वय वर्ष अवघे १२३, आजही न चुकता योगासने करतात.

योगाअभ्यासामुळे माणूस फिट आणि हेल्दी होतो, त्याचे आयुर्मान वाढते या वर तर जगातल्या मोठमोठ्या विद्यापीठांनी देखील मोहोर लावली आहे. पण एक साधूबाबा याचे जीतजागतं उदाहरण आहेत. त्यांच नाव स्वामी शिवानंद.
त्यांचं म्हणण आहे की ते १२३ वर्षांचे आहेत.
आपल्याला एक दोन तीन हे आकडे एकशे तेवीस पर्यंत म्हणायला लावले तरी दम लागेल(त्यात जर तेवीस ला वीस तीन म्हणायला लावलं तर अजून जीव जायचा.) असो. एवढंच नाही तर या बाबांकडे भारत सरकारचा पासपोर्ट तयार आहे ज्यावर त्यांची जन्म तारीख दिली आहे, ८ ऑगस्ट १८९६.
त्यांच खरं नाव शिवानंद गोस्वामी, जन्म सध्या बांगलादेश मध्ये असणाऱ्या सिल्हेट जिल्ह्यात झाला.
हे बाबा अवघे सहा वर्षाचे देखील नव्हते तेव्हा त्यांचे आईवडील दोघेही वारले. मग कुठल्यातरी नातेवाईकाने त्यांना एका संन्यासीच्या हवाली केले. त्यांनाच आपले गुरु मानून शिवानंद त्यांच्या सोबत देशभर हिंडले. आध्यात्माचा अभ्यास केला. योगविज्ञान शिकले. अखेर काशीला येऊन राहिले. गेली कित्येक वर्षे ते तिथेच आहेत.
भारतातील सर्वात पवित्र शहर म्हणून काशी बनारस वाराणसी या गावाला ओळखल जातं. काशी विश्वनाथाचं मंदिर, वेगवेगळे घाट, तिथली वेगवेगळी मंदिर आणि युगानुयुगे लोकांचे पाप धुवून वाहणारी गंगा नदी याच्या सानिध्यात शिवानंद बाबा राहतात. रोज तासनतास योगा करता, तिथे येणाऱ्याना योगाचे पाठ देतात. कधी कधी मोठमोठ्या योग कॉन्फरन्ससाठी त्यांना निमंत्रण येत. तिथेही आपल अस्खलित इंग्लिशमधून योगाबद्दल भाषण देतात.
स्वामीi शिवानंद आपल्या या फिट असण्याच क्रेडीट ‘योग, ब्रम्हचर्य आणि अनुशासन’ याला देतात. ते फक्त उकडलेलं अन्न , भात आणि वरण खातात. दुध, फळे, मसाले या सगळ्यांना आपल्या आहारापासून वर्ज्य केलेलं आहे.
काही वर्षापूर्वी त्यांनी स्वतःचं पासपोर्ट बनवलं. तिथल्या अधिकाऱ्यांनी मंदिरातल्या रजिस्टरवरून त्यांची जन्मतारीख कन्फर्म करून घेतली. काही वर्षापूर्वी त्यांचं पहिल्यांदा मेडिकल चेकअप करण्यात आलं. ज्यात त्यांच ब्लडप्रेशर पासून सगळ अगदी नॉर्मल आढळून आलं. फक्त पडलेले दात सोडता बाकी कोणत्याही वार्धक्याच्या खुणा त्यांच्या अंगावर नाहीत. गिनीज बुक रेकॉर्डसाठीही त्यांच्या नावाचा विचार चालू आहे.
त्यांचा दावा खरा मानायचा झाला तर एकोणीसाव, विसावं आणखी एकविसावं असे तीन शतके पाहिलेले ते अखेरचे व्यक्ती असतील.
त्यांनी ब्रिटीशांचा काळ पहिला आहे. देशाला स्वतंत्र होताना पाहिलं आहे. वीज टेलिफोन मोटारगाड्या या सगळ्या मॉडर्ण गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर आल्या. पण बाबा या पासून दूर राहिले. त्यांच्या मते या आधुनिक गोष्टी भारतात आल्या आणि लोकांचं सुख हिरावून गेलं.
हे ही वाच भिडू.
- रामदेव बाबा सुद्धा ज्यांचं नाव ब्रँड म्हणून वापरतात असे पतंजली मुनी नेमके कोण होते?
- सततचा योगा गुडघ्यांसाठी अत्यंत धोकादायक- डॉ.अशोक राजगोपाल
- त्वरा करा, त्या गुहेत तुम्ही देखील राहू शकता. भाडं फक्त…