मिशेल आणि बराक ओबामाची साधीशी लव्हस्टोरी एका आश्चर्यापेक्षा कमी नाही.

बराक हुसेन ओबामा ज्युनियर. अमेरिकेतल्या हॉवर्ड लॉ स्कूल नावाच्या सर्वोत्तम  कॉलेजमध्ये वकिलीच शिक्षण घेणारा लाजाळू मुलगा. नुकताच एका मुलीबरोबर ब्रेकअप झालेलं. चांगली दोन वर्षे त्याने तिची मनधरणी केली होती पण तिने आणि तिच्या आईबाबांनी नकार दिलेला.

एकतर तो गोऱ्या आईचा कृष्णवर्णीय मुलगा, वडील दूर कुठे केनिया मध्ये, आईने इंडोनेशियामध्ये दुसर लग्न केलेलं. अख्खी त्याची फमिली विखुरलेली. सगळ लहानपण आजी आजोबांबरोबर गेलेलं, वरून काही तरी भाषणे वगैरे देतोय राजकारणात जातोय. हे सगळ त्या मुलीच्या म्हणजेच शैलाच्या घरच्यांना एवढ काही पसंत नव्हत. 

बिचारा बराक एकदम निराश झाला होता. कॉलेजच फर्स्ट इयर संपलं. सुट्टीत इंटर्नशिप करायची म्हणून शिकागोला परत आला. तिथे सिडली ऑस्टिन नावाची एक जगप्रसिद्ध फर्म आहे. हार्वर्डचा हुशार विद्यार्थी, शिवाय यापूर्वी कॉलेजमध्ये मिळवलेल यश वगैरे बघून त्याला ती इंत्र्न्शीप सहज मिळाली. प्रत्येक इंटरनला एका सिनियरच्या हाताखाली काम करावं लागत.  बराकची मेंटोर होती एक मुलगी नाव होतं मिशेल.

मिशेल जरा खाष्ट स्वभावाची होती.

बराक येण्यापूर्वी त्याची खूप चर्चा त्या फर्म मध्ये सुरु होती. तिने आपल्या सहकार्यांना स्पष्ट सांगितलेलं त्या इंटरनला भेटल्याशिवाय त्याची मेंटॉर  होणार नाही. ती त्याला भेटली. तो वयाने तिच्यापेक्षा मोठा आहे हे तिच्या नजरेन टिपलं. त्याची मुलाखत घेतली. थोडा वेन्धळा जरी असला तरी हुशार आहे असं म्हणत तिने त्याला आपल्या टीममध्ये घेतल.

बराकला मात्र ती पहिल्या दिवसापासून आवडत होती. उंच, स्मार्ट, कॉन्फीडंंट अशी मिशेल रॉबिन्सन सुद्धा त्याच्यासारखी कृष्णवर्णीय होती पण तिच्या आत्मविश्वासात कोणतीही कमी नव्हती. ती सुद्धा हार्वर्ड मधून पासआउट होती. एवढ्या कमी वयात या मोठ्या फर्ममध्ये तिने स्वतःच नाव कमावलंय ही खूप मोठी गोष्ट होती.

बराक तिच्या हाताखाली त्या फर्ममध्ये चांगलाच रुळला. वकिलीची खरी प्रॅक्टीस पुस्तकी ज्ञानापेक्षा वेगळी असते हे त्याला तिथे कळाल. मिशेलने त्याला शिकवलं. बराक आपल्या या गुरुच्या प्रेमातच पडला. त्या सिडली ऑस्टिन फर्ममध्ये येऊन त्याला अवघा एक महिना सुद्धा झाला नव्हता आणि थेट आपल्या मेंटोरला मिशेलला डेटवर येशील का हे विचारलं.

मिशेलने स्पष्ट शब्दात नकार दिला. त्याला बराकच वागण जरा आगाऊपणाच वाटलं. कामात लक्ष दे असं खडसावल.

बराक मात्र खूप चिकाटीचा होता. त्याने प्रयत्न करणे थांबवल नाही. तो कॉलेजला गेला तरी तिथून मिशेलला पत्र पाठवायचा. वेगवेगळी फुलं पाठवायचा. फोन करायचं त्याला तर निमित्त लागायचं. मिशेलला सगळ समजायचं पण तीच मन अजुन तयार होत नव्हत. विशेषतः त्याचा कायम १५ मिनिट उशिरा येण्याचा स्वभाव त्याला खटकायचा.

