माध्यमांवर धुमाकूळ चालला असला तरी खरंच ओमायक्रॉनला घाबरायचं का ?

आठवडाभरापूर्वी सगळं काही आलबेल चाललं असताना अचानक दक्षिण आफ्रिकेतून कोरोनाचाच जनुकीय बदल घडलेला  नवा ‘ विषाणू ‘ याची समाजात प्रसिद्धीमाध्यमात चर्चा व्हायला सुरुवात होते आणि पुन्हा एकदा कोरोनाच्या जुन्या आठवणी ताज्या होतात. मग सर्वसामान्यांच्या चर्चेला सुरुवात असते ती पुन्हा लॉकडाउन होईल का ? कारण लॉकडाउन मधील भयाण जगण्याची झळ सर्वसामान्यांना अधिक बसली आहे, फटका सगळ्यांनाच पडला आहे मात्र त्याची दाहकता गरिबांना अधिक जाणवली आहे.

आता जे सगळं सुरळीत चाललंय ते थांबेल का? मात्र या विषाणूचा प्रतिबंध कसा करायचा याच्या चर्चा फक्त वैद्यकीय वर्तुळात होताना दिसतायेत. 

कोरोनाची साथ जगभरात येऊन साधारणतः दोन वर्ष झाली आहे. त्याचा सामना आपल्या देशाने  कसा केला याची सर्वांनाच जाणीव आहे. जगाच्या पाठीवर कुठलाही एखादा नवीन विषाणू ‘ अवतार ‘ सापडला तर त्याची चर्चा होणारच. भीतीदायक वातावरण पसरविण्यापेक्षा या परिस्थितीत कशा पद्धतीने सजग राहून सतर्कपणे आपले व्यवहार सुरळीत ठेवले पाहिजे ही खरं सांगण्याची वेळ आहे.

सध्या ओमायक्रॉनची माहिती समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहे. काही माहिती बरोबर तर चुकीची माहिती पसरवली जात आहे.

ओमायक्रॉनच्या बाबतीत अजूनही बरेच शास्त्रीय पुरावे येणे बाकी आहे. कारण हा सर्वासाठीच नवीन अवतार असल्याने सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी सावधगिरीने यावर साधक बाधक चर्चा करताना आढळून येत आहे. आजच्या घडीला ओमायक्रॉनच्या बाबतीत जी काही माहिती उपलब्ध आहे त्यावरून या विषाणूचा वेग आधीच्या सर्व विषाणूच्या अवतारांपेक्षा अधिक आहे त्यातल्या त्यात जमेची बाजू अशी की तो घातक नाही. ह्या विषाणूची ज्यांना बाधा झाली आहे त्यांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळलेली आहेत.

त्यातच महाराष्ट्रात जे कुणी रुग्ण आढळलेले आहेत त्या सगळ्यांचीच तब्येत  स्थिर आहे. कुणालाही ऑक्सिजन लागलेला नाही. मग प्रश्न उरतो तो मग काय घाबरण्याची गरज आहे.

तर विषय घाबरण्यापेक्षा ह्याचा संसर्ग ज्या वेगाने होत आहे , जे काही सध्या उपलब्ध पुरावे आहेत ते प्रमाण मानून त्यांच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी आणि त्याचा प्रतिबंध कशा पद्धतीने करता येईल यासाठी आरोग्य यंत्रणेने कंबर कसली आहे.

विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार या विषाणूमुळे कुठेही मृत्यू झाला नसून लोकांनी घाबरून जाऊ नये मात्र कोरोनाच्या अनुषंगाने जे काही नियम आखून दिले आहेत त्याचे मात्र काटेकोरपणे पालन करावे.

कुठल्याही विषाणूत काही वेळाने कालांतराने जनुकीय बदल ( म्युटेशन ) हे होत असतात हे वैद्यकीय क्षेत्रातील सर्व जाणकारांना माहीतच आहे. 

मात्र त्या मूळ स्वरूपाच्या विषाणूने जो काही नवीन अवतार धारण केलाय त्याची गंभीरता जाणून घेण्यासाठी काही कालावधी जावा लागतो, ठोस पुरावे हाती यावे लागतात मगच त्याच्यावर ते भाष्य करत असतात. तो पर्यंत उपलब्ध असलेली उपचार पद्धतीचा आधार घेऊन त्या रुग्णांवर उपचार केले जातात. कोरोनाच्या उपचारपद्धतीत आपल्या डॉक्टरांनी चांगल्या प्रकारे यश संपादन केले आहे. मागच्या काळात काही लाख रुग्णांना बरे करून त्यांना घरी पाठविण्यात आरोग्य यंत्रणा यशस्वी ठरली आहे. काही प्रमाणात चुका झाल्या आहेत, मात्र त्या झाल्या म्हणून तर त्या चुका पुन्हा न करता त्यावर मात करून पुढे जाता आले आहे.

