस्तान या दोन देशांसह इंग्लंडच्या अधिपत्याखाली असणारे सर्व संस्थानिक देखील स्वतंत्र झाले. त्यांना देखील वेगळं राहण्याचा अधिकार होता. मात्र भारताचे उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे संस्थानाचा विषय आला तेव्हा त्यांनी साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर करून संस्थाने भारतात विलिन करण्याचा सपाटा लावला.

यात सर्वात महत्वाचा प्रश्न होता काश्मीर संस्थानाचा.

या राज्याचा राजा हिंदू होता तर प्रजा मुस्लिम बहुसंख्य. भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांनी काश्मीर वर दावा सांगितला होता. पण तिथला राजा हरिसिंग याची दोन्ही देशात विलीन न होता आपले संस्थान स्वतंत्र ठेवावे अशी इच्छा होती.

सरदार वल्लभ भाई पटेल आणि त्यांचे सचिव व्ही.पी. मेनन यांनी सगळी चाणक्य नीती वापरली.

हरिसिंग याच्यावर दबाव वाढवला. काश्मीरचा राजा भारताच्या बाजूने झुकत आहे हे बघून पाकिस्तानच्या जिना यांनी लष्करी कारवाई करून काश्मीर ताब्यात घेण्याचे ठरवले. पण त्यावेळी त्यांची आर्मी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली होती यामुळे पाकिस्तानने अतिरेकी काश्मीर मध्ये घुसवले.

अतिरेक्यांच्या रूपात आलेलं पाकिस्तानी सैन्य काश्मीर गिळंकृत करणार हे ओळखल्यावर हरिसिंगने भारतात विलीनीकरण करण्याच्या निर्णयावर सही केली.

काश्मीर भारतात आला मात्र अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी लष्करी कारवाई करण्याची आवश्यकता होती. यात सर्वात प्रमुख अडचण म्हणजे भारताला काश्मीरशी जोडणारा मुख्य रस्ता सियालकोट मार्गे जात होता आणि सियालकोट फाळणीनंतर पाकिस्तानात गेले होते.

भारतीय लष्कराला काश्मीर मध्ये जाण्यासाठी रस्ताच नव्हता.

हवाई मार्गाने श्रीनगरच्या एअरपोर्ट वर सैन्य उतरवण्यात आलं. जीवाची बाजी लावून भारतीय आर्मीच्या जवानांनी श्रीनगरच्या एअरपोर्टचे रक्षण केले. तीन बटालियन एअरपोर्टवर उतरल्या.

पुढच्या काही दिवसात पाक अतिरेक्यांना श्रीनगरच्या वेशीवरून हुसकावून लावण्यात आले.

काश्मीर भारतात तर विलीन झाले होते मात्र अजूनही त्याला भारताशी जोडण्याचं मुख्य काम बाकी होतं .

लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांनी हि जबाबदारी दिली पुण्याच्या एन व्ही गाडगीळ यांच्या कडे.

नरहर विष्णू गाडगीळ हे महाराष्ट्र काँग्रेसचे मोठे नेते होते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी मोठं कार्य केलं होतं. अनेकदा कारावास भोगला होता. लोकमान्य टिळकांपासून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यलढ्यात आलेले गाडगीळ  हे थोर गांधीभक्त म्हणून ओळखले जात होते.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालय देण्यात आले होते.

वल्लभभाई पटेलांनी गाडगीळांना भेटायला बोलवलं.

त्यांच्या हातात भारताचा नकाशा होता. पटेलांनी गाडगीळ याना नकाशात बोट दाखवून जम्मू ते पठाणकोट भागातला ६५ कि.मी. लांबीचा रस्ता तातडीने पूर्ण करायचं आहे असं सांगितलं. गाडगीळ म्हणाले,

‘‘नकाशावर अंतर ६५ कि.मी.चं असलं तरी तो भाग डोंगराळ आहे आणि तीन नद्या तिथं आहेत,’’

सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले तुम्हाला लागेल ती मदत पोहचवण्यात येईल पण रस्ता वेळेत पूर्ण करा.

आश्चर्य म्हणजे ही चर्चा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी १० हजार कामगार विशेष रेल्वेने राजस्थानमधून पठाणकोटला रवाना झाले. १५दिवसांच्या आत या कामासाठी लागणारं स्टील तिथे पोहोचलं. ७० खास गाडय़ांतून कामगार व साधनसामग्री पठाणकोटला पोहोचली. एकूण ४० हजार जण या कामावर लावले गेले.

संरक्षणदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचा असलेला हा रस्ता गाडगीळांनी विक्रमी  वेळेत पूर्ण केला.

पुढच्या आठ महिन्यात म्हणजेच जुलै १९४८ला भारतीय सैन्य पठाणकोट हुन जम्मू मध्ये सहज जाऊ लागले. येत्या काळात हा रस्ता पार श्रीनगरपर्यंत जोडला गेला.

पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का होता. भारताने बांधलेला हा रस्ता त्यांच्या काश्मीरला गिळंकृत करण्याच्या स्वप्नांना चकणाचुर करणारा होता.

सरदार वल्लभभाई पटेल  दुरदृष्टी, त्यांची निर्णय घेण्याची व प्रशासनाला कार्यक्षमता, एन.व्ही.गाडगीळ यांसारख्या नेत्यांनी केलेले प्रयत्न, भारतीय लक्ष्कराचे शौर्य मुळे भारतात विलीन झालेला काश्मीर अख्ख्या देशाशी जोडला गेला.

  हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.