एकेकाळी शिवसेनेने मुस्लीम लीग सोबत युती केली होती

नुकताच MIM पक्षाकडून आघाडी सरकारला युतीची ऑफर काय आली अन राज्याच्या राजकारणात युतीचे नवे समीकरणं अस्तित्वात येणार का याच्या चर्चा चालू झाल्या. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोमणा मारला कि, “हिंदुह्रदयसम्राट ऐवजी शिवसेनेने आता जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं दिसतय, म्हणून ते MIM सोबत आघाडी करतायत”. 

खासदार संजय राऊत यांनी “शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे पक्ष छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या विचारांचे आहेत. औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकतात, ज्यांचा आदर्श औरंगजेब आहे. त्यांच्यासोबत युती शक्य नाही”, असं म्हणत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. 

सेनेला युतीची ऑफर द्यायची आणि अशा चर्चा घडवून आणायच्या कि सेना सत्तेसाठी आता एमआयएम सोबत जाणार. शिवसेनेच्या बदनामीसाठी भाजपकडून प्रयत्न सुरू अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे.

तर मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, “MIM हि भाजपची बी टीम आहे. अफजल गुरूला फाशी देऊ नका म्हणणाऱ्या आणि मेहबुबा मुफ्तीसोबत सत्तेसाठी मागणी करणाऱ्या MIM सोबत आम्ही जाणार नाही. सत्ता मिळत असली तरी हि युती शक्य नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

बरं आता कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी असलेली सेने MIM सोबत युती करो अथवा न करो पण सेनेचा इतिहास पाहता हे देखील माहिती समोर येते कि, सेनेने याआधी देखील मुस्लिम लीग, दलित पँथर, काँग्रेस, पक्षांसोबत उघड छुपी युती केलीच. याला उपवाद ठरला तो फक्त कम्युनिस्ट पक्ष. असो तर, सेनेने आपल्या राजकीय वाटचालीतील पहिली-वहिली अधिकृत युती केली ती १९६८ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आणि तीही प्रा. मधू दंडवते याच्या प्रजासमाजवादी पक्षाबरोबर !  

पण मुद्दा हा आहे कि,

आत्ता मुस्लिम पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या MIM ला शिवसेना रझाकारांचा पक्ष म्हणत असेल, हि युती शक्य नाही असं म्हणत असेल पण कधी काळी याच शिवसेनेने मुस्लिम लीग सोबत युती केली होती.

१९७९ मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेना आणि मुस्लीम लीग ची युती झाली होती.

थोडक्यात राजकारणात आपलं वर्चस्व कमी होऊ नये म्हणून तत्त्व, विचारसरणी आणि भूमिका बाजूला ठेवून कोणाहीबरोबर, अगदी सहजपणे हातमिळवणी, समझोता, आघाडी वा युती करण्यास आपल्या कित्येक वर्षांच्या वाटचालीत शिवसेनेनं कधीही मागे पाहिलेलं नव्हतं. तसं तर कांग्रेसशी असलेलं शिवसेनेच पडद्याआडचं साटलोट तर पहिल्या दिवसापासूनच सुरू होतं आणि १९८० चे दशक उजाडलं तरी काँग्रेसशी झालेली ही छुपी ‘युती’ अखंडपणे चालू होती याचं फारसं आश्चर्य कुणाला वाटलं नाही मात्र मुस्लिम लीग सोबत सेनेचं कसं जुळलं हे जरा न पचणारीच गोष्ट होती.

कारण सेनेसारखे एक उजवी विचारसरणी आणि तशीच एक उजवी कट्टर विचारसरणी असलेला हा मुस्लिम लीग पक्ष होता. दोन उजव्या संघटना एकत्र आल्या त्यामुळे अनेकांच्या भुवयाच उंचावल्या होत्या.

हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा काळ म्हणजे १९७३-७४ चा. याचं निमित्त ठरली मुंबई महापालिकेची निवडणूक.  या दरम्यान सेनेने मुंबई महापालिकेतील महापौरपदाची निवडणूक जिंकण्यासाठी मुस्लिम लीगच्या नगरसेवकांना सोबत घेतलं होतं.

पण या युतीची लिंक लावली जाते ती म्हणजे १९७० च्या दशकात सेनेने आपला माणूस महापौरपदी निवडून आणण्यासाठी मुस्लिम लीगची मदत घेतली होती.

१९७२ मध्ये शिवसेना नेते सुधीर जोशी मुस्लिम लीगच्या पाठिंब्यावर मुंबईचे महापौर झाले होते असं सांगण्यात येतं.  पण या पाठिंब्यासाठी एक अट टाकली गेली होती ती म्हणजे, महापौरांना मुस्लिम लीगच्या नगरसेवकांना एक सूट द्यावी लागायची जेंव्हा सभागृहात वंदे मातरम गायले जात असत तेंव्हा तटस्थ राहिले जावे लागायचे. 

इतकंच नाही तर आणीबाणीनंतर मुस्लिम लीगचे नेते जी एम बनातवाला यांच्याबरोबर ठाकरे यांनी मस्तान तलावावर जाहीर सभाही घेतली होती. 

या दरम्यान एका रॅलीला संबोधित करण्यासाठी हे दोन नेते एकत्र एकाच सतेज वर आले होते. त्यांना एकत्र मंचावर आणणे हा एक मास्टरस्ट्रोकच होता. हा कार्यक्रम नागपाडाजवळील मस्तान तलाव मैदानावर आयोजित करण्यात आला होता..

सय्यद मोहम्मद झैदी यांनी या दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्याची कामगिरी केली होती. बनतवाला-ठाकरे भेटीमुळे प्रेरित होऊन सय्यद नजर हुसैन यांनी दोघा नेत्यांना त्याच दरम्यान मीरा रोड येथील नया नगर या मुस्लिम वसाहतीच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले होते.  सय्यद मोहम्मद झैदी म्हणजे आधी काँग्रेसमध्ये होते पण त्यांनी नंतर मुस्लिम लीग मध्ये प्रवेश केलेला.

बनतवाला आणि ठाकरे यांचे एकत्र येणे म्हणजे दोन ध्रुवांच्या भेटीसारखे होते. दरम्यानच्या काळात या दोन मोठ्या नेत्यांच्या भेटीमुळे वातावरण काही प्रमाणात बदलले होते. असो पण १९७९ मध्ये झालेली ही युती फार काळ टिकली नव्हती. 

 पण राजकीय विश्लेषकांच्या मते शिवसेनेने मुस्लिम लीग सोबत युती करणं हि बाळासाहेबांची चूक ठरली. कारण शिवसेनेचे हिंदुत्ववादी धोरण पाहता सेनेवर या युतीचा एका प्रकारचा टॅग लागला. पण हाही मुद्दा याठिकाणी विचारात घेणं महत्वाचं आहे ते शिवसेनेनं या दरम्यान हिंदुत्ववादाची भूमिका घेतलीच नव्हती सर्व खरी अधिकृत भूमिका सेनेने १९८७ नंतर घ्यायला सुरुवात केली. 

असो तर सेनेने सत्तेसाठी अशा बऱ्याच आघाड्या आणि युती केल्या होत्या. आता जरी पक्ष प्रमुखांनी MIM सोबत सेना किंव्हा आघाडीतील पक्ष युती करणार नाही हे स्पष्ट केलं असलं तरी एक मात्र लक्षात घेणं महत्वाचं आहे ते म्हणजे राजकारणात काहीही होऊ शकतं….त्यामुळे बघूयात पुढे काय काय होतं ते…

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.