कोरोनाच्या या साथीला रोखण्याची जबाबदारी फक्त शासनाची नसून ती सार्वत्रिक ह्याचे आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा भान ठेवले पाहिजे. शासनाने दिलेले नियम जर पाळणार नाही असे जर कुणी प्रयत्न करत असेल तर त्यावर निश्चितच कारवाई ही होणार. मात्र आपण मागच्या काळात पहिले असेल तर अनेक लग्न समारंभ, राजकीय आणि सामाजिक मेळावे, आंदोलने झाली त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली होती. या घटना वारंवार होऊ नये यासाठी शासनालाच कडक पावले उचलावी लागतील.

कोरोनाच्या काळात आपल्याकडे चर्चा ही वैद्यक शास्त्राचा आधार घेऊन केली जाणे अपेक्षित असताना आपल्याकडे  ‘ एखाद्या व्यक्तीला काय वाटते ? ‘ या विषयावर चर्चा होते, यामध्ये मोठ्या प्रमाणात गैर समज निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात डॉक्टरांनी, आरोग्य विषयक जानकरांनी या काळात भाष्य करणे अधिक सोयीस्कर ठरेल. 

प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार निश्चितच आहे, मात्र त्या मत प्रदर्शनामुळे समाजात काही चुकीचा संदेश तर जात नाही याची दक्षता या काळात घेणे आवश्यक आहे.

गेले काही दिवस आपल्याकडे एक नवीन चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे बुस्टर डोस, म्हणजे ज्याचे दोन डोस घेऊन सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला अशा व्यक्तींना बुस्टर डोस घ्यावा असे मत काही तज्ञांनी व्यक्त केले होते. मात्र अजून संपूर्ण देशात पात्र नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झालेला नाही. देशातील ८५% टक्के लसीसाठी पात्र असणाऱ्या नागरिकांना लशींचा पहिला डोस मिळाला आहे. मात्र त्यांना दुसरा डोस मिळविण्यासाठी अजून मोठा काळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अशा परिस्थितीत बुस्टर डोस देण्यापेक्षा, ज्यांना आरोग्याची अधिक जोखीम आहे असे, कॅन्सर ग्रस्त, एचआयव्ही बाधित, अवयवाचे प्रत्यारोपण झालेले  ज्याची प्रतिकार शक्ती कमी आहे या वर्गातील नागरिकांना अतिरिक्त लसीचा डोस  देता येईल का यावर सध्या तज्ञांची चर्चा सुरु आहे. 

त्यानंतर अजूनही एक मोठा घटक लसीविना आज आहे ती म्हणजे १८ वर्षाखालील वयोगट. त्या मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकारला लवकरच धोरण घ्यावे लागणार आहे. त्या पद्धतीने प्रयत्न सुरु असतीलही मात्र या सध्य परिस्थितीत त्यांच्या लसीकरणाची वाट मोकळी करावी लागणार आहे.

आपल्याकडे अजूनही काही महाभाग असे आहेत की, त्यांना लस घेणे शक्य असतानाही त्यांनी अजून लसीकरण करून घेतलेले नाही. तर त्यांनी सध्या येत्या काळात लसवंत होऊन सुरक्षित होणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर सुद्धा कोरोनाच संसर्ग होतो, हे जरी खरे असले तरी त्या रुग्णाला फारसा त्या संसर्गाचा त्रास झालेला नाही. काही अपवादात्मक उदाहरणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.  मात्र सरसकट परिस्थिती बघितली तर लसीकरणाचा मोठ्या प्रमाणात फायदा नागरिकांना झाल्याचा दिसून आला आहे.

सध्या ओमायक्रॉनचे १० रुग्ण महाराष्ट्रात असून सगळ्यांची प्रकृती उत्तम आहे. या काळात जर अधिक निर्बंध लावू नये असे खरंच प्रत्येक नागरिकाला वाटत असेल तर त्यांना पूर्वीचे नियम ( कारण मधल्या काळात बहुतांश नागरिक ते नियम विसरले ) मास्क, स्वच्छ हात धुणे आणि गर्दी शक्यतो टाळता येईल त्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. 

आपल्याकडे महाराष्ट्रात बऱ्यापैकी सर्व गोष्टी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे विशेष म्हणजे प्रवासाच्या ठिकाणी गर्दी ही होतेच आणि त्याला पर्याय नाही मात्र अशा परिस्थितीत जर आपण मास्क लावलात आणि हात स्वच्छ धूत राहिलो तर या विषाणू पासून दूर राहण्यास नक्कीच मदत होईल. त्यामुळे घाबरण्यापेक्षा सतर्क राहा आणि सुरक्षित राहा.

  • संतोष आंधळे

 

English Summary: At present 10 patients of Omicron are in Maharashtra and all of them are in good health. If every citizen really thinks that more restrictions should not be imposed during this period, then they should try to mask the previous rules (because most of the citizens forgot the rules in the Middle Ages), wash their hands, and avoid crowds as much as possible.

 

Web title: should we fear of omicron variant of corona

Leave A Reply

Your email address will not be published.