एकेकाळी पुण्यातलं रास्ता पेठ हे मद्रासी लोकांसाठी ‘मिनी चेन्नई’ होतं…
कोणतंही शहर म्हटलं की त्यांचा एक सांस्कृतिक वारसा असतो. पुणे तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्यात अनेक जाती-धर्माचे लोक अगदी गुण्या-गोविंदाने नांदतात, पुण्यातल्या पेठांचा इतिहास पहिला तर लक्षात येते, प्रत्येक पेठेमध्ये काही ठरविक जाती-समूहाचे लोक अधिक प्रमाणात राहतात.
आता हेच पहा ना, केइम हॉस्पिटलचा परिसर रास्ता पेठ म्हणून ओळखला जातो. रास्ता पेठेला मद्रासी लोकांचा मोठा इतिहास लाभलेला आहे. तुम्ही जेव्हा रास्ता पेठेत फिरता तेव्हा तुम्हाला काही काळ तुम्ही चेन्नईमध्ये तर फिरत नाही ना? असा भास होतो.
रास्ता पेठ आणि दाक्षिणात्य लोक हे समीकरण पेशव्यांच्या काळापासूनचं आहे.
बोल भिडूने रास्ता पेठेतील दाक्षिणात्य खाद्य संस्कृती व तेथील एकूणच वातावरण दाक्षिणात्य कसं काय झालं? यांचा शोध घेतला. तेव्हा समोर आलेली माहिती खूप रंजक आहे.
मुदलियारांनी म्हणजे मद्रासी लोक पेशव्यांकडे सावकार म्हणून काम करत. हिशोबाला चोख आणि कामांमध्ये प्रामाणिक त्यामुळे थोड्याच काळात मुदलियारांनी लोकांनी महाराष्ट्रातील लोकांचा विश्वास जिंकला. पुढे सरकारी नोकऱ्यांच्या निमित्ताने अनेक मुदलियारी पुण्यात आले.
पेशव्यांपासून हे मुदलियारांनी लोक रास्ता पेठेत राहत, पुढे ही संख्या वाढत गेली. महाराष्ट्रीयन वाड्यांमध्ये मद्रासी लोक भाड्याने राहू लागले. वाड्यांमध्ये सांबाराचा सुगंध दरवळू लागला. महाराष्ट्रीयन संस्कृती आणि दाक्षिणात्य संस्कृती रास्ता पेठेतल्या वाड्यांमध्ये गुण्या-गोविंदाने नांदत.
रास्ता पेठेत असलेल्या अपोलो थियटरमध्ये कित्येक दाक्षिणात्य सिनेमे हाऊसफूल होत असतं.
अपोलो आणि दाक्षिणात्य सिनेमा हे समीकरण अजून देखील कित्येकांच्या लक्षात आहे. रास्ता पेठेत राहणारे कित्येक मराठी बांधव आज देखील उत्तम तमिळी, तेलगू भाषा बोलतात, त्यामुळे पुण्यात मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा बोलत असले तरी रास्ता पेठेत तमिळी, तेलगू देखील सर्रास बोलली जाते.
या परिसरातला गणपती देखील मद्रासी गणपती म्हणून ओळखला जातो. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे दाक्षिणात्य पद्धतीने झालेले आहे. हा गणपती एक जागृत गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिराची देखभाल देखील श्री हरिहर भजन समाज करतो.
या मंदिरातील सर्व पूजा या दाक्षिणात्य पद्धतीने होतात. या मंदिराच्या आतमध्ये बालाजी, मारुती, कार्तिकस्वामी, पद्मावती यांची मंदिरे आणि छोटे शिवलिंग आहे.
परशुराम ब्रदर, हॉट लाइन, शुक्ला कॉफी यासारखी दुकाने गेली कित्येक वर्ष कॉफी पाऊडर आणि सांबार मसाले आणि दाक्षिणात्य लोकांना लागणारे सामान पुरवणारी दुकाने आहेत.आता आपले मराठी बांधव देखील यांच्या दुकानातून सांबार मसाला आणि फिल्टर कॉफी पाऊडर घेतात.
