वनडे मॅचमध्ये डबल सेंच्युरी करणारा पहिला ‘माणूस’ सेहवाग होता

ग्वालियरचं स्टेडियम, भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका वनडे मॅच. भारताची बॅटिंग एकदम दमदार सुरू होती. पण त्यादिवशी खरा दंगा होता तो एकाच नावाचा, सचिन तेंडुलकर. जगात कुणाला वाटलं नव्हतं की, पुरुषांच्या वनडे मॅचमध्ये डबल सेंच्युरी होईल. पण झाली, तेही दणक्यात. सचिननं दोनशेवा रन काढला आणि सगळ्या भारतात जल्लोष झाला.

सचिनच्या आधी ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कनं महिलांच्या वनडे सामन्यात २२९ रन्स कुटले होते. तेव्हा तर तो रेकॉर्ड सेट झाला होता.

आता तुम्ही म्हणाल, बेलिंडा आणि सचिननं आधी दोनशे केलेत, मग सेहवाग दोनशे करणारा पहिला माणूस कसा, तर उत्तर फार सोपं आहे भिडूलोक. आमच्या गावाकडं पुरुषांना माणूस म्हणतात आणि महिलांना बाईमाणूस. सचिननं पुरुषांच्या वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदा दोनशे केले असले, तरी सचिन पडला क्रिकेटचा देव.

त्यामुळं क्रिकेटच्या देवाचा कित्ता गिरवणाऱ्या विरूकडे वनडे क्रिकेटमध्ये दोनशे करणारा पहिला ‘माणूस’ हा किताब जातो.

एक इतिहास झाला, आता दुसरा इतिहास सांगतो… इंदौरमध्ये घडलेला!

तारीख होती, ८ डिसेंबर २०११. भारतानं वर्ल्डकप जिंकलेलं वर्ष अखेरच्या महिन्यात होतं. भारताची जर्सी काहीशी बदलली असली, तरी त्यावरचं ‘SAHARA’ हे नाव आणि तिरंग्याचे रंग आपलेसे वाटायचेच. इंदौरच्या स्टेडियममध्ये भारत आणि वेस्ट इंडिज सिरीजमधली चौथी वनडे सुरू होती. भारतानं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. क्रीजवर आली गंभीर आणि सेहवाग जोडी.

पहिली ओव्हर जरा निवांत गेली, दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर सेहवागनं फोर मारली. तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर केमार रोचला सेहवागनं आपला ठेवणीतला अप्पर कट मारला आणि मॅच बघणाऱ्या प्रत्येकाला कळलं, आज सेहवाग साहेब मूडमध्ये आहेत.

पुढं सुरू झाला राडा. विंडीजचे बॉलर छाती पुढं काढून बॉलिंगला यायचे आणि खांदे पाडून परत जायचे. सेहवागचा मूड किती पद्धतशीर बसलाय, हे त्यानं ज्या पद्धतीनं थाटात सिक्स मारून फिफ्टी पूर्ण केली त्यावरुनच लक्षात आलं. फिफ्टी पूर्ण झाल्यावर बॅटला आणखीनच धार चढली आणि बोर्डावर रन्सचे आकडे पळू लागले.

बरं फिफ्टी सिक्स मारुन पूर्ण केल्यावर, सेंच्युरी जरा निवांतमध्ये पूर्ण करायची ना. पण निवांत असेल, तो सेहवाग कसला? त्यानं सेंच्युरी पूर्ण केली बाऊंड्री मारुन. पुढं दंगा सुरूच राहिला आणि सेहवागच्या रन्सचा आकडा गेला, दीडशे पार.

त्याकाळी इतर कुठल्या बॅटरनं वनडेमध्ये दीडशे रन्स केले, तरी त्याच्याकडून दोनशे रन्स होतीलच, अशी अपेक्षा नसायची. पण इथं क्रीझवर सेहवाग होता. त्यामुळं लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या, विशेष म्हणजे सेहवागनं त्या पूर्णही केल्या. ४४ व्या ओव्हरचा तिसरा बॉल, बॉलर होता रसेल. सेहवागनं खणखणीत बाऊंड्री मारली आणि वनडे क्रिकेटमधला त्यावेळचा सर्वोच्च स्कोअर (२०१*) उभा केला.

आता आपल्या लाडक्या विरुनं दोनशे केल्यावर त्याला मिठी मारावी, त्याचं अभिनंदन करावं असं आपल्या सगळ्यांना वाटत होतं. मैदानातल्या एका कार्यकर्त्यानं ते करुन दाखवलं. गडी फुलांचा बुके घेऊन मैदानात गेला आणि सेहवागचं अभिनंदन करुन आला.

सेहवागच्या २१९ रन्समुळं भारतानं ४१८ रन्सचा डोंगर उभा केला, वर वेस्ट इंडिजचा २६५ रन्समध्ये खुर्दा उडवला आणि भारतानं निवांतमध्ये मॅच मारली.

त्या डबल सेंच्युरीनंतर सेहवागवर कौतुकाचा वर्षाव झाला. पण त्या सगळ्यात तेव्हाचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीचं वाक्य एकदम महत्त्वाचं होतं, ‘सेहवाग कधीतरी वनडेमध्ये दोनशे मारणार याची मला गॅरंटी होती. पण त्याच्यात एवढी क्षमता होती, की तो वनडेमध्ये पुन्हा दोनशे मारु शकतो.’

अरे हा, एक गोष्ट सांगायची राहिली. सेहवागनं दोनशे रन्स पूर्ण केले तेव्हा नॉन स्ट्राईकला होता- हिटमॅन रोहित शर्मा. सेहवागनं दोनशे मारुन आपलं बालपण भारी केलं आणि हिटमॅननं आपली जवानी.

सचिन कितीही आवडत असला, तरी सेहवागनं बिनधास्त मारलेले दोनशे रन्स लय वर्षांपासून सगळ्यांचे फेव्हरिट आहेत. देवाचा विषय भारी असला, तरी आपल्या वाघानं वाघासारखीच बॅटिंग केली होती, हे आपण विसरू शकतोय.

हे ही वाच भिडू:

English Summary: The master batter from Delhi is the only Indian player to score two triple centuries in his illustrious test career. Sehwag’s innings against Sri Lanka on a turning track and innings against Australia in Melbourne are two of his most remembered knocks. It is noteworthy that the score of 200 and above is achieved by only 8 batters till in ODI’s.

 

WebTitle: On this day in 2011 Virendra Sehwag scored ODI double hundred on this day in indore

Leave A Reply

Your email address will not be published.