१९ मार्च रोजी एक दिवसाचा उपवास करण्याचं आवाहन का केलं जातंय ?

एखाद्याचा मुडदा पाडायचा असेल तर गुन्हेगार चाकू, तलवार बंदूक, पिस्तूल, वगैरेसारख्या जिवघेण्या शस्त्रांचा वापर करतात. फाशी देणे, उंचीवरून खाली ढकलून देणे, विष प्रयोग करणे यासारख्या वेगवेगळ्या प्रकारांचाही काही नराधम वापर करीत असतात, असे आपण अनेक वेळा ऐकत असतो. आलिकडच्या काळात आपल्या विरोधकांचे शिरकाण करण्यासाठी किंवा त्यांचे सामुहिक हत्याकांड घडवून आणण्यासाठी हिटलर सारख्या क्रुरकर्म्याने मोठ्या प्रमाणात बंदिस्त चेंबर्स तयार केले आणि त्यात अनेक लोकांना एकाच वेळी कोंडून त्या चेंबरमध्ये बिषारी वायू सोडून सामुहिक हत्याकांड घडवून आणले असे इतिहास सांगतो.

आज भारतातील शेतकऱ्यांच्या दररोज होणाऱ्या चाळीस ते पन्नास आत्महत्या हिटलरच्या त्या सामुहिक हत्याकांडाची आठवण करून देतात.

औद्योगिकीकरण करण्यासाठी शेतीमालाचे भाव खालच्या पातळीवर नियंत्रणात ठेवण्याच्या सरकारी धोरणाने आणि त्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांनी, भारतात शेतकऱ्यांचे सामुहिक हत्याकांड घडून येते आहे, असे लक्षात येईल. या जाचक कायद्यांनी शेतकऱ्यांचे कौटुंबिक अर्थकारण इतके डबघाईला आणले आहे की, त्यांच्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय पर्यायच उरत नाही. आज दररोज चाळीस ते पन्नास शेतकरी आत्महत्या करीत आहेत, आजपर्यंत साडेतीन लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा सिलसिला सातत्याने चालू आहे.

औद्योगिक क्षेत्राला लागणारा कच्चा माल आणि कमी श्रमात मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी जणिवपुर्वक शेतीचे शोषण करण्यात आले. गरीबांच्या कल्याणासाठी समाजवादी धोरणे राबवणे आवश्यक आहे, असे सांगितले गेले. गरीबांच्या सरकारी कळवळ्याने शेतकऱ्यांना मरणाच्या दारात उभे केले आहे.

1. जमीनदार संपवण्याच्या बहाण्याने शेतकऱ्यांनी किती शेतजमीन बाळगावी, ती कोणी विकत घ्यावी, शेतकऱ्यांनी विकावी की नाही, वगैरे सारखी इतकी अनावश्यक आणि कडक निर्बंध शेतकऱ्यांवर घातले गेले की जमीनीच्या मालकीच्या जटील गुंत्यात शेतकरी आता पुरता अडकून पडला आहे. लहान लहान तुकड्यांची शेती करणे हा त्याच्यासाठी एक जिवघेणा सापळा बनला आहे.

2. आवश्यक वस्तू कायद्याचा आधार घेऊन सरकारने शेतीची बाजारपेठ इतकी बेभरवशाची केली आहे की, शेतीचे भरभरून उत्पादन हातात आले तरी त्याचे भाव काय मिळतील, त्याचा शेतमाल बाजारात विक्री करुन पैसा हातात पडेपर्यंत शेतकऱ्यांना काही भरवसा येत नाही. शेवटी त्याच्या हातात इतके कमी पैसे पडतात की, त्या पिकाच्या उत्पादन करण्यासाठी केलेला खर्चही भरून निघत नाही. हे वर्षानुवर्षे असेच चालू आहे.

3.कोणत्या दिवशी सरकार आपली जमीन, जमीन अधिग्रहण कायद्याचा वापर करुन संपादित करुन काढून घेईल आणि आपल्याला आपल्याच मालकीच्या जमीनीवरुन परागंदा व्हावे लागेल, याचा क्षणाचाही भरवसा राहिला नाही.

जमीन धारणा कायद्याने शेती बाळगायला निर्बंध घालून शेतीमधे बाहेरचे भांडवल येणे थांबवले. त्यामुळे जमीनीचे लहान लहान तुकडे पडत गेले.आता ती परवडण्याच्या पलिकडे गेली आहे.

सरकार आवश्यक वस्तू कायद्याचा वापर करून शेतमालाचे भाव कायमचेच पाडत असते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे कायमचे आठराविश्व दारिद्र्य शेतकऱ्यांच्या घरात नांदू लागले. जमीन अधिग्रहण कायद्यामुळे आपल्या मालकिच्या जमीनी गमावण्याची कायम टांगती तलवार डोक्यावर घेऊन शेतकरी वावरत असतात. शेतकऱ्यांना त्रास देण्याची राहिली साहिली कसर तलाठी, तहसीलदार, वीज पुरवठा अधिकारी आणि प्रशासनातले इतर अधिकारी आणि लुंगेसुंगे सरकारी कर्मचारी भरून काढत असतात. अशाप्रकारचे वेगवेगळे तणाव आणि धास्ती घेऊन कोणाला शांतपणे संसार करता येईल?

