ओलाची स्कुटर जळल्याने “ई-स्कुटर” घ्यावी का नको? लेख वाचून निर्णय घ्या.

सध्या सोशल मीडियावर एका इलेक्ट्रिक बाईकला आग लागल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.. हि आग लागलीये ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक बाईकला. नेमकं काय झालंय? आग कशी लागलीये? कंपनीचं यावर काय म्हणणंय? आणि मग इलेक्ट्रिक बाईक घ्यावी की नाही घ्यावी? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होतायत. या सगळ्याची उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात…

हा व्हायरल व्हिडीओ दोन दिवस आधीचा आहे. २६ मार्चला पुण्याच्या धानोरी भागात दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली. निळ्या रंगाची ओला S1 गाडी रस्त्याच्या बाजूला आगीत होरपळतीये आणि  गाडीतून मोठा धूर निघत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. फक्त ३१ सेकंदात हा प्रकार घडल्याचं कळतंय.

असं होण्याचं कारण काय?

सध्या तरी याचं कारण थर्मल रनअवे असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. यात काय होतं तर गाडीच्या लिथियम-आयन बॅटरीमध्ये एक एक्झोथर्मिक रिॲक्शन होते. ती कधी होते तर बॅटरी खराब झाली किंवा शॉर्ट सर्किट झालं तर. या बॅटरीजसोबत अशा घटना होणं अगदी सहाजिक आहे. बॅटरी जास्त गरम झाल्यामुळे, बॅटरीचं अंतर्गत तापमान आणि दाब खुप स्पीडनं वाढतो आणि नंतर बॅटरी नष्ट होऊ शकते, असं सांगितलं जातं.

ओव्हरहिटिंगची अजूनही कारणं आहेत. जसं की,  इलेक्ट्रिकल शॉर्टिंग, रॅपिड डिस्चार्ज, ओव्हरचार्जिंग, चुकीच्या चार्जरचा वापर, खराब डिझाइन किंवा थंड होण्यासाठी वेळ अपुरा पडणं. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की या व्हिडिओतली बाईक चार्जिंगसाठी लावलेली दिसत नाही.

याबद्दल अजून एक धोकादायक गोष्ट म्हणजे, एकदा एखादा बॅटरी सेल थर्मल रनअवेमध्ये गेला की, इतकी उष्णता तयार होते ज्यामुळं बाकीचे बॅटरी सेलही लगेच थर्मल रनअवेच्या स्टेटमध्ये पोहचू शकतात. अशावेळी जी आग तयार होते ती राहून राहून भडका घेत असते. कारण प्रत्येक बॅटरी सेल फुटत असतो आणि त्याच्यातले सगळे केमिकल्स बाहेर पडत असतात.

अशा प्रकारच्या घटनेमध्ये आग विझवणं खूप अवघड असतं आणि विशेषत: वैयक्तिकरित्या ती विझविण्याचा प्रयत्न करणं. कारण तुम्ही ती आग पाण्याने विझवू शकत नाही आणि अग्निशामक यंत्रे म्हणजेच फायर एक्स्टिंगविशरसुद्धा ते विझवेल की नाही हे सांगता येत नाही.

आता ओला इलेक्ट्रिक बाईक लॉन्च झाल्यापासून काही महिन्यांतच असा प्रकार घडल्याने सगळ्या इलेक्ट्रिक बाईक वापरणाऱ्या लोकांमध्ये भीती निर्माण होऊ शकते. कारण अशा प्रकारे अचानक आग लागू शकते तर आपल्या जीवाला देखील धोका आहे हे वाटणारच. म्हणून या घटनेबद्दल ओलाचं काय म्हणणंय हे जाणून घेणं गरजेचं आहे…

यावर कंपनीनं ट्विट केलंय की…

“पुण्यात आमच्या एका स्कूटरसोबत घडलेला प्रकार आम्हाला माहिती आहे आणि त्याचं मूळ कारण समजून घेण्यासाठी आम्ही तपास करत आहोत. त्यानुसार पुढच्या काही दिवसांत आणखी अपडेट्स शेअर करू. आम्ही या घटनेतल्या स्कूटर मालकाच्या संपर्कात आहोत आणि ते सुरक्षित आहेत. ओला वाहनांच्या सुरक्षेला सर्वात जास्त महत्त्व देतं आणि आम्ही आमच्या उत्पादनांमध्ये हाय क्वालिटी स्टँडर्ड्ससाठी वचनबद्ध आहोत. तेव्हा आम्ही ही घटना गांभीर्याने घेत असून योग्य ती कारवाई करू.”

पण ओलाच्या इलेक्ट्रिक बाईकची ही एकच समस्या आहे का? तर नाही. थर्मल प्रॉब्लेममुळेच अनेकदा बाईकची कार्यक्षमता कमी होणं, फॉरवर्ड मोडमध्ये सेट केल्यावर बाईक मागच्या दिशेने चालणं, अशा तक्रारीही ग्राहकांकडून कंपनीकडे आल्या आहेत.

आता जी घटना घडली आहे तीचं कारण बॅटरी सांगितलं जातंय. मग याला काही उपाय आहे का? हे शोधलं तेव्हा कळतं, टेस्लाने गेल्या वर्षी जाहीर केलं होतं की ते त्यांच्या सर्व कारसाठी LFP बॅटरी वापरतील. या प्रकारच्या बॅटरीची उर्जेची घनता थोडीशी कमी असली तरी, दीर्घ आयुष्य आणि थर्मल रनअवे होण्याचा कमी धोका असतो. ज्यामुळे भारतीय हवामानात ती जास्त सुरक्षित राहू शकते.

तेव्हा आता ओला देखील या बॅटरीकडे वळणार का? आणि त्यांच्या तपासात काय निष्कर्ष निघतोय? यावर कंपनीच्या इलेक्ट्रिक बाईकचं भविष्य ठरणार असं दिसतंय. तुम्हाला काय वाटतं? इलेक्ट्रिक बाईक भारतीय तापमानात विशेषतः आपल्याकडच्या उन्हाळ्यात किती टिकू शकतील? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा…

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.