दहा विकेट्स कुंबळेनी घेतल्या, पण त्याही दिवशी जंटलमन राहुल द्रविड हिरो ठरला
७ फेब्रुवारी, १९९९… फक्त भारतीयच नाही तर कुठलाच क्रिकेट चाहता हा दिवस विसरु शकत नाही. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर त्या दिवशी इतिहास रचला गेला, भारतानं पाकिस्तानवर मात केली आणि त्या इतिहासाचा व त्या विजयाचा हिरो होता… अनिल कुंबळे. भारताच्या या जम्बोनं पाकिस्तानच्या एक-दोन नाही, तर दहाच्या दहा विकेट्स आपल्या नावावर केल्या. पाकिस्तानचे फलंदाज कुंबळेच्या फिरकीसमोर अक्षरश: ढेपाळले. त्या दिवशी कुंबळेनं फक्त कोटलाच नाही तर सगळं जग जिंकलं होतं…
या सगळ्या पिक्चरमध्ये राहुल द्रविडची एंट्री कशी झाली, हे तर सांगतोच. त्या आधी फ्लॅशबॅकमध्ये जाऊयात.
दिल्लीतल्या हवेत थंडी आणि मॅचच्या निकालाचं टेन्शन अशा दोन्ही गोष्टी होत्या. पाकिस्तानकडून राजधानीत हरणं भारतीय संघाच्या चांगलंच जिव्हारी लागलं असतं. त्यामुळे जिंकणं तर भाग होतं… मॅचचा चौथा दिवस होता, पाकिस्तानला जिंकण्यासाठी ४२० रन्स हवे होते. सईद अन्वर, शाहीद आफ्रिदी, इंझमाम उल हक अशी तगडी बॅटिंग असणारं पाकिस्तान काय कमी नव्हतं. त्यामुळं भारतापुढं मोठा पेच होता.
त्यात पाकिस्तानची सुरुवात भारी झाली, डायरेक्ट १०१ ची पार्टनरशिप. पण त्यापुढं मात्र कुंबळेची जादू अशी काय चालली की पाकिस्तानच्या बत्त्या डीम झाल्या. स्कोअरबोर्डवर प्रत्येक विकेटपुढं अनिल कुंबळे हेच नाव लागत होतं. जशा सात-आठ विकेट्स पडल्या, तसा कुंबळेला विक्रम खुणावू लागला. नववी विकेटही त्याच्या नावापुढं जमा झाली आणि सगळ्या भारताला विक्रमाचा अंदाज येऊ लागला. जवागल श्रीनाथ आपल्या सहकाऱ्याचा विक्रम पूर्ण व्हावा म्हणून विकेट पडणार नाही असे बॉल टाकू लागला, तर पाकिस्तानच्या शेवटच्या जोडीनं रनआऊट व्हायचाही प्लॅन आखला, पण कुंबळेनं वसिम अक्रमला आऊट केलं आणि कोटलावर दिवाळी साजरी झाली.
इंग्लंडच्या जिम लेकरनंतर डावात दहा विकेट्स घेणारा कुंबळे हा दुसराच बॉलर ठरला होता. सगळ्या जगात त्याच्या नावाची चर्चा सुरू होती.
एका टीव्ही चॅनलनं तेव्हा राहुल द्रविड सोबत सिरीज एक्स्पर्ट म्हणून करार केला होता. त्या शोचे निवेदक होते ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई. अनिल कुंबळेच्या विक्रमामुळं त्यांनी एक स्पेशल शो आयोजित केला होता, कुंबळेचा सहकारी द्रविड त्या शो ला हजेरी लावणार म्हणल्यावर लोकांमध्ये आणखी उत्सुकता होती. तेव्हा आतासारखं सोशल मीडिया नसल्यानं टीव्हीवर क्रिकेटर काय बोलतात याची लोकं आतुरतेनं वाट पाहायचे.
द्रविड काय बोलणार हे ऐकायला टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांना एक सुखद धक्का बसला कारण शोवर आला स्वतः अनिल कुंबळे. आणि ते शक्य झालं होतं राहुल द्रविडमुळंच.
मॅच झाल्यावर द्रविडनं सरदेसाईंना फोन केला आणि त्यांना सांगितलं की, ”आजचा दिवस ऐतिहासिक आहे. रोज कुठल्या बॉलरला दहा विकेट्स घेणं शक्य नसतं. त्यामुळं तुमच्या शो वर अनिल असायला हवा, मी नाही. त्यानं अशक्य गोष्ट साध्य करुन दाखवलीये.” पण विक्रमादित्य कुंबळेला चाहत्यांच्या आणि फोन कॉल्सच्या गराड्यातून गाठणं कठीण होतं. द्रविडनं तेही काम केलं आणि कुंबळे टीव्ही शो ला गेला आणि त्याची मुलाखतही पार पडली.
खरंतर, त्या दिवशी सगळेच चाहते आनंदात होते. द्रविड शो साठी आला असता आणि त्यानं मैदानावरच्या आठवणी, कुंबळेचा विक्रम झाल्यावरचे क्षण याबद्दल सांगितलं असतं, तर त्यालाही लोकांनी डोक्यावर घेतलं असतं. पण द्रविडनं आपली द्रविडगिरी कायम ठेवली आणि अचाट कामगिरी करणाऱ्या त्या दिवशीच्या सुपरस्टार कुंबळेला मुलाखतीला पाठवलं. आपल्या सहकाऱ्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या प्रसंगी त्यानं त्याला प्रसिद्धीची शिडी चढण्यातही द्रविडनं मदत केली.
त्यादिवशी भारताला दोन हिरो मिळाले, आपल्या बॉलिंगच्या जोरावर पाकिस्तानच्या बत्त्या डीम करणारा कुंबळे आणि प्रसिद्धीपेक्षा सहकाऱ्याच्या कौतुकाला जास्त महत्त्व देणारा राहुल द्रविड…
हे ही वाच भिडू:
- अनिल कुंबळेची स्लेजिंग करणारा मुरली कार्तिक क्रिकेटचा बॅड बॉय म्हणून प्रसिद्ध होता…
- त्यादिवशी सेहवागचं बोलण ऐकलं नसत तर बिचाऱ्या अनिल कुंबळेचं शतक झालं असत.
- कुंबळेचा विक्रम होईल म्हणून वकार रनआऊट होणार होता पण…