मनमोहन सिंग यांच्या आदेशावरून शशी थरूर युनो जिंकायला निघाले होते…

दुनिया की कमान भारत के हाथों में, भारत बना UNO (UNSC) का अध्यक्ष तुर्की, पाक समेत कई देश बौखलाए,

सध्या तुम्हाला या बातम्या काही खास ठिकाणी फिरताना दिसत असतील. व्हाट्सअप वर तर मोदींना अभिनंदन, अजित डोभाल याना शुभेच्छा आणि इम्रान खानची आई बहीण पण काढून झालं असेल. तर गड्यानो थांबा.

म्हणजे बातमी खोटी नाही पण लै मोठा तिर मारलाय असं पण नाही. दर महिन्याला आलटून पालटून वेगवेगळे देश या अध्यक्षपदावर बसत असतेत. आता ऑगस्ट महिन्यात भारत पुढच्या महिन्यात आयर्लंड, त्याच्या पुढच्या महिन्यात केनिया पण अध्यक्षपदी बसणार आहे. आपण सोडलं तर इतर कुठल्याच देशाला अध्यक्षपदाचं कौतुक नाही.

खरं तर असलं अध्यक्षपद आपल्याला लै वेळा मिळून गेलंय. पण त्याच्या पेक्षा सगळ्यात मोठं पद भारताला चालून आलं होतं. युनो च्या सरचिटणीस पद ! ते पण कोणाला माहिताय ?  

शशी थरूर !

नजरेने पोरींना आणि फाडफाड इंग्लिशने मोदीजींना घायाळ करणारा लाखो दिलांचा राजा म्हणजे शशीभाई थरूर. डिक्शनरी ज्यांच्यापुढे हार मानते त्या शशी थरूर यांनी युनोच्या सर्वोच्च पदाची निवडणूक लढवली होती. नेमकं काय काय आणि कस घडलं होतं जरा विस्कटून सांगतो.

चंद्रन थरूर आणि सुलेखा मेनन या केरळी दांपत्याचा हा लेक. जन्मला लंडनमध्ये. तिथं का तर त्याच्या वडिलांची द स्टेट्समन या सुप्रतिष्ठित वृत्तसंस्थेच्या नोकरीमुळे त्यांची फॅमिली इंगलंडमध्ये शिफ्ट झाली होती. तस बघायला गेलं तर त्याच्या घराण्यात उच्चशिक्षणाची मोठी परंपरा आहे. थरूरच्या एका काकांनी भारतात रिडर्स डायजेस्टची सुरवात केली होती.

थरूर जन्मला इंग्लंडमध्ये असला तरी त्यांचं शिक्षण भारतातच झालं. मद्रास,मुंबई कलकत्ता अशा सर्व मोठ्या शहरांमधल्या शाळेत तो गेलाय. असं बारा गावच पाणी पिऊन कॉलेज दिल्लीच्या सेंट स्टिफन्समध्ये केलं. 

तिथं गडी प्रचंड फेमस. असणारच म्हणा. दिसायला देखणा, इंग्लिश, हवेत उडणारे केस. वादविवाद स्पर्धा गाजवायचा. त्यालाच तिथल्या स्टुडन्ट युनियन चा अध्यक्ष बनवण्यात आलं होतं.

त्याच टॅलेंट बघून घरच्यांनी शशीला अमेरिकेला पाठवलं. तिथं त्याने लॉ आणि डिप्लोमसी या विषयात एमए केलं. याच विषयात वयाच्या बाविसाव्या वर्षी डॉक्टरेट मिळवण्याचा विक्रम करणारा त्या कॉलेजचा तो पहिला विद्यार्थी ठरला. शशी थरूरची हवा झाली. त्याच वर्षी थेट युनोमध्ये त्याला नोकरी मिळाली.

स्वित्झर्लंडच्या थंडगार हवेत जिनेव्हा मध्ये यूनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रिफ्युजीज (UNHCR) चा स्टाफ मेम्बर म्हणून शशी थरूर रुजू झाले. वेगाने सक्सेस च्या पायऱ्या चढणे शशी थरूर यांची स्पेशालिटी होती. पुढच्या तीन वर्षात UNHCR चे सिंगापूर चे हेड बनले. व्हिएतनामच्या बोट पीपल क्रायसिस मध्ये लोकांना वाचवण्यात आणि त्या रिफ्यूजींच्या आश्रयाची व्यवस्था करण्यात शशी थरूर यांचा मोठा वाटा होता असं मानलं जातं.

अजून काही वर्षांनी UNHCR मध्ये चेअरमनपदासाठी निवडणूक झाली. संपूर्ण जगभरातील स्टाफ मेम्बरनी मतदानकरणार होते. शशीभाई यांनी आपल्या आयुष्यातली हि पहिली निवडणूक लढवली आणि मारली. इथून त्यांच्या करियरचा सुवर्ण काळ सुरु झाला.

१९८९ साली त्यांना यूएन अंडर सेक्रेटरीचा स्पेशल असिस्टंट म्हणून नेमण्यात आलं. राजनैतिक सल्लागार म्हणून त्यांचं पद होतं. जगभरात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली कि शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या पीस किपींग कमिटीमध्ये त्यांचा समावेश होता. युगोस्लाव्हिया मधल्या यादवी युद्धात तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी रणभूमीवर जाणाऱ्या टीमचे हेड शशी थरूरच होते. या काळात त्यांचे आणि घानाच्या कोफी अन्नान यांच्याशी चांगले संबंध निर्माण झाले.

