चीनची वन चाईल्ड पॉलिसी नेमकी काय होती?

सध्या चिनी संकट लड्डाखमध्ये घोंगावातय. दोन्ही कडंच सैन्य एकमेकांवर दिशेने तोफा रोखून उभे आहेत. कधीही युद्धाला तोंड फुटेल अशी शक्यता आहे.

आपल्या मीडिया वाल्यांनी तर ऑलरेडी टीव्हीवर युद्धही सुरू केलंय.परवा काही टीव्ही अँकरनी एक अजब युद्ध शास्त्र सांगितलं. म्हणे यावेळी चीनला भारताविरुद्ध जिंकता येणे अशक्य आहे.

कारण काय तर चीन मधली वन चाईल्ड पॉलिसी.

वन चाईल्ड पॉलिसीमुळे चीनमधल्या प्रत्येक घरात एक एकच मूल असल्यामुळे देशासाठी प्राण अर्पण करण्याची वृत्ती तिथे कमी आढळत आहे.

आता हे तर्कशास्त्र बरोबर की चूक हे काय आपण ठरवू शकत नाही.

आपल्याकडे या योजनेबद्दल अनेक समज गैरसमज असतात की चीन मध्ये जर एक पेक्षा अधिक मूल झालं तर त्या मुलाला मारून टाकतात, किंवा बापाला गोळ्या घालतात. अशा अनेक अफवा आपण लहानपणी ऐकलेल्या असतात.

अशा वेळी प्रश्न पडतो की चीनची वन चाईल्ड पॉलिसी नेमकी काय होती?

साधारण साठच्या दशकात जगभरात वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम समोर यायला सुरू झाले होते. येत्या काळात जगभरातील साधनसंपत्ती प्रत्येकाला पुरेल याची शक्यता कमी आहे हे अभ्यासातून कळाल होतं. लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना सुरू झाल्या.

मुख्य प्रश्न विकसनशील देशांचा होता. विशेषतः चीन आणि भारत.

भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात जनजागृती करणे, कुटुंबनियोजनाचे उपाय सुचवणे असे कार्यक्रम राबवले. तरीही आणीबाणी काळात संजय गांधींच्या कृपेने दडपशाही झाली पण जनतेने त्यांना धडा शिकवला.

पण जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या चीनची गोष्टच और होती.

त्यांच्याकडे लोकशाही नव्हती. देश महाप्रचंड पसरलेला होता. माओच्या एकाधिकार असलेलं नेतृत्वाखाली कम्युनिस्ट सरकार होत.

माओने एक कुटुंब दोन मुलं ही योजना आखली. सर्व यंत्रणेला कामाला लावलं.

1970 ते 1976 या सहा वर्षात चीनच्या लोकसंख्या वाढीचा दर निम्म्यावर आला. पण या यशात आणखी भरपूर कारणे होती. या काही वर्षांत खूप मोठे दुष्काळ पडून गेले होते, सांस्कृतिक क्रांती सारखी मोठी घटना घडून गेली होती. या सगळ्यात मृत्यू दर देखील वाढला होता.

1976 नंतर परत लोकसंख्यावाढीचा दर वाढला. चीनची लोकसंख्या 100 कोटीच्या दारात जाऊन पोहचली.

चीनमध्ये माओच्या मृत्यूनंतर नेतृत्वाचा संघर्ष सुरू झाला होता. माओची पत्नी व तिच्या सहकाऱ्यांना बाजूला करण्यासाठी अखेर डेंग या एकेकाळच्या माओच्या वारसदाराला त्याची शिक्षा कमी करून बोलवण्यात आलं.

डेंगने येणाऱ्या नव्या सहस्त्रकाला सामोरे जाण्यासाठी चीन मध्ये अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्याने कम्युनिस्ट चीनची पोलादी अर्थव्यवस्था खुली करण्याचा चमत्कार घडवला. चीन मध्ये नव्या बदलाचे वारे वाहू लागले.

