असच एक मुनगंटीवारांच आव्हान आबांनी स्वीकारून इतिहास घडवून दाखवला होता..

सध्या विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन म्हणल्यानंतर चहापाण्यावरील बहिष्कारपासून ते वाद, विवाद, टिका वगैरे सारख्या गोष्टी ओघाने येतातच.

आजही तेच झालं. विधानसभेमध्ये चर्चा सुरू असताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले माझ्या भाषणात जो अडचणी आणलो तो परत निवडून येत नाही. सुधीर मुनगंटीवार यांच्या दाव्याला तात्काळ चॅलेंज करत अजित पवार म्हणाले,

मी अजित पवार तुम्हाला चॅलेंज देतो मला पाडून दाखवा..

आत्ता अजित पवारांना प्रत्युत्तर देण्याऐवजी इथे शांत राहून आपलं म्हणणं मांडण सुधीर मुनगंटीवारांनी योग्य समजलं…

पण यावरून सुधीर मुनगंटीवारांच इतिहासातलं एक चलेंज आठवलं.

२००९ च्या अशाच एका हिवाळी अधिवेशनात सुधीर मुनगंटीवारांनी आर आर पाटलांना आव्हान दिलं होतं. विधानसभेमध्ये तेव्हा कायदा व सुव्यवस्थेची चर्चा चालू होती. त्या वेळी आर.आर. आबांना चलेंज देताना मुनगंटीवारांनी आर.आर. आबांना गडचिरोलीचं पालकमंत्री पद स्वीकारण्याच आवाहन केलं होतं.

आर. आर. आबांनी सुधीर मुनगंटीवार यांच आव्हान स्वीकारलं आणि गडचिरोलीचं पालकमंत्रीपद आपणाकडे घेत असल्याची घोषणा देखील केली.

गडचिरोलीचं पालकमंत्री पद म्हणजे साधी गोष्ट नव्हती. कारण तेव्हा आर आर आबा आपल्या राजकारणाच्या सर्वोच्च ठिकाणी पोहचले होते. अशा वेळी नुसती उठाठेव घेवून होत्याचं नव्हतं करण्याचा हा प्रकार होता. कारण गडचिरोली तेव्हा देशातील सर्वात मागास २५ जिल्ह्यामध्ये सामाविष्ट होता.

पण त्याहून अधिक महत्वाचं होतं ते म्हणजे नक्षलवाद्यांच्या कारवाया.

आर.आर. आबांच्या पूर्वी या जिल्ह्याचा पालकमंत्रीपद देखील राखीव गोष्ट असायची. मंत्र्यांना देखील शिक्षा देण्यासारखा हा प्रकार होता. इथे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण करण्यासाठी देखील पालकमंत्र्यांचे पाय लागत नसत.

मात्र आपण गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारत असल्याचं आर. आर. आबांनी ३१ डिसेंबर २००९ रोजी जाहिर देखील केलं.

१२ जानेवारी २०१० रोजी आबांनी गडचिरोलीचा पालकमंत्री म्हणून दौरा आखला.

हा दौरा आजवरच्या इतिहासातला पहिलाच दौरा ठरला. कारण एका पालकमंत्र्याने थेट गडचिरोलीच्या गावांचा दौरा मोटारसायकलवरून केला होता.

कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा वेठीस न लावता आबांनी दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर असा दौरा आखला. शासकिय विभागातील कर्मचारी इथे कधीच पोहचत नसतं. फक्त हजेरी लावणं आणि पगार घेण्याचा कारभार इथे चालत असे. आर. आर. आबांनी पहिल्याच दौऱ्यात गैरहजर राहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यावर निलंबन करण्याची कारवाई केली.

पहिला दौरा होता म्हणून स्टंट केला असेल असे तुम्ही टिका करण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छतो की हा प्रकार एकाच दौऱ्यापुरता नव्हता. तिथून पुढे आबांच्या वेळापत्रकातील दर महिन्याचे दोन दिवस गडचिरोलीसाठी राखीव धरले जावू लागले.

भामरागड,सिरोंचा, कोरची, धानोरा, अहेरी, एट्टापल्ली अशी तालुक्यांना आबांनी भेट देण्यास सुरवात केली. आबांच वैशिष्ट म्हणजे ते एकाबाजूला सर्वसामान्य लोकांसोबत बोलत असत तर दूसऱ्या बाजूला पोलीस यंत्रणेसोबत बोलत असत. यातून नक्षलवाद्यांची दाहकता त्यांना समजून आली. गडचिरोली जिल्ह्यातील पोलीसांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरवण्याचा त्यांनी चंग बांधला. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर गडचिरोली हे राज्यातलं अस जिल्हा पोलीस मुख्यालय आहे ज्यांच्याकडे हेलिकॉप्टर देखील आहेत.

मुंबईत आल्यानंतर एक आणि गडचिरोलीत गेल्यानंतर एक अस चित्र आबांना दिसत होतं.

