बाकी सगळं ठिकाय, पण एका गोष्टीत अजूनही बीजेपीचे चाणक्य गंडत आहेत

२०१४ साली मोदी लाट आली आणि त्यात विरोधी पक्ष वाहून गेले.  पंतप्रधान मोदीजी आणि त्यांचे चाणक्य अमित शाह यांनी निवडणुका जिंकण्याचा सूर सपाटा लावला. जरी एखादे वेळीस निवडणुका जिंकण्यात कमी पडले तेव्हा त्यांनी आपले स्पेशल स्किल वापरून आमदार फोडले, नगरसेवक फोडले, खासदार, उपमुख्यमंत्री देखील फोडले. पण सत्ता सुंदरी आपल्या हातून जाऊ दिली नाही.

फक्त काही मोजक्या निवडणूका अशा झाल्या तिथे अमित शाह यांचे स्पेशल टॅलेंट वापरून सुद्धा विजय मिळवता आला नाही. या सगळ्या निवडणुकांमध्ये एक गोष्ट कॉमन होती.

पॉलिटिक्सच्या बाहेरून आयात केलेल्या उमेदवारांच्या हातात सूत्रे देणे.

१)याची सुरवात होते दिल्लीच्या २०१५ च्या विधानसभा निवडणुकीपासून.

खरं तर भाजप दिल्लीमध्ये खूप आधीपासून मजबूत आहे. सुषमा स्वराज, मदनलाल खुराणा यांच्या काळापासून भाजपने तिथलं मुख्यमंत्रीपद आपल्या हातात ठेवलं होतं. मध्यंतरी शिला दीक्षित यांचा धडाकेबाज १५ वर्षांचा कार्यकाळ दिल्लीत काँग्रेस जिंकत होती. पण कॉमनवेल्थ खेळातील भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे काँग्रेस तिथून संपून गेली आणि त्यांची जागा आम आदमी पार्टीने घेतली.

मनमोहन सिंग यांचे सरकार पाडण्यास कारणीभूत ठरलेल्या अण्णा हजारेंच्या इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलनातून जन्माला आलेला हा पक्ष. अरविंद केजरीवाल बाकी कुठे नाही पण दिल्लीमध्ये मात्र जबरदस्त वजन राखून होते.

खरं तर मोदी लाट सुरु होऊन जास्ती दिवस उलटले नव्हते तरी भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांचं टेन्शन घेतलं आणि पक्षात मोठमोठे नेते असताना केजरीवाल यांना तोडीस तोड म्हणून किरण बेदी यांना तिकीट दिलं.

किरण बेदी या देखील मै हूं अण्णा आंदोलनाच्या भाग होत्या. केजरीवाल यांच्या एकेकाळच्या त्या साथीदार. भारताच्या माजी आयपीएस पोलीस ऑफिसर. इंदिरा गांधींची कार उचलून नेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या त्या चेहरा होत्या. दिल्ली त्यांची कर्मभूमी होती.

मोदी शहांना वाटलं की किरण बेदींना पुढं करून केजरीवाल यांना हरवता येईल. पण तस घडलं नाही. किरण बेदींचा स्वभाव, त्यांची मोठं मोठं बोलण्याची सवय यामुळे निवडणूक मॅनेज करता आली नाही. मोदी, अमित शहा यांनी जंग जंग पछाडलं. पण त्यांच्या नाकावर टिच्चून अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री  बनले. एवढंच नाही तर त्यांनी किरण बेदींना पाडलं. भाजपच्या फक्त ३ जागा निवडून आल्या.

मोदींच्या विजयी रथाला पहिला ऍक्सिडेंट केजरीवाल यांनी घडवून आणला. याला कारणीभूत ठरल्या किरण बेदी.

२)परत पाच वर्षांनी दिल्लीच.

यावेळी पुन्हा अमित शाह आणि मोदींनी केजरीवाल यांना हरवण्यासाठी नवीन माणूस शोधून काढला. तो म्हणजे बिहार के लाला मनोज तिवारी. मनोज भैय्या भोजपुरीचे सुपरस्टार, अगदी गावरान साधा सुधा माणूस.  रिंकीया के पापा गाणे गात त्याने सगळ्या देशावर मोहिनी घातलेली. भाजप यंदा केजरीवाल यांच्या अँटी इन्कबन्सीचा फायदा उठवणार वगैरे चर्चा सुरु होती. ओपिनियन पोल देखील तसेच सांगत होते.