१९९७ साली जेव्हा कोफी अन्नान यांची युनोचा सरचिटणीस म्हणून नेमणूक झाली तेव्हा शशी थरूर देखील त्यांच्या मंत्रिमंडळात गेले. २००१ साली ते पब्लिक इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटचे अध्यक्ष झाले. याकाळात कोफी अन्नान यांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या त्या थरुर यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या. 

त्यांच्यामुळेच युनोमध्ये पहिल्यांदा इस्लामोफोबियावर सेमिनार आयोजित करण्यात आला. यूएनचे अंडर सेक्रेटरी म्हणून त्यांनी चमकदार कामगिरी केली. ज्या प्रमाणे आज नरेंद्र मोदींसाठी अमित शहा आहेत त्याप्रमाणे कोफी अन्नान यांच्यासाठी शशी थरूर होते. 

त्यांच्या या कामगिरीची चर्चा भारतापर्यंत देखील पोहचली. तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे देखील शशी थरूर यांच्यामुळे भारताची कामे युनोमध्ये चांगल्या पद्धतीने पार पडत आहे म्हणून खुश होते.

 अशातच कोफी अन्नान यांची युनोचा सरचिटणीस म्हणून कारकिर्द संपत आली होती. पुढचा सरचिटणीस कोण होणार म्हणून चर्चा सुरु झाली. संपुर्ण जगभरातील देश याला मतदान करणार होते. पुढचा सरचिटणीस आशियाचा असावा असा देखील मतप्रवाह तेव्हा सुरु होता.

भारतीय पंतप्रधानांनी ठरवलं शशी थरूर यांना या निवडणुकीला उतरवायचं.

खरं तर हा महत्वाकांक्षी निर्णय होता. आजवर भारताने असा ट्राय केला नव्हता. या निवडणुकीच्या निमित्तानं आपण देखील महासत्ता बनत चाललो आहे हे भारताला दाखवून द्यायचं होतं.     

 मनमोहन सिंग यांच्या आग्रहामुळे शशी थरूर यांनी आपली उमेदवारी दाखल केली. शशी थरूर यांचं नाव , त्यांचा भूतकाळात युनोमध्ये काम केलेला एक्सपीरियन्स, कोफी अन्नान यांचा पाठिंबा हे सगळं पाहता ते सहज निवडणूक जिंकणार असं वाटत होतं.

विरोधात होते दक्षिण कोरियाचे बान की मुन. याशिवाय अजून अफगाणिस्तान, श्रीलंका वगैरे देशाचे उमेदवार होते. पण खरं आव्हान बान की मून यांचंच होतं.

चार टप्प्यातल्या स्ट्रॉ व्होटिंग पद्धतीने मतदान होणार होते. युनोच्या आजवरच्या इतिहासातली सगळ्यात चुरशीची हि लढत होणार होती. सगळ्या जगात उत्सुकता होती. प्रत्यकजण आपापले हितसंबंध, गटतट शोधण्यात गुंतला होता. मनमोहन सिंग यांनी शशी थरूर यांच्यासाठी सगळी रसद सज्ज केली.

शशी थरूर यांना फुल्ल कॉन्फिडन्स होता पण पहिला टप्पा सुरु झाला तेव्हा हा आत्मविश्वास डळमळीत होण्यास सुरवात झाली. भारतावर जळणारे अनेक देश त्यांच्या विरोधात कारभार करत होते. कित्येकांनी भोळ्या मनमोहन सिंग यांच्या तोंडावर हो म्हणून ऐनवेळी बाजू पलटली होती.

सगळ्यांत मेन होते सुरक्षा समितीमध्ये असणारे पाच देश. या देशांकडे व्हेटो पॉवर असते. यातल्या एकाने देखील नाही म्हटलं तर मामला गंडु शकतो. थरूर यांच्या बाबतीत हेच झालं. अमेरिकेने शशी थरूर यांना निगेटिव्ह मतदान केले. 

अशातच व्हेटो पॉवर असणाऱ्या शेजारी चीनच्या प्रतिनिधीने देखील आपल्या मुलाखतीमध्ये दक्षिण कोरियाचे बान की मुन हेच सरचिटणीस होणार म्हणून सांगितलं. थरूर यांनी इशारा ओळखला, चौथ्या फेरीत त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. 

या निवडणुकीत ते दुसरे आले. एकसुद्धा व्हेटो व्होट न मिळणाऱ्या बान की मुन यांचा विजय झाला. हा पराभव थरूर यांच्या पेक्षा मनमोहन सिंग यांचा होता असं मानलं गेलं.

 २००७ साली थरूर यांनी अंडर सेक्रेटरीपदाचा म्हणून राजीनामा दिला आणि युनोला अखेरचा रामराम करून परत आले. पुढे मनमोहन सिंग यांनी त्यांना त्रिवेंद्रम मधून खासदारकीला उतरवलं, त्यात जिंकल्यावर परराष्ट्र खात्याचा राज्यमंत्री केलं आणि त्यानंतरचा इतिहास आपल्याला ठाऊकच आहे. 

   

   

Leave A Reply

Your email address will not be published.