इंदिरा गांधीनंतर सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हणून आर.के. धवन यांच नाव घेतलं जायचं !

साधारणतः साठचं दशक असावं इंदिरा गांधींकडे एक तरुण नोकरी मागण्यासाठी आला होता. त्यावेळी कार्यालयात जागा नसतानाही इंदिरा गांधींनी त्याला सहायक सचिव म्हणून कार्यालयात ठेऊन घेतलं होतं. एका दिवशी इंदिरा गांधी अशाच घाई-गडबडीत कुठेतरी जाण्यासाठी निघाल्या होत्या आणि त्यांचा चष्मा सापडत नव्हता.

त्यावेळी या तरुणाने त्यांना एक चष्मा दिला, जो इंदिराजींच्या नंबरचाच नवीन चष्मा होता. ही गोष्ट इंदिराजींच्या लक्षात आली नसती तर नवलच. त्याबद्दल त्यांनी या तरुणाला विचारलं असता त्या तरुणाचं उत्तर होतं की, “मॅडम, मी तुमच्या नंबरचे २-३ चष्मे आधीच बनवून घेतले आहेत. घाई-गडबडीचा प्रसंग कधी ओढवेल हे सांगता येत नाही”  हा तोच प्रसंग होता ज्यामुळे आर.के. धवन हे पुढची अनेक वर्षे इंदिरा गांधींचे कान, नाक आणि डोळे म्हणून काम बघणार हे निश्चित झालं होतं.

r k d
राजिंदर कुमार धवन

काल रात्री दिल्लीत निधन पावलेले आर.के. अर्थात राजिंदर कुमार धवन हे १९६२ ते १९८४ या काळात इंदिरा गांधींचे खासगी सचिव म्हणून कार्यरत होते. पुढे इंदिरा गांधीनंतर राजीव गांधीसोबत देखील त्यांनी काम केलं होतं. १९९० साली काँग्रेसने त्यांना राज्य सभेवर देखील पाठवलं आणि पी.व्ही. नरसिंह राव यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांनी राज्यमंत्री पद देखील सांभाळलं.

इंदिरा गांधींच्या कार्यकाळातील पॉवरफुल व्यक्तीमत्व.

इंदिरा गांधी सत्तेत असताना पंतप्रधान कार्यालयातील सर्वात शक्तिशाली माणूस म्हणजे आर.के. धवन असं सगळं होतं.  इंदिरा गांधींच्या राजकीय कारकिर्दीत आणि सत्तर-ऐंशीच्या दशकातील काँग्रेसच्या एकूण घडणीत आर.के. धवन या माणसाचा काय रोल होता हे थोडक्यात समजून घ्यायचं असेल तर फक्त एवढंच सांगता येईल की सध्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकारणात जी भूमिका अमित शहा यांची आहे तीच भूमिका आर.के. धवन हे इंदिरा गांधींच्या राजकारणात निभावत होते.

पंतप्रधान कार्यालयातील कुठलंही काम असो काँग्रेस नेत्यांना आधी धवन यांना पटवायला लागायचं. धवन जर राजी झाले तर ते काम होणारच याबद्दल शास्वती मिळायची पण जर धवन यांनीच जर हरकत घेतली तर काम होणारच नाही ही ‘काळ्या दगडावरची पांढरी रेष’ समजली जायची.

इंदिरा गांधींचा ‘नकार’ होकारात बदलवण्याची ताकद असणारा हा पंतप्रधान कार्यालयातील एकमेव माणूस होता. याबद्दलचा एक किस्सा ज्येष्ठ काँग्रेस नेते जय प्रकाश  अग्रवाल यांनी सांगितलाय. अग्रवाल यांनी दिल्लीत कुठल्याशा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि इंदिरा गांधींना त्या कार्याक्रामासाठी आमंत्रित केलं होतं.

इंदिराजींनी व्यस्त कार्यक्रमामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास असमर्थता दाखवली होती. त्यावेळी अग्रवाल यांनी धवन यांना गळ घातली आणि धवन यांच्या विनंतीवरून इंदिरा गांधी कार्याक्रमाला उपस्थित राहिल्या.

शेवटपर्यंत इंदिराजींशी एकनिष्ठ.

dhavan
इंदिरा गांधींसमवेत

आणीबाणीच्या काळ्या कालखंडात देशाची सूत्रे ज्यांच्या हातात होती त्यात संजय गांधी यांच्यानंतरचं सर्वात महत्वाचं नांव म्हणजे आर.के. धवन. धवन यांचा आदेश हा इंदिरा गांधींचा आदेश समाजला जायचा. त्यामुळेच १९७७ साली जेव्हा आणीबाणीनंतर जनता पक्षाचं सरकार आलं त्यावेळी आर.के.धवन देखील सरकारच्या रडारवर आले.

आणीबाणीतील घटनांच्या चौकशीसाठी सरकारने नेमलेल्या शाह कमिशनसमोर त्यांनी इंदिरा गांधी यांच्या विरोधात साक्ष दिली तर ते या प्रकरणातून वाचू शकतात असं त्यांना सांगण्यात आलं होतं. परंतु धवन यांनी त्यासाठी साफ नकार दिला आणि इंदिरा गांधी यांच्याशी एकनिष्ठ राहिले. पुढे २०१५ मधील आपल्या एका वक्तव्यातून देखील त्यांनी आणीबाणी संदर्भात इंदिरा गांधींचा बचाव केला होता.

इंदिरा गांधींची ज्यावेळी हत्या झाली त्यावेळी देखील ते इंदिराजींसोबतच होते. मारेकऱ्यांचा निशाना चुकला असता तर गोळी धवन यांनाच लागली असती. धवन यांच्या निधनाने काँग्रेसमधील इंदिरा पर्वाचा साक्षीदार असणारा शेवटचा दुवा निखळला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.