एकदिवस त्याने तिला आपल्या एका भाषणासाठी बोलवलं. बराक फावल्या वेळेत राजकारणाचे उद्योग करतो हे मिशेलला ठाऊक होतं. हा नेमका बोलतो तरी कस हे बघायसाठी ती आली. कृष्णवर्णीय तरुणांच्या समस्या या विषयावर बराकने झक्कास भाषण दिले. जे बराकच्या पत्रांनी, फुलांनी झालं नाही ते फक्त एका भाषणाने झालं. मिशेलने बराकला होकार दिला. वर्ष होतं १९८९.

michelle obama
https://www.instagram.com/p/BsvW9O-A387/
Barack Obama/Instagram
Michelle Obama

बराक ओबामांनी मिशेलला पहिल्या डेटवर नेलं. दोघ फिरले, जेवले एका सिनेमाला गेले. मिशेलनां अजूनही तो सिनेमा लक्षात आहे त्याच नाव होतं “Do The Right Thing”

दोघांनीही एकमेकाला निवडून खरोखर राईट थिंग केली होती. त्या पिक्चरच्या गोड आठवणी अजूनही दोघांच्या मनात आहेत. बराकच कॉलेज त्याची इंटरनशिप, दोघांच प्रेमप्रकरण यात दोन वर्ष पटापट निघून गेले.

दोघांनी खऱ्या अर्थाने आयुष्य एन्जॉय केलं. चौकोनी मध्यवर्गीय घरात अगदी शिस्तशीर स्वभावाच्या करीयर ओरीएन्टेड मिशेलला बराकने अॅडवेंचर नेमक काय असत हे शिकवलं. अगदी हिपहॉप डान्सपासून ते गरिबीविरुद्धच्या लढ्यातील संवेदनशीलता असे त्याच्या स्वभावाचे अनेक पैलू तिला दिसले. त्याच्याकडे खूप पैसे नव्हते पण त्याचा जिंदादिल स्वभाव तिला त्याच्यापासून कधीच वेगळ होऊ देत नव्हता.

बराकची बार एक्झाम पास झालेल्याची पार्टी होती. फक्त दोघे डिनरला गेले. बराकने आपल्या न झेपणारे असे पोश हॉटेल निवडले होते. गप्पा मारत मारत जेवण संपलं. वेटरने जेवणानंतरचं डेसर्ट आणल. मिशेलच लक्ष गेल त्या ट्रेमध्ये एक छानशी रिंग ठेवली आहे. तिने बराक कडे पाहिलं तोवर गडी खुर्ची वरून उठून एका गुढघ्यावर खाली बसला होता. त्याने ती रिंग घेऊन तिला विचारल,

“माझ्याशी लग्न करशील?”

मिशेलला चक्कर यायच बाकी होत. ती हो म्हणाली. त्या रेस्टॉरंटच अख्ख पब्लिक उठून टाळ्या वाजवत होते. अगदी फिल्मी स्टाईलमध्ये दोघांची एंगेजमेंट झाली. 

पुढच्या एकवर्षात दोघांनी लग्न देखील केलं. तो दिवस होता ३ ऑक्टोबर १९९२. मिशेल रॉबिन्सन ची मिशेल ओबामा बनली. त्या म्हणतात,

“बराकने लग्नात मला श्रीमंत बनवण्याच वचन दिल नाही. फक्त आयुष्य इंटरेस्टिंग बनवणार एवढच प्रोमीस केलं होतं. आणि त्याने ते पूर्ण देखील केलं.”

या लग्नानंतर ओबामा यांच आयुष्य बदलत गेल.  त्यांना दोन मुली झाल्या. राजकारणाची एकएक शिडी ते चढत गेले. या प्रत्येक पायरीवर मिशेल या त्यांच्या पाठीशी नव्हे तर खांद्याला खांदा लावून उभ्या होत्या.

जगातलं सगळ्यात पॉवरफुल कपल असं त्यांना आजही ओळखल जात. सलग दोन वेळा बराक ओबामा अमेरिकेसारख्या महासत्ता असणाऱ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष झाले. एक कृष्णवर्णीय माणूस पहिल्यांदाच या पदावर बसला होता. त्यांनी आपल्या या सगळ्या यशाचं श्रेय मिशेल यांनाच दिलय. आम्ही दोन वेगळे नसून एकच आहोत आणि प्रत्येक मोठे निर्णय आम्ही एकमेकांना विचार करून ठरवूनच घेतो असं ते आजही दिलखुलासपणे मान्य करतात.

त्यांच्या ही नात्यात चढउतार आले. एकदा तर मिशेल कंटाळून ओबामांना घटस्फोट देण्याच्या तयारीत होत्या. पण त्यांची छोटी मुलगी आजारी होती त्याकाळात बराकनी आपला सगळा व्याप सोडून फक्त तिच्यासाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढला. या काळात दोघे परत एकत्र आले. प्रेमाची परीक्षा ते पास झाले होते.

नुकतीच या गोड कपलने पंचविसावी अॅनिव्ह्र्सरी साजरी केली. पाश्चात्यदेशात लग्नाला एवढी वर्ष पूर्ण झाली तर त्याला एक महाआश्चर्य समजल जात. मिशेल आणि बराक ओबामाची साधी लव्हस्टोरी पण एका आश्चर्यापेक्षा कमी नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.