केळ्यांच्या वेफर्सची म्हणजेच हॉट चिप्सची कित्येक दुकांने तुम्हाला सहज रास्ता पेठेत दिसतील.
दाक्षिणात्य साड्या, लहान मुलांचे कपडे यांची देखील अनेक दुकाने रास्ता पेठेत आहेत. केईम हॉस्पिटलच्या समोरच एका गल्लीमध्ये भाजी मंडई भरते, या गल्लीलाच खाऊ गल्ली देखील म्हणतात. येथे तुम्हाला सकाळी संपूर्ण पुण्यातील दाक्षिणात्य पदार्थाचे चाहते असलेले खव्वये जमा झालेले दिसतील.
इडली, मेदूवडा, डोसा, इडली वडा, पुडी इडली, मसाला इडली, दक्षिण दावणगिरी डोसा यासारख्या कित्येक दाक्षिणात्य पदार्थांची चव चाखता येईल. या गल्लीत घुसताच सांबाराच्या सुगंधाने पाऊले आपसूक तिकडे वळतात. कित्येक साऊथ इंडियन मेस देखील इकडे चालविल्या जातात.
इडली – डोश्याचे पीठ घेण्यासाठी तर कित्येक लोक दुरून रास्ता पेठेत येतात. साऊथ इंडियन बँक, साऊथ इंडियन हॉस्टेल्स असे कित्येक बोर्ड तुम्हाला रास्ता पेठेत सहज दिसतील. भाजी मंडई जवळच दाक्षिणात्य लोकांचे आराध्य देवस्थान असलेले अय्यपा स्वामी मंदिर देखील येथे आहे. या मंदिरासाठी एक सुंदर कमान मुख्य रस्त्याजवळ उभी केली आहे. या कमानीतून आत प्रवेश केला की मिनी चेन्नई सुरू होतं.
पोंगल सणांच्या वेळेस तर दाक्षिणात्य संगीताने या परिसरात एक वेगळ्या प्रकारची वातावरण निर्मिती होते. भरतनाट्यम शिकवणारे कित्येक क्लासेस संध्याकाळी अजून देखील रास्ता पेठेत भरतात.
१९१८ साली रास्ता पेठेत राहणाऱ्या काही दाक्षिणात्य महिलांनी एकत्र येऊन सरस्वती विद्यालय युनियन म्हणजेच एस. व्ही.युनियन या शाळेची स्थापना केली. आज देखील या शाळेत सर्वाधिक दाक्षिणात्य विद्यार्थी शिक्षण घेतात.
रास्ता पेठेत देखील इतर पेठाप्रमाणे कित्येक वाडे होते, हे वाडे पाडले गेले, वाड्यातील लोकांचे इतर जागी स्थलांतर करण्यात आले, अनेकांची मूले आयटीमध्ये कामाला लागली, मोठे फ्लॅट, पार्किंग यासाठी सुखसुविधासाठी अनेक दाक्षिणात्य लोकांनी रास्ता पेठ सोडली, पण पेठेतील संस्कृती अजून देखील तशीच आहे.
रास्ता पेठेची ती ओळख देखील तशीच अबाधित आहे, पुण्यातलं मिनी चेन्नई.
हे ही वाच भिडू
- एक काळ होता पुणे महापालिकेत कलमाडींच्या डोळ्यात डोळे घालून बोलायची कोणात हिंमत नव्हती
- पुणेकरांना मध्यरात्री पोहे खाण्याची सवय लावली ती नळस्टॉपच्या अमृतेश्वर हॉटेलने
- पुणे कितीही स्मार्ट झालं तरी रेनकोटसाठी आजही “रमेश डाईंग” हाच ब्रॅण्ड आहे