स्वातंत्र्यदिनी ग्वालियरमध्ये तिरंगा नाही तर सिंधिया राजघराण्याचा ध्वज फडकवण्यात आला होता !

१५ ऑगस्ट १९४७.

इंग्रजांच्या गुलामीतून देश स्वातंत्र्य झाला होता. अनेक वर्षांच्या परकीय साम्राज्याचा अनुभव घेतल्यानंतर देशभरात स्वातंत्र्याचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत होता. लाल किल्ल्यावर भारतीयांचा प्राणप्रिय तिरंगा मानाने डौलत होता. मात्र देशातील एक श्रीमंत संस्थान समजल्या जाणाऱ्या ग्वालियरमध्ये मात्र अजूनही वातावरण ‘जैसे थे’च होतं. भारतीय स्वातंत्र्याची सोनेरी पहाट ग्वालियरवासियांना मात्र अनुभवता आली नव्हती.

ग्वालियर संस्थानाचं त्यावेळी भारतात विलीनीकरण झालेलं नसल्याने ग्वालियरवर सिंधिया राजघराण्याचीच सत्ता होती. जिवाजीराव सिंधिया हे त्यावेळी ग्वालियरचे महाराज होते. जोपर्यंत देशाचं संविधान तयार होत नाही आणि संस्थानाचं स्वातंत्र्य भारतात काय स्थान असेल याचं चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत ग्वालियरवर सिंधिया राजघराण्याचीच सत्ता असेल अशी भूमिका जिवाजीराव महाराजांनी घेतली होती. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट १९४४७ रोजी देखील ग्वालियरमध्ये सिंधिया राजघराण्याचाच ध्वज फडकवण्यात आला होता.

सरदार पटेलांची यशस्वी मध्यस्थी

जीवाजीराजे महाराजांच्या या भूमिकेला ग्वालियर प्रांतातील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमधून मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. अशा वेळी हे प्रकरण देशभरातील अनेक संस्थानांच्या विलीनीकरणामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे गेलं. पटेलांनी या ठिकाणी देखील यशस्वी मध्यस्थी केली आणि जीवाजीराजे महाराजांना एक पत्र लिहिलं. सरदारांनी जिवाजीराव राजेंची पत्रातून समजूत काढली.

सरदार पटेलांच्या पत्रानंतर १० दिवसांनी ग्वालियर संस्थानात औपचारिकरित्या स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. परंतु तोपर्यंत विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळे या औपचारिक स्वातंत्र्यदिन सोहळ्यात देखील भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आणि सिंधिया राजघराण्याचा ध्वज असे दोन्हीही झेंडे फडकवण्यात आले होते.

पत्रिकामध्ये प्रकाशित बातमीनुसार नौलखा परेड ग्राउंडमध्ये महाराज जिवाजीराव सिंधिया यांनी सिंधिया राजघराण्याचा ध्वज फडकवला होता, तर किला गेटवर तत्कालीन मुख्यमंत्री लीलाधर जोशी यांनी भारताचा तिरंगा फडकवला.

जिवाजीराव महाराजांना राज्यप्रमुख बनवण्यात आलं !

विलीनीकरणाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर ग्वालियरला मध्य भारताची ग्रीष्मकालीन राजधानी बनवण्यात आलं. जिवाजीराव सिंधिया यांना मध्य भारताचे राज्यप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं.

राज्यप्रमुख म्हणून जिवाजीराव सिंधिया यांच्या नियुक्तीच्या सोहळ्यासाठी खुद्द पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ग्वालियरला आले होते. त्यांनीच महाराजांना राज्यप्रमुख पदाची शपथ दिली. याच सोहळ्यात इंदोरच्या यशवंतराव होळकर यांची उप-राज्य प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

जिवाजीराव सिंधिया हे काँग्रेसचे दिवंगत मंत्री माधवराव सिंधिया यांचे वडील आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आजोबा. मध्य प्रदेशच्या स्वातंत्र्योत्तर राजकारणावर या राजघराण्याचा मोठा प्रभाव राहिलेला आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री भाजपच्या वसुंधरा राजे सिंधिया या देखील या राजघराण्याशीच संबंधित आहेत. माधवराव सिंधिया यांच्या त्या बहिण आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आत्या.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.