ओ भाई मुझे मारो, म्हणणारा भिडू सध्या काय करतोय?

क्रिकेट मॅच आणि त्यातही भारत विरुद्ध पाकिस्तान, म्हणजे गंभीर विषय असतोय. मॅचच्या दिवशी दोन्ही देशांत सारखीच परिस्थिती. त्यात वर्ल्डकप मॅच असली की, भारताची कॉलर जरा ताठ होणार. कारण भाऊ वर्ल्डकपमध्ये बादशहा फक्त भारत.

भारत-पाकिस्तान मॅच म्हणलं की रस्ते सामसूम, ऑफिसला कल्टी, टीव्हीसमोर गर्दी आणि कसंय ना शेठ भारतात टीव्ही पण फुटत नसतात. ते डिपार्टमेंट तिकडं पाकिस्तानात.

प्रत्येकवेळी भारत-पाकिस्तान वर्ल्डकपमध्ये भिडले की कायतरी नादर किस्सा होत असतोय. म्हणजे बघा काय, चेतन शर्माची हॅटट्रिक, व्यंकटेश प्रसादनं काढलेला बोल्ड, तेंडल्यानं अख्तरला हाणलेला खवाट सिक्स, टी२० वर्ल्डकपमधलं बॉल-आऊट, मिस्बाहची विकेट, मोहालीचं टेन्शन असं जवळपास प्रत्येकवेळी कायतरी वाढीव झालंय.

गेल्या वर्ल्डकपमध्ये म्हणजे २०१९ ला, भारतानं वन साईड मॅच मारली. सोशल मीडियावर ना रोहितची शंभर हिट झाली, ना शोएब मलिकचा बोल्ड. सोशल मीडियाचं मार्केट मारलं, ते एका व्हिडीओनं.

मोमीन सकिब नावाचा एक पाकिस्तानी चाहता, आपली टीम हरली म्हणल्यावर लय दु:खी झाला. लय म्हणजे खरंच लय. त्याचा राग आणि दुःख एकत्र झाला आणि त्याचा व्हिडिओ बनला. मॅचच्या आदल्या दिवशी पाकिस्तानी प्लेअर्स पिझ्झा आणि बर्गर खात असल्याचे फोटो व्हायरल झाले. त्यात कॅप्टन  सर्फराज अहमद मॅचमध्येच जांभई देताना दिसला.

मोमीननं व्हिडिओमध्ये पाकिस्तानची कैफियत मांडली. त्याचे शब्द काय होते ते सगळ्या जगाला माहितीये. पण हिट एकच वाक्य झालं, ‘ओ भाई, मारो मुझे मारो.’ आता पोरगं फ्रस्ट्रेशनमध्ये म्हणतंय ओळखून आजूबाजूच्या भिडूंनी जरा थंड घ्यावं, पण नाय त्यांनी पण चापट्या मारून घेतल्या.

पाकिस्तानी फॅन्सनी दुःखात आणि भारतीय फॅन्सनी आनंदात व्हिडिओ शेअर केला. सोशल मीडियावर मोमीन सकिब व्हायरल झाला. आता बऱ्याच लोकांना वाटेल, हे असला व्हिडिओ केलाय म्हणजे पोरगं रिकामटेकडं असणार. अहं, दिसतं तसं नसतंय.

मोमीन इंग्लंडमध्ये राहतो. तिथल्या प्रथितयश किंग्स कॉलेज लंडनच्या स्टुडंट युनियनचा तो अध्यक्ष होता. मागच्या १४४ वर्षांत तो पहिलाच नॉन युरोपियन अध्यक्ष ठरला. व्हायरल व्हिडिओनंतर त्याला आणखी प्रसिद्धी मिळाली. पाकिस्तानचा युथ आयकॉन म्हणून मोमीनला अवॉर्डही मिळालं. इंग्लंडमध्ये होणाऱ्या पाकिस्तानच्या प्रत्येक मॅचला उपस्थिती लावून तो संघाला चिअर करतो.

वर्ल्डकप मॅचला मोमीन उपस्थित राहणार आहे. त्यासाठी तो संयुक्त अरब अमिरातीमध्ये दाखल होणार आहे. त्यानं नवा व्हिडीओ टाकत पाकिस्तानच्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

थोडक्यात सांगायचं झालं, तर रविवारच्या मॅचनंतर पण मोमीनचा व्हिडीओ फिक्समध्ये येणार. आता तो परत स्वतःला बडवून घेतोय का नव्या प्रकारे दुःख व्यक्त करतोय ते कळलंच!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.