पहिल्याच सामन्यात अक्रमने सचिनला विचारलेलं, “खेळण्यासाठी मम्मीची परवानगी घेतलीये का..?

सचिन रमेश तेंडूलकर.

या माणसाने आपल्या २४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत एवढं काही करून ठेवलंय की जागतिक क्रिकेटसाठी आणि क्रिकेटप्रेमींसाठी त्याच्या नावाच्या प्रस्तावनेची गरजच नाही.

जवळपास अडीच दशकं जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवलेल्या या महानायकाच्या आणि जागतिक क्रिकेटच्याही इतिहासात आजचा  दिवस खूप  खास आहे. कारण १९८९ मध्ये आजच्याच दिवशी आपल्या लाडक्या मास्टर-ब्लास्टर सचिनने पाकिस्तानविरुद्धच्या कराची येथील कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं आणि ठीक २४ वर्षानंतर पुन्हा आजच्याच दिवशी २०१३ साली वेस्ट इंडीजविरुद्ध वानखेडेच्या स्टेडीयमवर घरच्या प्रेक्षकांसमोर आपल्या दैदिप्यमान क्रिकेट कारकिर्दीची सांगता केली होती.

सचिनचे जागतिक क्रिकेटमधले रेकॉर्ड आणि त्याची महानता याविषयी खूप काही लिहिलं बोललं गेलंय. आजचा किस्सा सचिनच्या पहिल्या सामन्यातील त्याच्यातल्या आणि वसीम आक्रम याच्यातील एका मजेदार प्रसंगाचा. खुद्द वसीम आक्रम यानेच एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना हा किस्सा सांगितला होता.

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं त्यावेळी त्याचं वय होतं अवघं १६ वर्षे. त्यावेळी सचिन मुश्ताख अहमद आणि अकिब जावेद यांच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात कमी वयाचा तिसरा खेळाडू ठरला होता.

१९८९ सालच्या या दौऱ्यात पाकिस्तानकडे इम्रान खान आणि वसीम अक्रम सारख्या जगभरात दरारा असलेल्या वेगवान बॉलिंगची दुकली होती. सोबतच वकार युनुस देखील पदार्पण करणार होता. पाकिस्तानच्या या वेगवान आक्रमणाचा सामना करणं भल्याभल्यांना जमायचं नाही. सचिन तर केवळ १६ वर्षांचा पोरगा होता.

वसीम अक्रम सांगतो की, आम्हाला माहित होतं की एक १६ वर्षाचा पोरगा भारतीय संघाकडून पदार्पण करतोय. पण आम्ही ज्यावेळी सचिनला बघितलं त्यावेळी आम्हाला असं वाटलं की हा पोरगा फक्त १४ वर्षांचा असावा. म्हणूनच सचिन ज्यावेळी मैदानावर आला त्यावेळी मी त्याला विचारलं होतं,

“क्रिकेट खेळण्यासाठी घरून मम्मीची परवानगी घेऊन आलायेस का..?”

या सामन्यात सचिन सहाव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला होता. सहाव्या क्रमांकावर खेळताना सचिनने २४ बॉल्समध्ये १५ रन्सची इनिंग खेळली होती. सचिनसोबतच आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या वकार युनुस याने सचिनला बोल्ड केलं होतं.

कराचीमध्ये खेळलेली ही इनिंग सचिनसाठी अतिशय आव्हानात्मक ठरली होती. या इनिंगनंतर आपण क्रिकेट सोडण्याचा विचार केला होता, असं खुद्द सचिननेच एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.

कराचीमधली माझ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतली पहिली इनिंग कदाचित माझी शेवटची इनिंग ठरेल असं मला वाटलं होतं. एकीकडून वकार युनुस आणि दुसरीकडून वसीम अक्रम हे दोघेही रिव्हर्स स्विंग करत होते आणि अशा आक्रमणाला तोंड देण्यासाठी माझ्याकडे कुठलाच प्लॅन नव्हता. मैदानावर नेमकं काय चाललंय, हे समजायलाच मार्गच नव्हता.

हे ही वाच भिडू