एकटा माणूस काय करू शकतो, जगात शांततेत टॉपला असणाऱ्या देशात दंगे घडवून आणू शकतो

‘एक व्यक्ती काय करू शकतो?’ आपल्यातील अनेक जण नेहमीच असं म्हणत असतील. मात्र इतिहास जर उघडून बघितला तर ढिगाने अशी नाव सापडतील, ज्यांनी या वाक्याला चूक सिद्ध केलंय.

हिटलरसारखा एक व्यक्ती कोट्यवधी नाझी लोकांचं हत्याकांड घडवू शकतो, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सारखा व्यक्ती जगातील महासत्ता असलेल्या देशात असंतोष निर्माण करू शकतो, तर पुतीन सारखा व्यक्ती जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या दारावर नेऊन ठेवू शकतो.

अशा व्यक्तींच्या लिस्टमध्ये आता अजून एक नाव जोडण्याची वेळ आलेली दिसतेय.

१५ एप्रिलचा दिवस होता. स्वीडनच्या दक्षिण लिंकॉपिंगमधील एका मोकळ्या सार्वजनिक जागेत एक व्यक्ती पोलिसांच्या सुरक्षेसह आला. त्याच्या हातात मुस्लिम समाजाचा पवित्र ग्रंथ ‘कुराण’ची एक प्रत होती. त्याने एका ठिकाणी थांबत कुराण खाली जमिनीवर ठेवलं. हे बघणारे लोक त्याचा विरोध करू लागले. मात्र बघ्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत बघता बघता त्याने पवित्र धर्मग्रंथ जाळून टाकला.

सुमारे २०० निदर्शक निषेध करण्यासाठी चौकात जमले होते. मात्र पोलिस सुरक्षेच्या जोरावर या व्यक्तीने कृती साध्य केलीच.

या कृतीनंतर खूपच भयानक घटना घडायला सुरु झाल्या. घटनेचे परिणाम लगेच दिसू लागले. उपस्थित लोकांनी पोलिसांना त्या व्यक्तीला थांबवायचं आवाहन करूनही जेव्हा पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलं, त्यानंतर मात्र या गटाने पोलिसांवर दगडफेक सुरु केली, रस्त्यावरील वाहतुक बंद पडली आणि दंगे पेटले.

१५ एप्रिलला पेटलेले ते दंगे आजही सुरूच आहे. घोळका शांत होण्याचं नावच घेत नाहीये.

WhatsApp Image 2022 04 19 at 6.37.14 PM

हे सर्व झालंय त्या देशात ज्याचं नाव जागतिक शांतता निर्देशांकात टॉपच्या १५ व्या क्रमांकावर आहे.

‘स्वीडन’

तर ज्या एका व्यक्तीने या देशाच्या शांततेला भंग केलंय, तो व्यक्ती…

‘रस्मस पालुदन’

सांप्रदायिकदृष्ट्या शांत समजल्या जाणाऱ्या स्वीडनमध्ये सध्या दंगली उसळल्या आहेत. रस्मस पालुदन यांच्याविरोधात मुस्लिम पंथाचे लोक आंदोलन करत असताना हा प्रकार घडला. 

भरदिवसा थेट लोकांच्या धार्मिक भावनांना हात घालण्याची इतकी हिम्मत करणारा हा व्यक्ती अतिउजव्या विचारसरणीच्या स्ट्रॅम कुर्स पक्षाचा डॅनिश नेता आहे. 

 

रस्मस पालुदन हा स्वीडिश नागरिक असून, व्यवसायाने वकील आहे. शिवाय तो वर्णद्वेषी देखील आहे. त्यांनी २०१७ मध्ये स्ट्रॅम कुर्स या पक्षाची स्थापना केली ज्याचा अर्थ ‘अतिरेकी’ असा आहे. हा पक्ष इस्लामोफोबिया म्हणजेच इस्लामविरोधी अजेंडा आणि स्थलांतरितविरोधी विचारसरणीवर बांधलेला आहे. तो अति उजव्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

‘डेन्मार्कमधील सर्वात मोठा देशभक्त पक्ष’ म्हणून हा पक्ष स्वत:चे वर्णन करतो. डेन्मार्कच्या २०१९ च्या निवडणुकीत १.८ टक्के मते त्यांना मिळाली होती.

त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती. 

गेल्या वर्षीच्या एका व्हिडीओमध्ये पालुदन यांना असं म्हणताना ऐकायला मिळालं होतं की, त्यांना जगातून मुस्लिमांचं नाव पुसून टाकायचं आहे. ऑगस्ट २०२० मध्ये, स्ट्रॅम कुर्स यांनी माल्मोच्या रोसेंगॉर्ड जिल्ह्यात कुराण जाळण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.