त्यातच डेंगने वन चाईल्ड पॉलिसी म्हणजेच एक अपत्य योजना जाहीर केली.

याची तयारी एक वर्ष आधी पासून सुरू झाली होती. तरुण लग्न झालेल्या जोडप्याला एक मुलावर थांबण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत होतं. पण अजून याचं कम्पलशन नव्हतं.

पण 25 सप्टेंबर1980 साली कायदा आणून ही योजना कडकपणे राबवण्यास सुरवात केली.

प्रत्येक बाळाच्या जन्मानंतर स्त्रीला गर्भ नियोजनाची साधने सरकार कडून वाटली गेली व त्याचा वापर अनिवार्य केला गेला. ज्यांना तरीही दुसरे मूल होते त्यांना त्यांच्या उत्पन्नाच्या विशिष्ट टक्क्यांपर्यंत मोठा दंड आकारण्यात येऊ लागला.

शासकीय योजनांमधून या मुलांना व त्यांच्या कुटुंबियांना बेदखल करण्यात आलं.

ज्यांनी एक अपत्य पॉलिसी स्वीकारून कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केली आहे त्यांना बक्षीस म्हणून काही रक्कम, सर्टिफिकेट दिल गेलं.

याचा अर्थ गोळ्या घालणे इतपत याची दडपशाही नव्हती. काही ठिकाणी बळजबरीने गर्भपात करण्याच्या शस्त्रक्रिया केल्या गेल्या. समाजातून वाळीत टाकण्याचे वगैरे प्रकार घडले.

या योजनेमध्ये काही अल्पसंख्याक समाजाला सूट दिली होती.

ज्या पालकांचे पहिले बाळ अपंग आहे त्यांना दुसऱ्या बाळाची परवानगी दिली गेली. जुळया मुलांना कोणतीही कारवाई होत नव्हती.

चीनमध्ये फक्त एकच राजकीय पक्ष आहे आणि त्यांचीच तिथे हुकूमशाही सत्ता चालते. डेंगने आपल्या पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला स्वतःपासून जनतेला उदाहरण घालून देण्याचं आवाहन केलं.

लाखो कार्यकर्ते चीनच्या कानाकोपऱ्यात फिरुन एक अपत्य योजनेच महत्व पटवुन देऊ लागले.

एकदा एखाद्या गोष्टीला राष्ट्रभावनेशी जोडलं की चिनी लोक बेभान होतात. जवळपास 40 % चिनी जनतेने वन चाईल्ड पॉलिसी प्रत्यक्षात आणली. चीनने जगाच्या नाकावर टिच्चून लोकसंख्येचा दर कमी करून दाखवला.

पण या योजनेचे अनेक दुष्परिणाम देखील चीनला भोगावे लागले. अनेकांनी मुलींचा जन्मच होऊ दिला नाही. स्त्री पुरुष लोकसंख्येमध्ये कमालीचा फरक पडला. गेल्या काही वर्षात जन्म दर कमी झाल्यामुळे तरुणांची संख्या देखील कमी होऊन देशात वृद्ध व्यक्तींचं प्रमाण वाढलं.

काही जणांनी दंड होऊ नये म्हणून आपली मुले अनेक वर्षे लपवुन ठेवली

किंवा त्यांना दत्तक दिलं असल्याचं खोटं दाखवलं. चीनमध्ये नोंद नसलेल्या बाळांची संख्या अफाट वाढली.

जुळया मुलांना दंडातून सवलत मिळत असल्यामूळे काही जणांनी फर्टिलिटी मेडिसिन वापरून जुळी मुले जन्माला घातली.

यासर्व प्रयोगाचा महिलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला. मातांच्या मृत्यूचं प्रमाण देखील प्रचंड वाढलं. जगभरातून चीनवर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

अखेर 2015 साली चीनने एक अपत्य योजना अधिकृतपणे बंद करणार असल्याचे सूतोवाच केले.

सध्या चीनमध्ये एक पेक्षा अधिक मुले झाली तर कोणतेही कारवाई होत नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.