एका कविता संग्रहामुळं प्यासा पिक्चरची अख्खी स्टोरीच बदलली

‘पेईंग गेस्ट’, ‘नौ दो ग्यारह’ आणि ‘मिस इंडिया’ बरोबरच एस.डी.बर्मन यांनी संगीतबद्ध केलेला गुरूदत्त यांचा ‘प्यासा’ हा १९५७ सालीच पडद्यावर आला होता. या चित्रपटाची कथा एका कवीची कथा होती. पण गुरूदत्तनी सुरुवातीला या चित्रपटाची जी कथा लिहिली होती त्या कथेतला नायक काही कवी नव्हता. एक चित्रकार होता. 

तेव्हा या कथेत दोन नायिका नव्हत्या. माला सिन्हाने साकार केलेली मीना ही एकच नायिका या चित्रपटात होती. पुढे वहिदा रहेमानने साकार केलेली गुलाबू ही आणखी एक नायिका या चित्रपटात आली. ती आल्यावर गुरूदतनी या चित्रपटातील नायकाला चित्रकारा ऐवजी लेखक बनवला. त्याच वेळी साहिर लुधियानवीच्या ‘परछाईयाँ’ या काव्यसंग्रहात असलेल्या काही कविता गुरूदत यांच्या वाचनात आल्या. त्या कविता वाचून गुरूदत्त इतके प्रभावित झाले की त्यातल्या काही कविता आपण ‘प्यासा’त टाकल्या पाहिजे, असं त्यांना वाटू लागलं. त्यासाठी ‘प्यासा’च्या नायकाला त्यांनी एकदम लेखकाचा कवी करून टाकलं.

‘परछाईयाँ’ तील साहिर यांच्या तशा सगळ्याच कविता गुरूदत्तना जाम आवडल्या होत्या, पण त्यातही  “जिन्हे नाज है हिंद पर वह कहाँ है” या कवितेने त्यांना एकदम झपाटून टाकलं. ही कविता कोणत्याही परिस्थितीत ‘प्यासा’त टाकायचीच असा चंग त्यांनी बांधला. त्यासाठी ते आणि त्यांचे लेखक अब्रार अल्वी एखादी चांगली सिच्युएशन शोधत होते. ही सिच्युएशन त्यांना सापडली हैद्राबादच्या एका कोठीवर. त्याची स्टोरी सुद्धा जरा डेंजर आहे.

एकदा गुरुदत्त अब्रार अल्वीना आपल्याबरोबर घेऊन हैद्राबादच्या त्यांच्या डिस्ट्रिब्युटरला भेटायला गेले होते. तेथे त्या डिस्ट्रिब्युटरने या दोघांना एका कोठीवर गाणं ऐकायला नेलं. त्या कोठीवरची गाणारी सात महिन्यांची गरोदर होती. यामुळे कोठीवरच्या गाणाऱ्या गातागाता नाचत असल्यातरी ती मात्र नाचत नव्हती; पण दारूच्या नशेत तिचं गाणं ऐकायला आलेल्या हैद्राबादच्या एका जमीनदाराला मात्र याची पर्वा नव्हती.

गाताना तिने नाचलं पाहिजे, असा आग्रह त्याने धरला. त्याच्या या आग्रहामुळे ती नाचायला उभी राहीली; पण गरोदरपणातील सातव्या महिन्यामुळे नाचताना तिची अवस्था एकदम केवीलवाणी झाली. तिच्या या केविलवाण्या अवस्थेतूनच ‘प्यासा’तील “जिन्हे नाज है हिंदपर वह कहाँ है” या गाण्याची सिच्युएशन गुरूदत्त आणि  अब्रार अल्वी यांना सापडली.

चित्रपटात कोठीवरच्या नाचणारीला एक मूल आहे, असं त्यांनी दाखवलं आणि ते मूल आतल्या खोलीत रडत असताना देखील त्याच्या रडण्याकडे दुर्लक्ष करून कोठीवालीला नाचावं लागतंय असं दाखवून गुरूदत्तनी “जिन्हे नाज है” हे गाणा ‘प्यासा’त या सिच्युएशनच्या पार्श्वभूमीला टाकलं.

‘प्यासा’ पडद्यावर आला तेव्हा आपल्या चित्रपटातील वाद्यवृंद वाढत चालला होता; पण “जिन्हे नाज है” या गाण्यात हा वाद्यवृंद चालण्यासारखा नव्हता. यामुळे एस. डी. बर्मननी या गाण्यात “पायल की छन छन” वर फक्त घुंगराचा आवाज, “तबले की धन धन” वर फक्त तबल्याची साथ “खाँसी की दन दन” वर खोकल्यातील उसासे “सिक्कोकी झंकार” वर रूपयांची खणखण वापरून या गाण्यात गुरूना अभिप्रेत असलेले नाट्य अचूक पकडले होते.

आधी चाल तयार करून मग त्या चालीवर हुकूम गाणी लिहिण्याचा ट्रेन्ड १९५७ साली आपल्या चित्रपट संगीतात वाढू लागला होता. तरीही ‘प्यासा’त साहिनी आधी लिहिलेल्या गाण्यावर एस. डी. बर्मननी संगीताचा साज चढवला होता हे या चित्रपटातील संगीताचं एक ठळक वैशिष्ट्य होतं.

‘परछाईयाँ’ तील साहिर यांच्या काव्यरचनेतून गुरूदत्तना ‘प्यासा’ची प्रेरणा मिळाली असली तरी या चित्रपटातील सर्वच गाणी काही ‘परछाईयाँ’ तून घेण्यात आलेली नव्हती. चित्रपटासाठी म्हणून काही गाण लिहिली जातात. तशी काही गाणी देखील या चित्रपटात होती. या गाण्यांपैकी ठळक गाणं म्हणजे जॉनी वॉकरच मालिशबाल्याचं गाणं “सर जो तेरा चकराए, या दिल डुबा जाए”.

एस. डी. बर्मन या चित्रपटाचे संगीतकार असले तरी या चित्रपटातील मालिशवाल्याच्या गाण्याची संगीतरचना काही त्यांची नव्हती. त्यांचा मुलगा आर. डी. बर्मन तेव्हा नुकताच वाद्याशी खेळू लागला होता. मालिशवाल्याच्या गाण्याची संगीतरचना त्याची होती. त्यानं संगीतबद्ध केलेलं चित्रपटातील हे पहिलं गाणं. तसंच, या चित्रपटातील मालिशवाल्याचं गाणं रफीने गायलं असलं तरी या गाण्यातील चंपी मालिशचा आवाज मात्र जॉनी वॉकरचा होता.

वेश्या आणि कोठीवरची नायिका म्हटलं, की तिचं एखादं तरी नृत्य आपल्या चित्रपटात हटकून असतंच; पण ‘प्यासा’ मात्र याला अपवाद होता. बहिदा रहेमान सारखी अभिजात नृत्यतारका या चित्रपटात होती. तिच्याबरोबर त्या काळात नृत्यतारका म्हणून बोलबाला झालेल्या कुमकुमने या चित्रपटात एका वेश्येची भूमिका केली होती. तरीही गुरूदत्तनी या चित्रपटात त्या दोघींच्या भूमिकांना नृत्यापासून एकदम दूर ठेवलं होतं. या चित्रपटाच हे देखील एक वेगळ वैशिष्ठ्य होतं.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.