खरं तर मनोज भैय्या राजकारणात येऊन बराच काळ झाला होता. ते समाजवादी वाले होते. योगी आदित्यनाथ यांच्या विरुद्ध युपी मध्ये निवडणूक लढवली होती. पुढे हे सुद्धा अण्णा आंदोलनात आले. जेल मध्ये सुद्धा जाऊन आले. पुढे शत्रुघ्न सिंह यांच्या आदेशावरून भाजपमध्ये एंट्री केली.

बिहार, युपीमध्ये पॉप्युलर असणाऱ्या मनोज तिवारी याना अचानक दिल्ली भाजपची जबादारी सोपवण्यात आली. खरं तर दिल्ली भाजपमध्ये मोठमोठे गटतट होते. या सगळ्यांना सांभाळणारा खमक्या माणूस हवा होता. पण आपले मनोज तिवारी पडले भोळे भाबडे. असं म्हणतात की भाजपच्या नेत्यांना आधीच अंदाज आला होता की आपले केजरीवाल यांच्या समोर पानिपत होणार आहे. म्हणून त्यांनी मनोज भैय्या यांच्या गळ्यात निवडणुकीचं लोढणं बांधलं.

अपेक्षित परिणाम समोर आला. अमित शाह यांनी प्रतिष्ठेची केलेल्या निवडणुकीत भाजपचा पुन्हा लाजिरवाणा पराभव झाला. त्यांचे फक्त ८ आमदार निवडून आले. त्यातल्या त्यात बरं म्हणजे मागच्या वेळच्या ३ पेक्षा हा आकडा बरा होता.

३)मिशन ममता दीदींचे बंगाल 

गेली काही वर्ष झालं भाजपचे पुढचे टार्गेट पश्चिम बंगाल हेच होते. दक्षिण भारत सोडला तर प्रत्येक राज्यात प्रत्येक ठिकाणी भाजप शिरली आहे. काही ना काही करून एकदा तरी सत्ता मिळवली आहे. पण बंगाल मध्ये काही झालं तरी दुहेरी आकडा गाठता आला नव्हता. आधी हा डाव्यांचा गड होता आणि आत्ता ममता दीदींचा.

त्यांना हरवण्यासाठी अमित शाह  यांनी अनेक स्कीमा केल्या. विरोधक टीका करतात त्याप्रमाणे मोदींनी टागोरांच्या प्रमाणे दाढी वाढवली, शारदा चिट फ़ंडाचे आरोप बाहेर काढले, सामदाम दंड भेद वापरून ममताच्या तृणमूल पक्षातील सगळे बडे नेते फोडले. अगदी ममतांचा राईट हॅन्ड समजला जाणारा शुभेन्दू अधिकारी देखील त्यांच्या गोटात आला.

पण ममता दीदींनी आपला प्रचार बंगाल की बेटीला गुजराती गुंडे त्रास देत आहेत या लाईन वरून केला. भाजपने आजवरची सर्वात मोठी रसद या निवडणुकीसाठी वापरली होती पण ममता दीदींच्या बंगाल कि बेटीला ऊत्तर देण्यासाठी स्थानिक नेता नव्ह्ता.

शेवटी अमित शाह यांनी हुकुमाचा एक्का बाहेर काढला.

बेंगॉल टायगर मिथुनदा

हिंदी सिनेमा गाजवलेले मिथुनदा यापूर्वी देखील राजकारणात होते. कॉलेजमध्ये असताना नक्षली चळवळीपासून त्यांनी सुरवात केली. पुढे सिनेमात हिट झाल्यावर तृणमूलच्या वतीने त्यांनी राज्यसभा वारी केली होती. पण निवडणुका वगैरे मध्ये ते कधीच नव्हते. भाजपने त्यांना निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आणलं. हा बंगालचा बेटा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आहे अशी चर्चा सुरु केली. डिक्लेर केलं नाही पण चाचपणी केली.

मिथुनदा तर मला मुख्यमंत्री केलं तर आनंदाने होईन असं थेट सांगतही होते.

पण बिचारे मिथुनदा निवडणुकीचा प्रचार असो किंवा पत्रकारांचा इंटर्व्ह्यु आम्ही कोब्रा डँख मारणारा कोब्रा वगैरे सिनेमा डायलॉग मारत बसले. त्यांना भाजपने तिकीट देखील दिलं नाही. ज्या कारणासाठी मिथुनदा यांना पक्षात घेतलेलं त्याचा काही फायदा झालाच नाही. उलट त्यांच्या अचाट वक्तव्यांमुळे देशभर हस झालं.