शेतकरी याच तणावाखाली शेती करतो आहे. म्हणूनच आज दररोज चाळीस ते पन्नास शेतकरी आपली जीवनयात्रा संपवत आहेत. आजपर्यंत साडेतीन चार लाखावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. या आत्महत्या नाहीत, सरकारी कायद्यांच्या बंदिस्त बंकरांमधे कोंडले गेलेले शेतकरी हळूहळू त्यांचे प्राण त्यागत आहेत. सरकारच्या वरील तीन बंधनात्मक कायद्यांनी घडवून आणलेले हे ‘सॉफ्टकिलर’ हत्याकांड आहे, हे समजून घेतले पाहिजे.

शेतकऱ्यांच्या सामूहिक आत्महत्येची पहिली नोंद 19 मार्च 1986 रोजी चिल गव्हाण (ता. महागाव, जिल्हा यवतमाळ) या गावातील साहेबराव करपे पाटील या सालस शेतकऱ्याच्या, त्यांच्या बायकोच्या आणि लहान लहान चार लेकरांसह केलेल्या आत्म ‘हत्येने’ झाली.

कोरडवाहू शेती परवडेना म्हणून साहेबरावांनी घरची काही शेतजमीन विकून टाकली आणि शेतात विहीर पाडली. त्या विहिरीवर विद्यूत मोटार बसवली, पाईपलाईन केली आणि शेतात गव्हाचे पिक घ्यायला लागले. असेच 1986 साली त्यांनी गहू पेरला. पिक चांगले डोलायला लागले, चिकात आले. आता एक दोन पाण्याच्या पाळ्या दिल्या की बंपर पिक पदरात पडणार, असा त्यांचा अंदाज होता.अशा ऐन मोक्याच्या क्षणी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या मोटारीचे कनेक्शन तोडले. आता हाती आलेले पिक बुडणार म्हणून साहेबराव पाटील अस्वस्थ झाले.

वीज मंडळाच्या अधिकाऱ्याकडे भरपूर खेटे घालून ते थकले. पिक पदरात पडल्याबरोबर वीज बिल भरतो पण आता वीज जोडून द्या, अशी विनवणी केली. निबर कातडीच्या वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची ही विनंती काही मानली नाही. या मानी गड्याच्या तो अपमान जिव्हारी लागला, ते अस्वस्थ झाले.

साहेबराव यांचे वडील शेषराव पाटील हे संगीत विषारद होते. त्यांनी चिल गव्हाण या लहानशा खेड्यात त्यांची मुलगी सारिकाच्या नावाने संगीत विद्यालय काढले. साहेबराव हेही संगीत विषारद झालेले. आजही साहेबराव यांचे वडील शेषरावांच्या हाताखाली संगीत शिकून तयार झालेली महाराष्ट्रभर विखुरलेली पिढी त्यांचे नाव अत्यंत आदराने घेते.

तर अशा सात्विक घरात जन्मलेले अत्यंत सज्जन सद्ग्रहस्थ, माळकरी आणि भजन गाणारे गायक असलेले साहेबराव पाटील हे एका दिवशी उठले आणि आपल्या कुटुंब कबिल्यासह पवनारच्या आश्रमात गेले. तिथे त्यांनी भजन गायले,काय शेवटची विनवणी करायची ती देवाला केली आणि दत्तपूरला मुक्कामाला गेले. तिथे त्यांच्या बायकोने रात्री भजी केली, त्यात त्यांनी विष कालवले. विष कालवलेली भजी त्यांनी आपल्या लहान लहान लेकरांना खायला दिली. त्यानंतर त्यांच्या बायकोने तेच विषारी भजे खाल्ले.

अत्यंत शांतपणे साहेबरावांनी या सर्वांचे प्राण गेले आहेत याची खात्री करून घेतली. त्यांच्या कपाळावर एक रुपयांचे शिक्के चिकटवले आणि सरकारने शेतकऱ्यांच्या परिस्थितिकडे लक्ष द्यावे म्हणून चिठ्ठी लिहून ठेवली. त्या नंतर त्यांनी स्वतःच आपली जीवनयात्रा संपवली.

ही व अशाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या चित्त विचलीत करतात. शेतकऱ्यांच्या दररोज होणाऱ्या आत्महत्या आपण थांबवू शकत नाही कारण आपण सामान्य माणसे आहोत. पण त्यांच्या बद्दल सहवेदना तरी व्यक्त करु शकतो.

म्हणून दर वर्षी 19 मार्च या दिवशी आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्ये बद्दल सहवेदना व्यक्त करत असतो.

सहवेदने सोबतच दररोज होणाऱ्या आत्महत्येकडे सरकारचे लक्ष वेधले जावे आणि शेतकऱ्यांच्या आत्म’हत्या’ करण्यासाठी कारण ठरलेले, जिवघेण्या कायद्यांचे बंदिस्त बंकर पाडून टाकण्याची सुबुद्धी सरकारला येवो, अशी अपेक्षा व्यक्त करत असतो. यावर्षीही आपण 19 मार्च रोजी एक दिवसाचा अन्नत्याग अर्थात उपवास करणार आहोत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी एकट्याने उपवास करायचा आहे. पण आपण केलेल्या उपवासाची एकमेकांना माहिती व्हावी आणि ती सरकार दरबारी दखल घ्यायला प्रेरणा तयार व्हावी म्हणून आपल्या उपवासाची माहिती उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या समाजमाध्यमावर प्रसारित करावी. एकप्रकारे शेतकऱ्यांच्या भळभळत्या वेदनेकडे सर्वांचे लक्ष वेधुन घेऊया.

आपल्याकडे सत्ता नाही, साधने नाहीत, पैसा नाही त्यामुळे आपण एवढेच करू शकतो!

  • अनंत देशपांडे,
    9403541841

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.