त्यानंतर आंदोलकांनी गाड्या पेटवून दिल्या आणि माल्मोमध्ये झालेल्या चकमकीत दुकानांची तोडफोड करण्यात आली.

WhatsApp Image 2022 04 19 at 7.26.33 PM

अलिकडच्या वर्षांत पालुदन नियमितपणे अशा घटनांच्या केंद्रस्थानी आहे. पालुदन यांनी २०१९ मध्ये मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ कुराण जाळला, बेकनमध्ये गुंडाळला आणि तो हवेत फेकला होता. तर २०२० मध्ये वंशभेदासह अनेक गुन्ह्यांसाठी रस्मस यांना एक महिना तुरुंगवास भोगावा लागला होता. 

सप्टेंबर २०२० मध्ये पालुदनवर स्वीडनमध्ये दोन वर्षांसाठी प्रवेश बंदी घालण्यात आली होती. पुढे ऑक्टोबरमध्ये या वादग्रस्त मुस्लिमविरोधी राजकारण्याने बर्लिनमध्ये प्रक्षोभक निदर्शने करण्याची योजना जाहीर केल्यानंतर त्यांना काही काळ जर्मनीत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं होतं. तर नोव्हेंबर २०२० मध्ये त्याला फ्रान्समध्ये अटक करून हद्दपार करण्यात आलं होतं. 

सध्या स्वीडन आणि डेन्मार्कमध्ये नियमितपणे कुराण जाळण्याचे कार्यक्रम हा व्यक्ती आयोजित करतोय.

म्हणूनच रस्मस यांच्या स्ट्रॅम कुर्ससारखा पक्ष देशात मूळ धरू नये, धार्मिक आधारावर भेदभावावर बंदी घालण्यात यावी, यासाठी देशाच्या घटनेत दुरुस्ती करण्याची मागणी स्वीडनचे मुस्लिम करत आहेत.

मात्र सरकारही रस्मस यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप हे मुस्लिम करतायेत. याच कारणामुळे स्वीडनने मुसलमानांचा विरोध दडपण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देश दंगलीच्या कचाट्यात आला.

आता स्वीडनमध्ये हिंसाचार कसा पसरला?

शुक्रवार, १५ एप्रिलला स्टॉकहोम, रिंकीबी, ओरेब्रो, लिंकॉपिंग, नॉर्कोपिंग अशा भागात चकमकी झाल्या होत्या. नंतर नॉर्कोपिंग आणि जवळच लिंकॉपिंगमध्ये हिंसाचार उसळला. रिंकीबी, स्टॉकहोम हे उपनगर आणि ओरेब्रो या शहरातही निदर्शक आणि पोलिसांमध्ये तुरळक चकमकी झाल्या. 

सोशल मीडियावरील व्हिडीओ आणि फोटोंमध्ये पोलिसांच्या जळत्या गाड्या पाहायला मिळत आहेत…

WhatsApp Image 2022 04 19 at 7.37.43 PM

त्यानंतर शनिवार, १६ एप्रिलला, स्वीडनमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या माल्मो इथल्या एका उद्यानात निदर्शने सुरू झाली, जिथे रस्मस पालूदनने काही लोकांना संबोधित केले होते. यात रस्मस यांचादेखील पायाला दगड लागल्याचं ऐकू आलंय.

माल्मोमध्ये रविवारी १७ एप्रिलला रात्री हिंसाचाराची नवी फेरी उसळली. निदर्शकांनी दगडफेक केली आणि पोलिसांनी जमावावर टियर गॅसच्या नळकांड्या फोडल्या. या दरम्यान एका शाळेला आणि अनेक गाड्यांना आग लावण्यात आली.

पोलिस आणि नागरिकांमध्ये झालेल्या चकमकीत जवळपास २०० लोकांचा सहभाग असून यात २६ पोलिस आणि १४ नागरिक जखमी झाले असून पोलिसांची २० वाहने उद्ध्वस्त करण्यात आली आहेत, अशी माहिती स्वीडनचे राष्ट्रीय पोलिस कमांडर जोनास हिसिंग यांनी दिलीये. 

तर  स्वीडनमधील काही जहालमतवाद्यांकडून पवित्र कुराणचा जाणीवपूर्वक केलेला गैरवापर याबद्दल अनेक देशांनी निषेध केला आहे. 

तेव्हा आता स्वीडनमध्ये पुढे काय होणार? हा हिंसाचार कधी थांबणार? आणि रस्मस पालुदन यांच्यावर कोणती कार्यवाही होणार? हे बघणं गरजेचं आहे…

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.