….तर पी.व्ही. नरसिंह राव यांच्या ऐवजी एन.डी. तिवारी देशाचे पंतप्रधान झाले असते !  

१८ ऑक्टोबर १९२५ रोजी नैनितालमधील बलुती  येथे जन्मलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते एन.डी. तिवारी यांचं काल १८ ऑक्टोबर रोजी म्हणजेच त्यांच्या  जन्मदिवशीच दिल्लीत निधन झालं.

साधारणतः ६५ वर्षे देशाच्या राजकारणात सक्रीय राहिलेले तिवारी हे भारताच्या राजकीय इतिहासातील असे एकमेव नेते राहिले आहेत, ज्यांनी २ राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. आधी उत्तरप्रदेश आणि मग उत्तरप्रदेश पासून उत्तराखंड वेगळं झाल्यानंतर ते उत्तराखंडचे देखील मुख्यमंत्री राहिले.

प्रजा सोशालिस्ट पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या तिवारींचा राजकारणातील प्रवेश स्वातंत्र्यपूर्व काळातला. ब्रिटीश विरोधी पत्रकं लिहिणं आणि त्यांचं वितरण करणं यासाठी ब्रिटिशांनी त्यांना नैनितालमधील जेलमध्ये टाकलं होतं. विशेष म्हणजे याच जेलमध्ये त्यावेळी त्यांचे वडील देखील होते. जवळपास १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगून ते बाहेर पडले आणि मग त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं.

राजकीय कारकीर्द

१९५२ सालची  उत्तर प्रदेश  विधानसभेची निवडणूक त्यांनी प्रजा समाजवादी पक्षाच्या तिकीटावर लढवली आणि  जिंकली देखील. त्यानंतर १९५७ साली देखील विजय मिळवत ते पक्षाचे विधान सभेतील विरोधी पक्ष नेते बनले.

१९६३ साली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काशीपुरमधून विजय मिळविल्यानंतर त्यांची  उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्रीपदावर वर्णी लागली.

जानेवारी १९७६ साली सर्वप्रथम उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. त्यानंतर १९७९-८० साली केंद्रातील चौधरी चरणसिंग यांच्या काँग्रेसच्या पाठींब्यावरील सरकारमध्ये त्यांनी  वित्त आणि संसदीय कार्य मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली.

त्यानंतर केंद्रात गेलेल्या तिवारींना १९८४ साली परत एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून राज्यात पाठविण्यात आलं. मुख्यमंत्रीपदाची ही टर्म ते पूर्ण करू शकले नाहीत. परंतु त्यानंतर १९८८ साली ते तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले. अर्थात उत्तर प्रदेशमधील बदलत्या राजकीय समीकरणात तिन्ही वेळा मुख्यमंत्री म्हणून त्यांना फार मोठा कार्यकाळ लाभला नाही.

१९९१ सालच्या लोकसभा नैनिताल येथून लढवलेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला नसता तर पी.व्ही. नरसिंह राव यांच्या ऐवजी  तिवारी हे निश्चितपणे देशाचे पंतप्रधान झाले असते, असं अनेक जेष्ठ राजकीय विश्लेषक मानतात. विशेष म्हणजे निवडणूक न लढवलेल्या पी.व्ही. नरसिंह राव यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडल्याने या पराभवाची सल त्यांच्या मनात आयुष्यभर राहिली.

१९९४ साली त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन त्यांनी ‘ऑल इंडिया इंदिरा काँग्रेस’ (तिवारी) नावाच्या नवीन पक्षाच्या स्वरुपात आपली वेगळी चूल मांडली. अर्थात पुढच्या २ वर्षातच ते काँग्रेसमध्ये परतले देखील.

पुढे २००२ साली उत्तर प्रदेशचं विभाजन करून उत्तराखंडची निर्मिती करण्यात आल्यानंतर २००२ ते २००७ या काळात ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनले. अशा प्रकारे देशाच्या राजकीय इतिहासात २ राज्यांचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे ते एकमेव नेते बनले. मुख्यमंत्री म्हणून उत्तराखंडच्या विकासात त्यांचं मोठं योगदान राहिलंय.

२००७ ते २००९ या काळात त्यांनी आंध्रप्रदेशचं राज्यपालपद सांभाळलं पण त्याचवेळी त्यांच्या संदर्भातील एक सेक्स स्कॅन्डल बाहेर आल्याने त्यांना राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा लागला.

…सोबतच अनेक वादही !

यशस्वी राजकीय कारकीर्द राहिलेल्या तिवारींच्या नावासोबत अनेक वाद देखील जोडले गेले होते. सर्वात अधिक चर्चा झाली ती आंध्र ज्योती चॅनेलने चालवलेल्या सेक्स स्कॅन्डलची.

चॅनेलने चालवलेल्या व्हिडीओमध्ये तिवारी हे आंध्र प्रदेशच्या राजभवनात एकाच वेळी ३ महिलांसोबत शय्यासोबत करताना दिसून आले होते. हे प्रकरण बरंच गाजलं आणि तिवारींनी माफी मागितली पण त्यांना राज्यपाल पदाचा राजीनामा द्यावा लागला.

२००८ साली रोहित शेखर यांनी तिवारी हे आपले वडील असल्याचा दावा केला होता. बऱ्याच वादविवादानंतर पुढे हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने डीएनए टेस्ट करण्याचा आदेश दिला.

टेस्टचे रिपोर्ट्स आले आणि न्यायालयाने रोहित शेखर यांचा दावा मान्य केला. मार्च २०१४ साली तिवारींनी देखील शेखर आपलाच मुलगा असल्याचं मान्य केलं होतं. त्यानंतर वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी रोहित यांच्या आई उज्ज्वला शेखर यांच्याशी लग्न केलं होतं.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.