न्यासा कंपनीमुळे राज्याच्या आरोग्य मंत्र्यांवर माफी मागायची वेळ आली आहे…

आज होणारी आरोग्य विभागाची परीक्षा काल रात्री ९ वाजता अचानक पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांच्या सध्या संतापाचं वातावरण आहे. परीक्षा घेण्यास कंपनी असमर्थ आहे, असं कारण देत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. तसंच विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करत माफीही मागितली आहे.

त्यामुळेच राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना माफी मागायला लावणारी हि कंपनी नेमकी कोणाची आणि कुठली, सोबतचं जर कंपनी परीक्षा घेण्यास असमर्थ होती, तर तिला कंत्राट का दिलं? असे सवाल आता विचारले जाऊ लागले आहेत.

नेमकी कोणती आहे हि कंपनी?

या परीक्षेच्या नियोजनाचं काम दिलेल्या कंपनीचे नाव आहे ‘न्यासा कम्युनिकेशन’.

हि एक खाजगी संस्था आहे. पद भरतीत भ्रष्ट कारभार होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने महापोर्टल बंद करून पर्यायी व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार खासगी कंपनीला भरतीच कंत्राट द्यायचा शासन निर्णय २० फेब्रुवारी २०२० रोजी घेण्यात आला. त्याप्रमाणे २१ जानेवारी २०२१ रोजी हे कंत्राट मेसर्स न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आलं.

परीक्षा घेण्यासाठी हि कंपनी सर्वोत्तम असल्याचा दावा करते. 

या कंपनीच्या  www.nysaasia.com या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार,

NYSA या कंपनीची स्थापना २००८ मध्ये दिल्लीत करण्यात आली आहे. भारतात तंत्रज्ञान आधारित ई-गव्हर्नन्स आणि १०० टक्के सुरक्षित परीक्षा व्यवस्थापन प्रणाली (संगणक आधारित, ऑफलाइन मोड, टायपिंग चाचणीसह ) आणि उच्च शिक्षण विभाग असलेल्या शिक्षण संस्थांना, तंत्रशिक्षण विभाग, सरकारी आणि खाजगी विद्यापीठे यांना ईआरपी कन्सल्टन्सी प्रदान करण्यात मदत करण्याच्या उद्देशाने या कंपनीची स्थापना करण्यात आली होती.

न्यासा कंपनीच्या दाव्यानुसार ई-गव्हर्नन्स आणि शिक्षण एक अग्रणी कंपनी आहे. कंपनीला आपल्या चांगल्या कामगिरीमुळे आणि उत्कृष्ट प्रकल्पांमुळे प्रतिष्ठित असा CSI Nihilent पुरस्कार मिळाला आहे. सोबतच २००८-०९ या वर्षात ई-गव्हर्नन्ससाठी सुवर्ण पुरस्कारासोबत इतर अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. हि कंपनी CMMI Level 5 सर्टिफाईड कंपनी आहे.

न्यासाने सांगितल्यानुसार आज घडीला त्यांची कंपनी माहिती आणि तंत्रज्ञानमध्ये एक अग्रणी कंपनी म्हणून ओळखली जाते आहे. हि कंपनी डेटा इंटिग्रेशन, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग (ईआरपी), परीक्षा व्यवस्थापन, बिझनेस इंटिग्रेशन रिसोर्सेस आणि प्लॅनिंग या क्षेत्रात सर्वोत्तम सेवा देणारी संस्था आहे. त्यांच्याकडे सॉफ्टवेअर आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ञ आणि अनुभवी व्यक्तींची टीम उपलब्ध आहे.

सध्याचा पत्ता काय आहे?

या कंपनीच्या वेबसाइटनुसार कंपनीचे सध्या मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे. या कार्यालयाचा पत्ता ५०४, डालामाल टॉवर, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई असा आहे.

या कंपनीसोबत काही वाद देखील जोडलेले आहेत.

न्यासा कंपनी प्रत्यक्षात देशभरात मात्र बरीच वादग्रस्त आहे. या कंपनीच्या विरोधात उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश अशा राज्यांमध्ये तक्रारी दाखल आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील हॉल तिकीट गोंधळापासून ते परीक्षेचे नियोजन करण्यापर्यंत अगदी सुरुवातीपासूनच या कंपनीचा गोंधळ होता.

उत्तरप्रदेशमध्ये २०१८ मध्ये UPSSSC चा एक पेपर परीक्षेच्या अगदी आधीच्या दिवशी लीक झाला होता. परिणामी परीक्षा रद्द करण्यात आली होती. या परीक्षेचं मॅनेजमेंट देखील न्यासाकडे होते. इतकंच नाही तर न्यासाच्या गलथान कारभारामुळे ती मध्यप्रदेशात देखील ब्लॅकलिस्टेड असल्याचं सांगितले जात आहे. त्यावेळी तीच नाव न्यास असं होत ते बदलून आता न्यासा झालं आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.