आजच्याच दिवशी नजफगढचा वीरू, ‘मुलतान का सुलतान’ बनला होता

नजफगढचा नवाब, मुलतान का सुलतान आणि जगभरातल्या बॉलर्सचा कर्दनकाळ कोण होता… वीरेंद्र सेहवाग.

कैसे बतायें क्यू तुझको चाहे, हे गाणं म्हणता म्हणता फोर मारायची डेरिंग फक्त सेहवागमध्ये होती. पहिल्या बॉलला फोर मारण्यापासून सिक्स मारुन सेंच्युरी पूर्ण करण्यापर्यंत सगळं काही सेहवागनं किरकोळीत केलं. प्रेशर वैगरे गोष्टी काय त्याला माहितीच नव्हत्या. फुटवर्क आणि टेक्निकचे पण तो लय लाड करायचा नाही. 

त्याचं ठरलेलं धोरण एकच होतं, बॉल बघायचा आणि हाणायचा. विषय संपला.

याच गोष्टीमुळं सेहवागवर टीकाही व्हायची. लोकं म्हणायची, ‘हा आंधीधुंदी बॅट्समन ए, याच्याकडे काय टेक्निक नाय, वनडे ठीकाय, पण सेहवाग काय कसोटी प्लेअर नाहीये.’

पण सेहवागच्या करिअरमध्ये आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये दोन दिवस असे आले, ज्यामुळं सेहवागची दहशत बसली.

२८ मार्च २००४, भारत विरुद्ध पाकिस्तान पहिली टेस्ट. 

ठिकाण पाकिस्तानचं मुलतान. भारतानं आतापर्यंत बड्याबड्या देशांना त्यांच्या घरात जाऊन हरवलं होतं, पण पाकिस्तानच्या मातीवर टेस्ट मॅच जिंकणं बाकी होतं.

या टेस्टमध्ये मात्र विषय गंभीर होता. भारताची पहिली बॅटिंग आणि ओपनर आकाश चोप्राही हाणायला लागला. आता जिथं आकाश चोप्रा हाणू शकतोय, तिथं सेहवाग काय सुट्टी देणारे का? प्रश्नच नाही. सेहवागचा पॅटर्न वेगळा होता, त्यानं ६० बॉलमध्येच फिफ्टी मारली. त्याचा फॉर्म बघून दोन शक्यता होत्या… हा मारायच्या नादात आऊट होणार, नायतर लय मोठी इनिंग खेळणार.

पाकिस्तानच्या बॉलर्सचं नशीब भंगार होतं, कारण दुसरी शक्यता खरी ठरली. सबंध दिवसात त्यांच्यासाठी एकच गोष्ट आनंदाची घडली, द्रविडची विकेट. संघाचं नेतृत्व करणारा द्रविड ६ रन्सवर आऊट झाला. तो टिकला असता, तर एकीकडे सेहवाग आणि दुसरीकडे ही भिंत म्हणल्यावर पाकिस्तानच्या बॉलर्सनं डोकं आपटून घेतलं असतं.

द्रविड गेला सचिन आला. आता सचिन आल्यावर सगळ्यांची इच्छा असायची की, त्यानंच जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी. पण त्यादिवशी सचिनच्या फोरपेक्षा जास्त टाळ्या, त्यानं एक रन काढला की पडायच्या. कारण लोकांना फक्त सेहवागला बघायचं होतं.

सेहवागनं आपली सेंच्युरी पूर्ण केली १०७ बॉलमध्ये. पण त्यातही एक ट्विस्ट होता, ९९ वर असताना त्यानं शोएब अख्तरला लांबलचक छकडा हाणला आणि सेंच्युरी पूर्ण केली. पुढं १५० बॉलमध्ये १५० रन्स करत त्यानं पाकिस्तानी बॉलर्सला हताश केलं होतंच. वनडेमध्ये पडत नाही, तितका मार अख्तर आणि कंपनीला कसोटीत पडत होता. १९९ वर असताना सेहवागनं शब्बीर अहमदची सगळी ओव्हर खेळून काढली, पुढं अब्दुल रझ्झाकला दोन रन मारत २०० चा आकडा ओलांडला.

दिवसाचा खेळ संपला, तेव्हा भारताचा स्कोअर होता ३५६ रन्स २ विकेट. सेहवाग २२८ नॉटआऊट.

