एकेकाळचा रनमशीन असलेला अजय शर्मा हा अझरच्या मॅच फिक्सिंगमुळे कायमचा गंडला..

१३० करोड पेक्षा लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात क्रिकेटबद्दल लोकांना जाम आकर्षण आहे. भारतातले जवळपास निम्मे अर्धे लोक भारतीय संघात जागा मिळावी म्हणून खेळतात, तर अर्धे असंच शौक म्हणून गल्ली क्रिकेट खेळतात. अनेक खेळाडू जीवापाड मेहनत घेऊन संघात सिलेक्ट होतात. पण कुठंतरी माशी शिंकते आणि तिथूनही ते बाद होतात. अजय शर्मा उमा अनेकांमधला एक…

अजय शर्मा हा दिल्लीचा रांगडा बॅट्समन. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याला रनमशीन म्हणून ओळखलं जायचं.

बरेच रेकॉर्ड अजय शर्माच्या नावावर होते मात्र त्याला पुरेशी संधी मिळाली नाही आणि तसही त्याला जितक्या संधी मिळाल्या त्याचं शर्माला सोनं करता आलं नाही. अजय शर्माचं क्रिकेट करियर हे एक निराशाजनक करियर म्हणून ओळखलं जातं.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अजय शर्माने ६७.४६ च्या सरासरीने धावा जमवल्या होत्या. पण अजय शर्माला फक्त १ टेस्ट मॅच खेळायला मिळाली. 

किमान भारतीय संघात येनकेन प्रकारे शर्माची निवड झाली खरी पण मॅच फिक्सिंगचं स्कँडल प्रकरण भोवलं आणि लाईफ टाइम क्रिकेट बॅन अजय शर्माच्या क्रिकेट करियरला लागला. पुढे कोर्टाने हा बॅन हटवला पण तोवर अजय शर्मा क्रिकेटमधून गायब झाला होता.

१९८८ साली चेन्नईमध्ये वेस्ट इंडिज विरोधात अजय शर्मा आपली पहिली आणि शेवटची टेस्ट मॅच खेळला. या टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये अजय शर्माने ३० आणि २३ धावा काढल्या. पण नंतर अजय शर्माला संधीच मिळाली नाही. १९८८ साली वनडेमध्ये सुद्धा अजय शर्माला संधी मिळाली होती. वनडे करियरमध्ये शर्माने पाच वर्ष काढली आणि ३१ सामने तो खेळला. यात ३ अर्धशतकांचा समावेश होता.

२००० साल हे अजय शर्माच्या करियरला मोठा धक्का देणारं ठरलं. मॅच फिक्सिंगचं प्रकरण तेव्हा ऐन भरात होतं, यात सट्टेबाजांशी संबंध ठेवल्याच्या कारणावरून अजय शर्मा दोषी म्हणून सापडण्यात आला तेव्हा त्याचं करियर संपलं होतं. पुढे २०१४ साली कोर्टाने अजय  शर्मावर लागलेला लाईफ टाइम बॅन हटवून त्यांना निर्दोष मुक्त केलं. 

ऑगस्ट २०१७ साली अजय शर्माने क्रिकेटच्या सगळ्या फॉर्मॅटमधून संन्यास घेतला. पुढे कोचिंग आणि व्यवसायात अजय शर्मा हात अजमावत राहिले. पण दिल्लीकडून खेळताना रणजी आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये इतके रन आणि रेकॉर्ड अजय शर्माला वाचवू शकले नाही. एकेकाळचा रनमशीन म्हणून अजय शर्मा लोकप्रिय होता. पण फुकटचा लाईफ बॅन त्याच्या क्रिकेट करियरला संपवून गेला.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.