फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपमधील OBC नेत्यांचे काय झाले ?

आधी जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्ष. १९८० च्या दशकात पक्षाचं नाव बदललं पण ओळख मात्र शेटजी – भटजींचा पक्ष अशीच होती. त्या काळात हि ओळख जाऊन पक्षाला व्यापक जनाधार मिळावा म्हणून जनसंघ आणि भाजपमध्ये संघटनमंत्री म्हणून काम केलेल्या वसंतराव भागवत यांनी माळी-धनगर-वंजारी (माधव) हा फॉर्मुल्या पुढे आला. आणि यातूनच उदय झाला ओबीसी राजकारणाचा.

पश्चिम महाराष्ट्रापेक्षा विदर्भ – मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र इथे हा फॉर्म्युला चांगला चालला.

मंडल आयोगानंतर तर या मोहिमेला अधिक वेग देण्यात आला. याच फॉर्मुल्यातून १९८०-९० या काळात माधव मधील वंजारी समाजातील गोपीनाथ मुंडे, लेवा पाटील समाजातील एकनाथ खडसे, भाऊसाहेब फुंडकर असे नेते महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे आले. भागवतांनी यांना नेतृत्व म्हणून उभे केले. पक्षानेही आलटून – पालटून या पैकीच प्रदेशाध्यक्ष झाले.

१९९५च्या युती सरकारच्या काळात मुंडे उपमुख्यमंत्री तर खडसे यांना अर्थमंत्री करण्यात आले. २००९-२०१४ या काळात खडसेंना विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पद देण्यात आले. तर त्या काळात मुंडे लोकसभेचे खासदार होते. पुढे २०१४ ला त्यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले.

२०१४ पर्यंत हे जेष्ठ नेतेच भाजपमधील इतर मागासवर्गीय समाजाचा (ओबीसी) चेहरा होते.

पण गोपीनाथ मुंडें आणि भाऊसाहेब फुंडकर यांच्या मृत्यूनंतर हे नेतृत्व आपसूकच खडसे यांच्याकडे आले. प्रामुख्याने लेवा पाटील समाजाचे वर्चस्व असलेल्या खानदेशातील भाजपच्या वाढीस नाथाभाऊंचा लोकसंपर्क हा महत्त्वाचा भाग होता.

त्यानंतरच्या काळात खडसेंसोबत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्याकडे ओबीसींचा चेहरा म्हणून पाहायला सुरुवात झाली.

त्यांना २०१४ला मंत्रिमंडळामध्ये ग्रामविकास, महिला व बालविकास आणि जलसंधारण हि खाती दिली. सोबतच तेली समाजातील एक महत्वाचे नेतृत्व म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांना ही ऊर्जा मंत्री, राज्य उत्पादन आणि नागपूरचे पालकमंत्रीपद दिले.

२०१४मध्ये मुख्यमंत्री पद फडणवीस यांना दिल्याने खडसे नाराज होते. त्यामुळे फडणवीस – खडसे शीतयुद्ध महाराष्ट्राने पाहिले.

यांच्यातील वादाचा फायदा गुज्जर समाजाचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या गिरीश महाजन यांना थेट झाला.

त्यांच्याकडे जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण यासारखी मोठी खाती, नाशिक व नंदुरबारचे पालकमंत्री पद आले. फडणवीस यांनी महाजनांना खडसे यांना पर्याय ठरणारे नेतृत्व उभे केले. दोघेही जळगावमधीलच आणि दोघेही ओबीसी होते.

पण २०१६ नंतर फडणवीसांनी खडसे आणि मुंडे यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न सुरु केला. जूनमध्ये विविध आरोपांमुळे खडसेंचा राजीनामा घेऊन त्यांना दूर करण्यात आले. तर पंकजा मुंडे यांच्याकडील जलसंधारण हे खाते त्या परदेशात असताना काढून राम शिंदेना दिले. यावेळी त्यांना राज्यमंत्री वरुन कॅबिनेट मंत्री करण्यात आले. यातून त्यांनी धनगर समाजाच्या शिंदेंना ताकद दिली. म्हणजेच खडसे, मुंडे यांच्या जागी गिरीष महाजन, राम शिंदे यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला.