सचिव पातळीवरील लोकांना गडचिरोली कुठे आहे ते फक्त एका शिक्षेपुरतच माहित होतं. आर आर आबांनी यावर उपाय म्हणून एक योजना चालू केली. ती म्हणजे सचिव पातळीवरील लोकांनी महिन्यातून एकदा गडचिरोलीला भेट देणं.

या योजनेमुळे उच्चधिकारी गडचिरोलीत पोहचू लागले. आपल्या डोळ्याने परिस्थिती पाहू लागले. याचा उपयोग असा झाला की आला कागद आणि केली सही हा शिष्टाचार बंद झाला. याच वेळी आबांनी गडचिरोलीच्या समस्येवर उपाय म्हणून स्वत: चार तासांच प्रेझेन्टेशन दिलं होतं.

आर. आर. आबांच्या काळात गडचिरोली जिल्ह्याला ८५० कोटी निधी मिळाला.

यापूर्वी जिल्ह्याच्या वाट्याला फक्त २५ कोटी वार्षिक मिळत होते. पण आबांनी आपली ताकद पणाला लावून जिल्ह्याचा वार्षिक निधी दिडशे कोटींच्या घरात नेला. यामध्ये १५० गावांचा विजपुरवठा त्यांनी पुर्वरत केला. या गावांची माहिती सांगायची तर या १५० गावांमध्ये १५ वर्षांपासून लाईट नव्हती. नक्षलवाद्यांनी लाईट पोहचवण्याचे प्रयत्न हाणून पाडले होते. मात्र आबांनी महावितरणला पुरेसा निधी दिल्याने हे काम पुर्वत्वास येवू शकले.

आबांच पालकमंत्री म्हणून दुसरं महत्वाचं काम ठरलं ते म्हणजे आबांनी आपल्या साडेपाच वर्षाच्या जबाबदारीत सुमारे तीस हजार आदिवासींना जमिनीच्या मालकी हक्काचे पट्टे मिळवून दिले. केंद्र सरकारच्या वनहक्क कायद्याची सर्वाधिक यशस्वी अंमलबजावणी आबांनी गडचिरोलीमध्ये करुन दाखवली.

आबा स्वत: खूप कष्टातून शिकले होते. अनेकदा आपल्या भाषणात ते जर मी शिकलो नसतो तर कुठेतरी रोजंदारीवर कामाला गेलो असतो हे बोलून दाखवत. गडचिरोली जिल्ह्यातील मुलांची आबांना तशीच काळची होती. पुण्यातील पायगुडेंच्या सैनिकी शाळेत त्यांनी या जिल्ह्यातील ५० मुलांच्या शिक्षणाची तरतुद केली. कोणालाही पैसै द्यावे लागणार नाही म्हणून ही सर्व सोय मोफत करण्यात आली होती. ज्यांना मराठी देखील अवघड वाटायची अशी मुले पुण्यात येवून शिकू लागली व इंग्रजी बोलू लागली.

बंदुकीला बंदुकीने उत्तर देणाऱ्यातले आबा नव्हते.

आबांनी नक्षलवाद हा सामंज्यस्याने सोडवला जावू शकतो हा विचार केला. त्यासाठी आत्मसमर्पण करण्याचे प्रयत्न आबांनी राबवले. विशेष म्हणजे आर आर पाटलांच्या काळात सर्वाधिक आत्मसमर्पण घडून आले.

ज्या व्यक्तींवर नक्षलवादी संबधित असण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते अशा तरुणांवरील गुन्हे मागे घेवून त्यांनी सर्वसामान्य आयुष्य जगाव यासाठी आबांनी धडपड केली.

तीन राज्यांना जोडणाऱ्या गोदावरी, इंद्रावती, प्राणहिता नदीवरील आंतरराज्यीय पूल केंद्रासाठी आबांनी आपली ताकद वापरली.

आबांच्या काळात गडचिरोली जिल्ह्यासाठी महिन्यातून दोन बैठका होत असत. सचिव पातळीवरील लोक इथे येत असत. यातून गडचिरोली पॅटर्न विकसित होवू लागला. कदाचित आरआर पाटील अजून पाच दहा वर्ष असते तर गडचिरोली हा महाराष्ट्रातला एक विकसित जिल्हा म्हणून उदयाला आला असता पण दुर्देवाने तस झालं नाही.

आजही गडचिरोलीत काम करणारे तत्कालीन अधिकारी आबांच्या या कष्टांची जाणीव करुन देतात. याच श्रेय जितकं आबांना जातं तितकच सुधीर मुनगंटीवार यांना देखील जातं. कारण सुधीर मुनगंटीवार यांनी आबांना चलेंज दिलं आणि आबांनी ते स्वीकारलं.

त्यामानाने मुनगंटीवारांनी आज दिलेले चॅलेंज काहीच ठरत नाही. निवडणूकचं चलेंज देण्याऐवजी मुनगंटीवारांनी आबांना दिलं तसच चॅलेंज दिल असत तर कदाचित अजून एखाद्या जिल्ह्याने फिनिक्स पक्ष्यासारखी राखेतून भरारी घेतली असती.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.