घरचे त्यांना ट्रॅव्हल एजन्ट समजायचे, पोरांनी आज २४०० कोटींचा गुंतवणूक करार केलाय

जास्त जुनी नाही, दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये संशोधक म्हणून असलेला एक २३ वर्षाचा भावेश अगरवाल कर्नाटकमधील बंदीपूर ते बंगलोर असा भाड्यानं गाडी घेऊन प्रवास करत होता. भाडं किती द्यायच या सगळ्याची चर्चा आधीच झाली होती, पण ड्रायव्हरनं ऐन वेळी दगा दिला. भाडं जास्त घेतलंच शिवाय भावेशला वाटेतच सोडलं. परत बसनं त्याला बंगलोर गाठावं लागलं.

या आलेल्या वाईट अनुभवातूनच त्याने २०१० मध्ये मायक्रोसॉफ्टची नोकरी सोडली आणि बंगलोरमध्ये परत आला. आता तुम्ही म्हणाल, ड्रायव्हरने दगा देण्यात आणि मायक्रोसॉफ्टची कंपनी सोडण्याचा काय संबंध आहे? तर त्याने ही नोकरी सोडली आणि मित्र अंकित भाटीला सोबत घे ‘ओला कॅब’ या कंपनीची स्थापना केली.

दहा वर्षांपूर्वी सुरुवात आलेली ही कंपनी आता तामिळनाडूमध्ये तब्ब्ल २ हजार ४०० कोटी रुपयांची जगातली सर्वात मोठी इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्टरी सुरु करत आहे. यातून ओला आता १० हजार नव्या नोकऱ्या तयार करणार आहे.  

पण १० हजार नोकऱ्या देण्याइतकी कंपनी एका रात्रीत मोठी झालेली नाही, तर त्यासाठी या दोन पोरांनी वापरलेल्या आयडिया आहेत.

तर अगदी सुरुवातीला म्हणजे २०१० मध्ये भावेश आणि अंकित यांनी गाड्या आणि लायसंन्स असणाऱ्या ड्रॉयव्हर्ससोबत बोलणी करून त्यांना या व्यवसायाबाबत कल्पना दिली, आणि Olatrip.com या नावाने एक वेबसाईट सुरु केली.

सुट्टीच्या दिवशी किंवा शनिवार, रविवार बाहेर फिरायला जाणाऱ्या लोकांना ट्रिप पॅकेजची सुरुवात केली. यामुळे कधी कधी त्या दोघांनाही घरचे ट्रॅव्हल एजंट समजायचे.

हळू हळू बंगलोरमध्ये फोनवरून गाड्यांचे बुकिंग सुरु केलं. सुरुवातीला दोघंच फोन उचलून ड्रायवर म्हणून बोलायचे आणि परत ड्रायव्हरना फोन करून सांगायचे. दोघांनी त्यांचा हा स्टार्टअप मुंबईमध्ये सुरु केला.

पण मुंबईत सुरु केला आणि यशस्वी झाला असं नव्हते. त्यापूर्वी काही खाजगी गुंतवणूकदारांकडून कंपनीसाठी त्यांनी ३४ लाखांची गुंतवणूक जमवली. ही त्यांच्या व्यवसायासाठी मिळालेली पहिलीच गुंतवणूक होती. यातून त्यांनी एका १ BHK जागेत ऑफिस उभं केलं आणि इतर आवश्यक साहित्य खरेदी केल. त्यामुळे लोकांच्यात त्यांच्या व्यवसायाबद्दल विश्वासार्हता वाढत गेली.

पुढे बंगलोर, मुंबई नंतर दिल्ली, पुणे, नागपूर, यासारख्या मोठ्या शहरात देखील त्यांनी सेवा द्यायला सुरुवात केली, 

२०१२ मध्ये आलेल्या वेबसाइट फेल्युअर मुळे ‘ओला’च्या मोबाईल ऍपची सुरुवात केली, आणि यानंतर त्यांचा उद्योग खरा यशस्वी झाला. लोकांपर्यंत पोहचू लागला.

२०१३ मध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी ‘ओला’ने मेक माय ट्रिप कंपनी सोबत भागीदारी करार केला आणि तिकडे विविध शहरात फिरायला येणाऱ्या प्रवाश्यांना गाड्या भाड्याने द्यायला सुरुवात केली. यामुळे लोकांना त्यांच्या ब्रँडविषयी अधिक माहिती होऊ लागली. ओला आता महानगरांमध्ये प्रवासासाठी ऑनलाइन सेवा देणारी कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली.  

सोबतच एक तत्व या दोघांनी देखील पाळलं की, वर्ष संपताना मागच्या वर्षी काय झालं याचा आढावा घ्यायचा.