गिरीश महाजनांचे नेतृत्व उभे केले : 

खडसेंच्या राजीनाम्यानंतरच्या फडणवीसांनी महाजन यांना आणखी ताकद देण्यास सुरुवात केली. प्रत्येक उपोषण, आंदोलन यामधील वाटाघाटीसाठी महाजनांना पुढे केले गेले.

एक वेळ अशी आली होती कि त्यांचे नाव उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये होते.

या काळात जामनेर नगर पालिका व शेंदुर्णी नगर परिषदेच्या निवडणुकीत पैकीच्या पैकी नगरसेवक महाजन यांनी निवडून आणत मतदारसंघातील आपली ताकद दाखवून दिली. यानंतर उत्तर महाराष्ट्रातील ४७ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्याकडे आली.

भाजपमध्ये आजही देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यानंतर गिरीश महाजन यांचे नाव घेतले जाते.

२०१९ मध्ये पुन्हा ओबीसींना ताकद देण्याचा प्रयत्न :

२०१९च्या शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये विदर्भातील ओबीसी आमदारांना मंत्रीपद देवून पुन्हा ओबीसींकडे लक्ष दिले गेले. कुणबी समाजातील मोर्शीचे आमदार अनिल बोंडे, साकोलीचे आमदार परिणय फुके यांना मंत्रीपद दिले. तर माळी समाजातील अतुल सावे यांना देखील मंत्रीपद दिले.

पण बोंडे हे भाजपकडून कधीच ओबीसीचे नेते नव्हते. कारण २०१४ ला म्हणजे ५ वर्षापुर्वीच ते भाजपमध्ये आले होते. त्यापुर्वी ते अपक्ष होते. २०१९ च्या निवडणुकीत बोंडे आणि फुके हे दोघे देखील पराभूत झाले.

ओबीसीमधील आता नेता कोण ?

आता या ओबीसी नेत्यांपैकी महाजन सोडले तर फ्रेममध्ये कोणीच नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणूकींमध्ये एकनाथ खडसे यांना कोणतेही कारण न देता तिकीट नाकारले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही बाबतीत तेच झाले. खडसेंच्या मुलीला तिकीट दिले, पण त्याही पराभूत झाल्या.

माधवमधील माळी समाजाचे औरंगाबाद पुर्वमधून अतुल सावे हे सध्या आमदार आहेत. धनगर समाजाचे राम शिंदे हे रोहित पवार यांच्या विरोधात निवडणूक हारले आहेत. तर दुसरे नेते महादेव जानकर. पण ते थेट भाजपशी संबंधीत नाहीत.

२०१४ ला धनगर समाजाला भाजप सोबत जोडण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी महादेव जानकर यांना भाजपसोबत जोडले होते. फडणवीसांनी त्यांना मंत्री देखील केले.

पुढे २०१९ च्या निवडणूकीत फडवणवीसांनीच जानकरांच्या नकळत रासपच्या उमेदवारांना भाजपचे एबी फॉर्म दिले. व रासपची ताकद कमी केली. यामुळे जानकर बरेच दिवस पक्षावर नाराज होते. आता भाजपची सत्ता गेल्यापासून ते देखील अज्ञातवासात आहेत.

यानंतर फडणवीस यांनी धनगर समाजासाठी पडळकर यांना पक्षात आणून आमदार केले.

वंजारी समाजातील पंकजा मुंडे देखील पराभूत झाल्या. मुंडेंच्या पराभवाचे खापरही खडसेंनी फडणवीसांच्याच माथी दिले.

धनंजय मुंडेना ताकद देऊन पंकजांचा पराभव करण्यात आल्याचा आरोप त्यांनी गोपीनाथ गडावरील भाषणादरम्यान केला होता. मात्र आता या सगळ्यामुळे ३५६ जातींचा समावेश असलेला ४० टक्के ओबीसी समाजाचा भाजपमधील खरा चेहरा आणि नेता कोण?

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.