सगळी संपत्ती देशाला देणाऱ्या व्यापाऱ्याला सुभाषबाबूंनी ‘सेवक ए हिंद’ पदवी दिली होती…

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक असं नाव ज्यांच्या नावाशिवाय भारताचा इतिहास आणि स्वातंत्र्य लढा अपूर्ण आहे. ते नाव म्हणजे सुभाषचंद्र बोस.

आझाद हिंद सेनेची स्थापना करून मोठा लढा ब्रिटिशांविरोधात सुभाषबाबूंनी उभारला होता. या आझाद हिंद सेनेला शस्रांसाठी आर्थिक मदत हवी होती तेव्हा एका व्यापाऱ्याने केलेली मदत आणि त्या व्यापाऱ्याचं नाव इतिहासात कायमच कोरल गेलं त्याबद्दलचा आजचा किस्सा.

ब्रिटिशांविरुद्ध सुभाषचंद्र बोस यांनी रणशिंग फुंकलं होतं. अनेक पेच डावपेच सुभाषबाबू वापरत होते, यातूनच आझाद हिंद सेनेची संकल्पना त्यांना सुचली. मोठ्या प्रमाणावर लोकांचा ओढा आझाद हिंद सेनेत भरती होण्याकडे वाढला होता. सशस्त्र क्रांतीसाठी आझाद हिंद सेनेकडे आर्थिक चणचण होती. आणि तर या समस्येवर तोडगा एका व्यापाऱ्याने काढला. 

सौराष्ट्रातल्या धोराजी शहरात राहणारे अब्दुल हबीब युसूफ मार्फानी हे इंग्रजांच्या काळातले मोठे व्यापारी होते. ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची लढाई ऐन भरात होती, नवनवीन लोकांची रेलचेल वाढली होती त्यावेळी अब्दुल हबीब युसूफ मार्फानी यांचा परिवार रंगूनमध्ये स्थायिक होता.

आझाद हिंद सेनेला आर्थिक रूपात मदत करणारे पहिले व्यक्ती होते अब्दुल हबीब युसूफ मार्फानी.

आझाद हिंद सेनेला लागणाऱ्या आर्थिक मदतीत अब्दुल हबीब युसूफ मार्फानी यांनी आपली सगळी संपत्ती, पैसे, इस्टेट ज्याची किंमत त्याकाळात एक करोड पेक्षाही जास्त होती ती सगळी संपत्ती सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेला देऊन टाकली.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या दृष्टीने अब्दुल हबीब युसूफ मार्फानी यांनी केलेली हि मदत आझाद हिंद सेनेला पुष्कळ बळ देणारी होती. नेताजी सुभाषचंद्र बोस या भरघोस मदतीने खुश झाले.

सुभाषबाबूंनी अब्दुल हबीब युसूफ मार्फानी यांना तेव्हा धन्यवाद म्हणत सेवक ए हिंद हि पदवी देऊ केली.

देशातल्या एका मोठ्या व्यापाऱ्याने देशाच्या मुक्ततेसाठी केलेली मदत हि सुभाषबाबूंना देशभक्त अजूनही आपल्यासोबत आहे याची जाणीव करून देणारी होती.

इतिहासकार राजमल कासलीवाल यांनी लिहिलेल्या नेताजी आझाद हिंद फौज अँड आफ्टर मध्ये लिहून ठेवलय कि हबीब सेठ यांनी आझाद हिंद सेनेला केलेली मदत देशाच्या दृष्टीने फार महत्वाची आहे आणि अब्दुल हबीब युसूफ मार्फानी यांचं योगदान देश कायम लक्षात ठेवील. 

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने मोठी भूमिका बजावली. आझाद हिंद सेनेला लागणारा आर्थिक ताण अब्दुल हबीब युसूफ मार्फानी या व्यापाऱ्याने एका झटक्यात मिटवला होता. देशाबद्दल असलेलं प्रेम आणि तळमळ हबीब सेठ मध्ये होती.

देशासाठी सगळी जन्मभर कमावलेली संपत्ती दान करणारे अब्दुल हबीब युसूफ मार्फानी हे व्यापारी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात कायमचे अजरामर झाले. सुभाष चंद्र बोस यांनी दिलेली सेवक ए हिंद हि पदवी त्यांच्या नावाबरोबर कायमची जोडली गेली.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.