ऑलिम्पिक पदक पटकावल्यावर त्याने कट्टर दुश्मन इस्रायलचे आभार मानलेत
आज गुरुवारी टोकियो ऑलिम्पिक मध्ये सईद मोलाईने पुरुषांच्या ज्युदो कुस्तीत ८१ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले. तो मूळचा इराणचा नागरिक, पण खेळला मंगोलियाच्या ध्वजाखाली आणि आभार मानले कुणाचे तर इराणच्या कट्टर दुश्मनांचे इस्रायलचे.
त्याने रौप्यपदक चक्क इस्रायलला अर्पण केले.
भारत-पाकिस्तान आज आहे तसेच हाडवैर इराण इस्राईल मध्ये आहे. मोलाईच्या बाबतीत असं काय घडलं की त्याने चक्क शत्रू राष्ट्राला पदक अर्पण करावे?
त्याचं असं झालं २०१९ च्या टोकियो येथील विश्व अजिंक्यपद स्पर्धेत मोलाई इराणचे प्रतिनिधित्व करीत होता. अजरबैजान येथील विश्वअजिंक्यपद स्पर्धेतील आपले विश्वविजेतेपद राखण्याचा तो प्रयत्न करीत होता. अचानक इराणच्या अधिकाऱ्यांनी फतवा काढला की मोलाईने उपांत्य फेरीचा सामना मुद्दामून हरावा. त्यामुळे काय होईल तर अंतिम फेरीत आपलाच कट्टर शत्रू राष्ट्राचा सगी मुकी याच्याशी लढावे लागणार नाही.
ती लढत टाळता येईल. ती लढत गमाविल्यास देश गमवावा लागेल. इराणचे हे मनसुबे मोलाईने उधळून लावले. त्याने जग जाहीर केले की इराण हा आपला देश मला असे कृत्य करायला भाग पाडतोय.
मात्र त्याच्या या कृत्यामुळे त्याच्यासाठी इराणचे दरवाजे बंद झाले. एवढेच नव्हे तर त्याला लपून छपून दिवस काढावे लागले. पळता पळता अखेर त्याने जर्मनीत आश्रय घेतला. ऑगस्ट २०१९ मध्ये त्याला जर्मनीचा दोन वर्षांसाठीचा व्हिसा मिळाला चार महिन्यातच त्याने मंगोलियन नागरिकत्व घेतले आणि त्याच्या ऑलिम्पिक सहभागाचा प्रश्न मिटला.
दरम्यान मोलाई आणि इस्रायलचा विश्वविजेता जुडो पटू सगी मुकी यांची मैत्री अधिक घट्ट झाली. दोघेही एकत्र सराव करायचे, विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकमेकांना प्रोत्साहन द्यायचे. टोकियोमध्ये ही गुरुवारी दोघे एकमेकांना प्रोत्साहित करीत होते. मुकी उपांत्यपूर्व फेरीतच हरला पण आपला मित्र मुलाई याने रौप्यपदक पटकविल्याचे पाहून त्याला अधिक आनंद झाला.
टोकियोमध्ये पत्रकारांशी बोलताना मुकीने सांगितलं की मोलाईने रौप्यपदक जिंकले याचा मला अधिक आनंद झाला कारण त्याने गेल्या काही वर्षात जे भोगलं आहे, अनुभवल आहे ते वाईट अपमानास्पद आणि घृणास्पद होते. त्यामुळे त्याला ऑलम्पिक रौप्य पदकाचे मिळालेले समाधान किती मोठे उच्चकोटीचे असेल ते मी समजू शकतो.
त्याचा या पदकापर्यंतचा प्रवास इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल मोलाई आणि मुकी यांच्या मैत्रीचा आणि शत्रू राष्ट्रांच्या खेळाडूंनी एकमेकांना केलेल्या सहकार्याचा किस्सा इस्रायलच्या तडमोर इंटरटेनमेंट आणि एमजीएम यांनी टेलिव्हिजन वेब सिरीज च्या माध्यमातून प्रसारित केला.
मोलाई व मुकी यांना त्या मालिकेच्या कॉपीराईटचा मोबदला भरपूर आर्थिक लाभ झाला. आंतरराष्ट्रीय जुडो फेडरेशनने इराणचा इस्रायली खेळाडूंविरुद्ध आंतरराष्ट्रीय जुडोत घेतलेल्या भूमिकेच्या विरुद्ध चार वर्षांची बंदी ठोठावली आहे. दरम्यान टोकियो ऑलम्पिक मध्ये सुदानचा अब्दुल रसूल याने इस्रायलचा तोहर बूटबूल विरुद्ध आणि अल्जेरियाच्या फत्ते नूरानीने इस्रायलच्या बुटबुल विरुद्ध लढती सोडून दिली.
दोघांनीही पॅलेस्टाइनना पाठिंबा म्हणून असे केले. आयओसी पुढे आता ही दोन नवी आव्हाने उभी राहिली आहेत. ८१ किलो वजनी गटात संभाव्य विजेत्यांमध्ये समावेश असलेला इस्रायलचा सगी मुकी ९वा आला. कदाचित त्याने आपला देश गमाविलेल्या मित्राला मोलाईला त्याच्या पदकाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी तर असे केले नसेल ना? टोकियोमध्ये सध्या याचीच चर्चा सुरू आहे.
- विनायक दळवी
हे ही वाच भिडू.
- टोकियो ऑलिम्पिकमध्ये घोड्यांनाही क्वारंटाईन व्हावे लागले !
- अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी तिच्या ताटातील एक कण उचलला आणि म्हणाले, पदक हीच मुलगी जिंकणार
- लाल मातीच्या पहिलवानांना ऑलिम्पिकच्या मॅटवर पोहचवणारे कुस्तीचे भीष्म पितामह….