दोस्ती जिंकली : ओबामा बायडन यांची तेरी मेरी यारी !

काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन यांचा विजय झाला. आपले सर्वांचे लाडके डोनाल्ड ट्रम्प तोंडावर आपटले. ट्रम्प तात्या जाणार म्हणून अमेरिकेत दुसरी दिवाळी साजरी होत आहे.

पण सगळ्यात जास्त खुश आहेत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा !

हा आनंद ट्रम्प विरोधक म्हणून नाही तर ओबामा यांना आपला जिगरी दोस्त राष्ट्राध्यक्ष झाला म्हणून झालाय. ओबामा यांचा सर्वाधिक मतांचा विक्रम देखील बायडन यांनी मोडला. तरी ओबामा भाऊ सेलिब्रेशन करतं आहेत.

अस म्हणतात की लक्ष्या- महेश ची जशी दोस्ती होती अगदी तशीच दोस्ती ओबामा आणि बायडन यांची आहे. राजकारणात मोदी- अमित शहा सोडले तर एवढी घट्ट मैत्री कोणाची असत नाही. त्यात या दोघांच्या वयात १९ वर्षांचं अंतर आहे,

मग ओबामा बायडेन ची फ्रेंडशिप कधी सुरू झाली?

साल होत २००४. ओबामा राज्याचे सिनेटर बनले होते. त्यांनी एका वृत्तवाहिनीवर भाषण दिले होते. ते इतके गाजले की इथूनच ओबामा राष्ट्रीय पातळीवरचे नेते होण्यास सुरुवात झाली होती. आणि त्यांची ख्याती सिनेट पर्यंत येऊन पोहचली होती.

प्रचंड महत्वाकांक्षी असलेल्या ओबामा यांनी सुरवातीपासूनच राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी पावले टाकायला सुरवात केली होती.

सिनेट मध्येच त्यांची बायडेन यांच्याशी चांगली ओळख झाली. खरं तर जो बायडेन सिनेट मध्ये ओबामा यांच्या पेक्षा जवळपास ३२ वर्षांनी सिनीअर होते. केनेडीच्या काळापासून डेमोक्रॅटिक पक्षात असलेलं हे अनेक उन्हाळे पावसाळे झेलेलं व्यक्तिमत्व.

बायडन स्वतः १९८८ साली राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आपला डाव लावला होता पण माघार घ्यावी लागली होती.

यावेळी देखील त्यांनी तयारी केली होती. ओबामा सुद्धा २००८ची निवडणूक लढणार होते. यामुळे एकमेकांपासून थोडं अंतर त्यांनी राखलं होतं.

३१ जानेवारी २००८ मध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये बायडेन यांनी फॉर्म भरला. 

डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार निवडीच्या निवडणूकीत दोघेही एकमेकांच्या विरोधात होते. वॉशिंग्टन पोस्टनुसार डिबेटमध्ये दोघे एकमेकांकडे बघत नसायचे. 

पण आतल सिक्रेट म्हणजे ओबामा बायडेन यांच्या भाषणाच्या स्टाईलपेक्षा त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावर जास्त इंप्रेस झाले होते. त्यावर्षी ओबामांनी उमेदवार निवडीची निवडणूक सहज जिंकली. इतकंच काय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक देखील मारली.

पण जेव्हा त्यांना उपराष्ट्राध्यक्ष निवडायची वेळ आली तेव्हा मात्र त्यांनी आपल्या तरुण साथीदारांपेक्षा म्हाताऱ्या जो बायडन यांच्यावर विश्वास दाखवला.

परराष्ट्र धोरणात निष्णांत असलेल्या जो यांना देखील कळाले की आपल्याकडून आपल्या ओबामाला काय हवं आहे.

यानंतर पुढच्या आठ वर्षामध्ये अगदी लादेनला मारण्याच्या प्लॅनपासून ते अमेरिकेची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठीच्या प्रत्येक निर्णयात ओबामा यांचे कान, नाक, डोळे असं सगळचं काही जो होते.

इथूनच दोघांच्या तेरी मेरी यारीची सुरवात झाली.

जो यांच्याबाबतीत सांगायचे म्हणजे अनेक वर्ष खासदार आणि राष्ट्राध्यक्ष असून देखील संपत्ती गोळा न केलेला माणूस. २०१५ मध्ये थोरला मुलगा – बो – कॅन्सर मुळे मृत्यू पावला; त्यावेळी अमेरिकेचे उपराष्ट्रपती असूनसुद्धा मुलाच्या आजारपणाच्या खर्चामुळे बायडन आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले होते. तेव्हा बराक आणि मिशेल ओबामा यांनी त्यांना आर्थिक मदत केली होती.

५० वर्षे राजकारणात आणि तेही सर्वोच्चस्थानी घालवलेली व्यक्ती आर्थिकदृष्टया इतकी दुर्बल आहे, याचा अर्थच असा की त्यांनी स्वत:साठी सत्तेचा कधी गैरवापर केला नाही.

दोघांचे व्हाइट हाऊस मधले फोटो, एकत्र व्यायाम करतानाचे व्हिडीओ, त्यांचा सहज वावर एकमेकांवरील विश्वास दर्शवणारा ठरत होता. राजकारणात एवढं निखळ वातावरण पहिल्यांदाच पाहायला मिळत होतं.

चार वर्षापुर्वी जेव्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून ओबामा आपला कार्यकाळ संपवत होते तेव्हा त्यांनी जाता जाता आपला मित्र आणि ८ वर्षाचा सहकारी उपराष्ट्राध्य जो ला ‘प्रेसिडेंट मेडल ऑफ फ्रीडम’ हा अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देवू केला होता.

यावेळी ओबामा म्हणाले होते राष्ट्राध्यक्ष म्हणून मी हा शेवटचा कार्यक्रम असून तो मी माझ्या मित्राच्या नावावर करत आहे.

२००७ मध्ये बराक ओबामा यांच्यामुळे जो बायडन यांची राष्ट्रध्यक्ष पदाची संधी हुकली होती. मात्र दहा वर्षांनी पुन्हा एकदा २०१७ पासून ओबामा यांनी आपल्या मित्राला राष्ट्राध्यक्ष पदासाठी जनतेसमोर प्रेझेंट करण्यास सुरुवात केली होती.

यावर्षी जेव्हा जो यांची उमेदवार म्हणून निवड झाली तेव्हापासूनच ओबामांनी त्यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली होती.

व्हरच्युएल सभा, प्रत्यक्ष सभा आणि अलिकडेच ‘हॅलो ओबामा स्पिकींग’या कॅम्पेनची सुरुवात केली होती. स्वतः ओबामा मतदारांना फोन करून जो बायडन यांना मतदान करायचं आवाहन करत होते.

दोघांच्या कारकिर्दीवर पुस्तक :

एन्ड्रू शेफर या लेखकाने ओबामा – जो यांच्या आठ वर्षाच्या कारकिर्दिवर ‘होप नेव्हर डाईज’ हे पुस्तक बाजारात २०१९ मध्ये बाजारात आले होते. यात दोघांच्या मैत्रीची सुरुवात, व्हाईट हाऊसमधील अनेक किस्से सांगितले आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.