जगात पहिल्यांदा ओमिक्रॉनचा पेशंट सापडला तो गौतेंग प्रांत नवं वुहान असल्याची चर्चा सुरूये…

जवळपास दोन वर्षांपूर्वी जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घालायला सुरुवात केली. या व्हायरसचं उगमस्थान नक्की कोणतं, हे अजून कळालं नसलं, तरी कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमधल्या वुहानमध्ये सापडल्याची चर्चा जोमात सुरू होती. त्यावेळेस वुहानच्या ॲनिमल मार्केटचे व्हिडीओ बेक्कार व्हायरल झाले. वेगवेगळे प्राणी कापून-बिपून ठेवलेले पाहून शप्पथ लाय घाण किळस आली.

चीनच्या याच वुहानमध्ये कोरोनाचे भरपूर रुग्ण सापडले. त्यांची नेमकी संख्या कधीच समोर आली नसली, तरी त्यांचं प्रमाण प्रचंड असल्याच्या बातम्या तुम्ही माध्यमांमध्ये वाचल्याच असतील. विशेष म्हणजे कोरोनाच्या निर्बंधामधून मुक्त होणारं पहिलं शहरही वुहानच होतं.

वुहानमधली लोकं पार्ट्या झोडत असल्याचे फोटो आले, तेव्हा भारतासह कित्येक देश दुसऱ्या लाटेशी झगडत होते. कोविडच्या दुसऱ्या लाटेत भारतातल्या अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या सगळ्यातून जगाला दिलासा दिला, तो विविध लसींनी. जगभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालं आणि कोविड काहीसा मंदावला. निर्बंधांमधून दिलासाही मिळू लागला होताच, तेवढ्यात कोविडचा नवा व्हेरिएंट आल्याची बातमी झळकली आणि सगळ्या जगाचे धाबे दणाणले.

या व्हेरिएंटला नाव मिळालं, ओमिक्रॉन. हा व्हायरस पहिल्यांदा आढळला साऊथ आफ्रिकेत. कोविडच्या इतर व्हेरिएंटपेक्षा विशेषतः डेल्टापेक्षा ओमिक्रॉन सातपट घातक असल्याच्या बातम्यांना उधाण आलं. साऊथ आफ्रिकेच्याही फ्युजा उडाल्या होत्याच, तरी त्यांनी लगोलग सगळ्या जगाला सावध केलं.

आता बरेच देश लॉकडाऊनच्या विळख्यातुन नुकतेच बाहेर पडत होते. त्यामुळं, त्यांनी साऊथ आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी टाकली, प्रवाशांसाठी वेगवेगळे नियमही बनवण्यात आले. सगळ्या जगाचे डोळे सध्या आफ्रिकेवर आहेत आणि त्यामागचं कारणही तसंच आहे.

सगळ्या जगाला भीतीच्या छायेत ढकलणाऱ्या ओमिक्रॉनचे जवळपास ९० टक्के रुग्ण आफ्रिकेतल्या गौतेंग प्रांतात सापडले आहेत. या गौतेंगमध्ये सगळीकडे लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण झाली आहे. इकडची विद्यापीठं, कॉलेज आणि इतर सार्वजनिक ठिकाणं बंद करण्यात आली आहेत.

हा एवढा उद्रेक होण्यामागचं कारण काय?

यामागचं ठोस कारण अजूनही समोर आलेलं नसलं, तरी प्रांतात कमी लसीकरण झाल्यानं ओमिक्रॉनचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत असल्याचा अंदाज आहे. सगळ्या दक्षिण आफ्रिकेत जवळपास २२ टक्के लसीकरण झालं आहे. यातही १८ ते ३४ वयोगटात अत्यंत कमी लसीकरण झालं आहे. त्यामुळं गौतेंगमध्ये आणि सगळ्या जगातच चिंतेचं वातावरण आहे.

आता हे गौतेंग आहे तरी कुठं?

गौतेंग या प्रांताचं नाव पडलंय, ते आफ्रिकन भाषेतल्या ‘गोल्ड’ या शब्दावरुन. जोहान्सबर्ग सारखं मोठं आणि महत्त्वाचं शहरही याच प्रांतात आहे. या प्रांताचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. सुमारे दीड कोटी लोकसंख्या असलेल्या या प्रांतात मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या खाणी आहेत. गौतेंगची सीमा कुठल्याही देशाला लागून नसली, तरी तिथं मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. परदेशी नागरिकांची इथे बरीच वर्दळ असते.

त्यामुळंच जसं वुहानमधून जगात कोविड पसरल्याची चर्चा आहे, तसाच संशय आता गौतेंगमधून ओमिक्रॉन पसरेल का याबाबत व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.