पीच बॅटिंग फ्रेंडली असलं, तरी पाकिस्तानची फौज काय साधी नव्हती. शोएब अख्तर, मोहम्मद सामी, अब्दुल रझ्झाक आणि सकलेन मुश्ताक. सेहवागनं एकालाही जुमानलं नव्हतं आणि पिक्चर अजूनही संपला नव्हता.

२९ मार्च २००४, टेस्टचा दुसरा दिवस. भर ट्रॅफिकमध्ये रिक्षाचं मीटर पडतं, तसे सेहवागच्या रन्सचे आकडे पडत होते. २५० कधीच मागं गेलं, २८१ पार लक्ष्मणचं रेकॉर्डही तुटलं… तेही शब्बीर अहमदला सलग तीन फोर मारुन.

मग आल्या नर्व्हस नाईटिंज.

सिंगल डबल काढत सेहवाग २९५ वर येऊन पोहोचला. रेकॉर्ड, इतिहास सगळं काही पाच रन्सच्या अंतरावर होतं. समोर सचिन होता, शतकाच्या जवळ येऊन आऊट होणं हे काय असतं, हे त्याला चांगलंच माहिती होतं. सेहवागनं ज्या पद्धतीनं छकडा मारुन सेंच्युरी केली होती, त्याच पद्धतीनं तो कायतरी वाढीव करणार याची सचिनला गॅरंटी होती.

त्यानं सेहवागला आधीच सांगितलेलं, ‘जर सिक्स मारायला गेलास तर माझा मार खाशील. मेलबर्नमध्येही तू सिक्स मारायच्या नादात १९५ वर आऊट झालास आणि भारतानं मॅच हारली.’

स्वतः सचिन बोललाय म्हणून सेहवागनंही दोनशेच्या वेळेस घाई केली नव्हती, पण तीनशेच्या वेळी त्यानं सचिनचं ऐकायचं नाही ठरवलं.

तो सचिनकडे गेला आणि म्हणला, 

‘पाजी तुम्हाला मला मारायचं तर मारा. पण मी आता सकलेन मुश्ताकला छकडा हाणणार.’

ओव्हर सुरू झाली, पहिले दोन बॉल सचिन खेळला. तिसरा बॉल… सेहवाग… डॉट. आपलं बीपी वाढलेलं. पण तेवढ्यात चौथ्याच बॉलवर सेहवागनं ठेऊन दिला, बॉल जसा बाऊंड्री बाहेर पडला… तसा कल्ला सुरू झाला. टेस्ट क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी झळकावणारा पहिला बॅट्समन म्हणून सेहवागचं नाव अजरामर झालं. पुढं तो ३०९ वर आऊट झाला, पण थाटात, मुलतान का सुलतान बनून.

हा ९९ वर छकडा मारतो, १९५ वर बाऊंड्री मारतो, पाकिस्तानच्याच मातीत, दमट हवेत त्यांनाच लोळवतो, ५३१ मिनिटं क्रीझवर थांबतो आणि ३९ फोर, ६ सिक्स मारतो. जगातलं सगळ्यात जास्त प्रेशर ज्या क्षणी असेल, त्या २९९ च्या स्कोअरवर हा थेट सकलेन मुश्ताकला सिक्स मारतो. ऐन भरातल्या सचिनला हा फिका पाडू शकतो…

हा वीरेंद्र सेहवाग आहे भिडू… हा खरंच कायपण करू शकतो.

पुढं याच दिवशी सचिन १९४ वर असताना, द्रविडनं डाव घोषित केला. सेहवागच्या ट्रिपल सेंच्युरीपेक्षा या राड्याची जास्त चर्चा झाली. त्याबद्दल बोल भिडूनं लिहून ठेवलंच ए…

जडेजा १७५ रन्सवर असताना डाव घोषित झाला आणि नॉटआऊट १९४ रन्सवाला सचिन आठवला…

पण सेहवागनं हे काय मनावर घेतलं नाय, त्यानं ४ वर्षांनी साऊथ आफ्रिकेविरुद्ध आणखी एक ट्रिपल सेंच्युरी मारली. टेक्निक, फुटवर्क सोडा… सेहवाग आपल्या जिगरमुळे बादशहा ठरला, नजफगढ पासून मुलतानपर्यंत.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.