या तत्वामुळे २०१३ संपताना दोघांच्या लक्षात आलं की आपल्याला फक्त श्रीमंत ग्राहकच जोडले गेली आहेत. प्रवासासाठी बेस्ट किंवा सिटी बस वापरणारी, रिक्षातुन प्रवास करणारे प्रवासी अजून आपण जोडू शकलेलो नाही. 

झालं, परत दोघांनी पायाला भिंगरी बांधली आणि सगळ्या शहरात जावून रिक्षावाल्यांशी बोलून आले. तिथले स्थानिक प्रवासी कसे असतात, काय दर आहेत या सगळ्याची माहिती घेऊन आले. आणि त्यातून २०१४ मध्ये ओला मिनी आणि ओला ऑटो रिक्षाची सुरुवात केली. इथे जास्त काही केलं नव्हतं, आधी हाथ दाखवून रिक्षा थांबायचे ते आता बुकिंग करून बोलवून घ्यायला लागले. पण त्यामुळे यांचा ब्रँड खालीपर्यंत पोहचला.

२०१४ या वर्षात त्यांनी जवळपास ८५ महानगरांमध्ये कंपनी सोबत २ लाख कार आणि रिक्षा जोडल्या.

वेगवेगळ्या राज्य सरकारसोबत आपतकालीन वेळी ‘मेडिकल इमर्जन्सी’ साठी करार केले. त्यामुळे गुंतवणूकदरांचा विश्वास घट्ट झाला.

आता भावेश – अंकित जोडीला आणखी पंख विस्तारायचे होते. नवीन गुंतवणूकदार शोधू लागले, आणि अशात त्यांना जॅकपॉट लागला. भरातातून नाही तर जपानमधून. जपानच्या सॉफ्ट बँक इंटरनेट आणि मीडियाने यांच्या कंपनीमध्ये २१० दशलक्ष डॉकारची गुंतवणूक केली.  

दोघांनी पण मागे वळून बघितले नाही. त्यांनी आता ड्रायवरना मदत करायला सुरुवात केली. गाड्या कमी आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये खरेदी करण्यासाठी मदत केली, परतावा चांगला देऊ लागले. २० ते २५ टक्के प्रत्येक ट्रिपमध्ये ड्रॉयव्हर्सना मिळू लागले. त्यामुळे ते देखील नवीन गाडी घेऊन ‘ओला’ला लावू लागले.

चेन्नईमध्ये आलेल्या महापुरात यांनी आणखी एक संधी पकडली. आपत्तीच्या दळणवळणासाठी ‘फेरी सर्व्हिस’ चालू केली. त्यामुळे अत्यावश्यक सामना पोहचण्यासाठी मदत होऊ लागली. आणि यामुळे सामाजिक भान देखील दिसून आले.
या कंपन्यांचे एक वैशिट्य म्हणजे गुंतवणूकदार वाढले कि कंपनीचा भाव वाढतो. टायगर ग्लोबल, मॅट्रिक्स इंडिया आणि इतर कंपन्यांनी मिळून जवळपास आणखी ४२० कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली.
या सोबतच भावेश – अंकितने २०१८ मध्ये ‘ओला’ची इंटरनॅशनल सेवा देण्यास सुरुवात करत असल्याचे जाहीर केले. ऑस्ट्रेलिया, युके, न्यूझीलंड या देशांत सेवा देईल सुरुवात केली.
२०१९ मध्ये ‘ओला’ कंपनीत टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनी गुंतवणूक केली. सोबतच हॉंगकॉंग स्थित ‘हॅडगे फंड स्टेडव्यू’ मधून ५२० कोटींची गुंतवणूक करवून घेतली. यामुळे कंपनीची मार्केट व्हॅल्यू जवळपास २ हजार २२२ कोटींच्या घरात गेली. 
या एवढ्या मोठ्या गुंतवणुकीनंतर दोघे थांबतील कशाला? त्यांनी आता दुचाकीच्या बाजारात उतरायचं ठरवलं. आणि ते देखील इलेकट्रोनिक्सच्या जगात. गुंतवणूक वाढल्यामुळे त्यांनी आपल्या दुचाकीच्या व्यवसायासाठी नेदरलँडची कंपनी Etergo BV विकत घेतली. जी ‘ओला’ची इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यासाठी मदत करेल.
आणि आता तामिळनाडू सरकारशी २ हजार ४०० कोटींचा व्यवहार करून जानेवारी २०२१ मध्ये ते पहिली इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात आणणार आहेत.
अशा पद्धतीने एक एक वीट रचत भावेश अगरवाल आणि अंकित भाटी यांनी ‘ओला’ची इमारत उभी केली. यात त्यांना अडचणी देखील आल्या. वर सांगितलेली वेबसाइट फेल्यूर ही त्यापैकीच एक. पण दोघांनी त्यातून देखील उपाय शोधले आणि पुढचा प्रवास चालू आहे. कसयं, शेवटी चांगल्याला चांगलं म्हणलंच पाहिजे की.  
हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.