काल बंगालच्या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा भाजपच्या ७७ जागा निवडून आल्या मात्र ते ममता दीदींची एकही सीट कमी करू शकले नाहीत. बंगालमध्ये भाजपच्या जिंकण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. जर मिथुनदांच्या नावाच्या चर्चेच्या ऐवजी थेट मुख्यमंत्री उमेदवार म्हणून बंगालमधल्या एखाद्या निष्ठावंत स्थानिक नेत्याला घोषित केलं असतं तर काय माहित त्यांची कामगिरी चांगली झाली असती.

४)मल्लू लोकांचे केरळ 

यापूर्वी म्हणे भाजप वाले या राज्याकडे ढुंकून देखील बघायचे नाही असं म्हणतात.  जिथं काहीही केलं तरी आपला निभाव लागणार नाही तिथं कशाला पैसे आणि एनर्जी वेस्ट करा असं म्हणत भाजप दक्षिण टोकाला जायचंच नाही. पण मोदी आणि अमित शहा यांची महत्वाकांक्षा मोठी. त्यांनी तिथं देखील गेले काही वर्ष पद्धतशीर प्रयत्न सुरु केले होते.

केरळ हा कट्टर पुरोगाम्यांचा गड इथं एकतर डावे येतात नाही तर काँग्रेस. दुसऱ्या कोणाला वावच नाही. एक तर सुशिक्षितांचे राज्य, वरून मुस्लिम, ख्रिश्चन या समुदायांची मोठी लोकसंख्या, सेक्युलर विचारांचा वारसा वगैरे वगैरे असल्यामुळे भाजपला वाव नव्हता. संघाचे कार्यकर्ते तिथं काम करू लागले तर त्यांना थेट मारूनच टाकतात म्हणे.

असं असूनही मोदी शहा जोडीने इथे मोठा निधी ओतला. तिथं त्यांचा एक आमदार होता, काही मोजके नेते होते तरी मेट्रो मॅन इ श्रीधरन यांना पक्षात आणलं. वयाची नव्वदी जवळ आलेले श्रीधरन हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत अशी चर्चा करण्यात आली. 

आपली स्वच्छ इमेज, धडाक्याने काम करायची हातोटी, कोकण रेल्वे पासून ते दिल्ली मेट्रो, कोची मेट्रो वगैरे प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये काम केलेले, जगभर नाव झालेले सुपर इंजिनियर श्रीधरन यांना देखील राजकारणाचा काडीचाही अंदाज नव्हता. तरी त्यांची पॉप्युलॅरीटी इमेज यावरून निवडणूक जिंकता येईल असं भाजपला वाटलं होतं. तेवढ्या साठी श्रीधरन यांना या म्हातार वयात बाशिंग बांधून मुख्यमंत्रीपदाच्या तयारीला लावण्यात आलं.

स्वतः मोदी ख्रिश्चन मतांपासून ते मुस्लिम मते मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. अनेक प्रचारसभा घेतल्या. अमित शाह आपल्या स्टाईलमध्ये आमदार खासदार गोळा करता येईल का हे पाहत होते. पण त्यांच्या दुर्दैवाने हे साध्य झाले नाही.

जसा जसा प्रचार पुढे गेला तस मोदींना लक्षात आलं की श्रीधरन आपल्याला केरळमध्ये वोटिंग अट्रॅक्ट करू शकत नाहीत. त्यांची मुख्यमंत्री पदाची उमेदवारी पण जाहीर केली नाही. स्वच्छ इमेजचा श्रीधरन अण्णांना देखील निवडणुकीचं राजकारण जमलं नाही. त्यांनी लव्ह जिहाद वगैरे आणून भाजपायी बनण्याचा प्रयत्न केला पण तो फेल गेला.

या निवडणुकीत ते स्वतः पडले. भाजपचा मागच्या वेळी १ आमदार निवडून आला होता. यावेळी तेही झालं नाही. खातंही न उघडता मोदी शहा यांना तोंडावर पडावं लागलं.

एकूण काय तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू मोठी आहे. ते एकहाती लोकसभा निवडणूक आजही जिंकू शकतात. मात्र राज्य जिंकायची झाली तर स्थानिक पातळीवरचे नेते त्यांना तयार करावे लागतील. प्रत्येक वेळी निवडणुकीच्या आधी उसनवारी करून, विशेषतः राजकारणाचा अनुभव नसलेल्या सेलिब्रिटी लोकांना निवडणुकीचा चेहरा बनवणे त्यांनी सोडून दिले पाहिजे.

इलेक्शन मॅनेजमेंटवर राज्ये जिंकता येत नाहीत, जो पर्यंत लोकनेते बनवणार नाहीत तो पर्यंत कोणताही पक्ष निवडणुकीचा बादशाह बनणार नाही हे देखील तितकंच खरं.

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.