दिवसाला 8 लाख खर्च करून 200 रुपये मिळतात, महाराष्ट्रातली अशीही एक रेल्वे…

बीडला रेल्वे आल्याने स्थानिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मागच्या ५० ते ६० वर्षांपासून बीडला रेल्वे सुरु करण्यात यावी अशी मागणी होती. शुक्रवारी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आष्टी-अहमदनगर रेल्वे लाईनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे आदी उपस्थित होते. 

अहमदनगर-बीड- परळी असा २६१ किलोमीटरची ब्रॉडगेज लाईन करण्यात येत आहे. 

आष्टी ते अहमदनगर हा ६६ किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. हा रेल्वे मार्ग व्हावा यासाठी राजकीय प्रेशर मोठ्या प्रमाणात होते. १९८४ पासून सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ही मागणी लावून धरली आहे. मात्र हे सगळं करताना या मार्गावर किती प्रवासी असणार याचा अंदाज लावण्यात आला नाही. जर प्रवासी संख्या कमी असेल तर याचा रेल्वे प्रशासनाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. 

अशाच प्रकारे पुणे-फलटण मार्गावर सुरु करण्यात आलेल्या डेमूला प्रतिसाद एकदम कमी मिळत आहे. रेल्वेचे अनेक वरिष्ठ अधिकारी या मार्गामुळे होत असणाऱ्या तोट्याबद्दल दबक्या आवाजात बोलत आहेत. मात्र त्यांच्यावर राजकीय दबाव असल्याने ते समोर येऊन बोलायला तयार नाहीत. 

आष्टी ते अहमदनगर मार्गावर डेमू रेल्वे सुरु करण्यात आली आहे. या रेल्वेला डिझेल इंजिन असतं. डेमूला फूट रेस्ट असल्याने ही रेल्वे कुठल्याही रेल्वे स्थानकावर थांबते. साधारण ८ ते १२ डब्यांची ही रेल्वे असते.   

पुणे फलटण मार्ग कधी सुरू झाला  

पुणे फलटण मार्गावर रेल्वे सुरु करण्याची मागणी अनेक वर्ष होते. सातारचे माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी पुणे फलटण मार्गावर रेल्वे सुरु व्हावी यासाठी २३ वर्ष संघर्ष केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर ३० मार्च २०२१ पासून या मार्गावर १० डब्यांची डेमू सुरु करण्यात आली.  

सकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी ही डेमू पुण्यावरून निघून ९ वाजून ४५ मिनिटांनी फलटणला पोहचते. तर संध्याकाळी ६ वाजता फलटण वरून निघून रात्री ९ वाजून ३५ मिनिटाला पुण्यात पोहचते.  या रेल्वेच्या माध्यमातून फलटण हे पुण्याशी जोडले जाईल असे यावेळी सांगण्यात आले होते. या रेल्वेमुळे शेतकरी, व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी यांना होईल असे सांगण्यात आले होते. 

आज पुणे फलटण मार्गावर प्रवाशांची काय परिस्थिती आहे 

पुणे फलटण मार्गावर डेमू सुरु होऊन १७ महिने झाले आहे. जितके प्रवासी तितकेच कर्मचारी गाडीत प्रवास करत असल्याचे चित्र आहे. एका फेरीसाठी रेल्वेला साधारण ८ लाख रुपये खर्च येतो. पहिल्या दिवसांपासून या मार्गावर प्रवासी संख्या कमी राहिली आहे. पहिल्या महिन्यात रेल्वेत ४ ते ५ प्रवासी असायचे. सप्टेंबर महिन्यात मार्गावर दररोज सरासरी १५ ते २० प्रवासी या रेल्वेनं प्रवास करत असल्याची माहिती रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली. 

पुणे ते फलटण ३० रुपये तिकीट आहे. जास्तीत जास्त प्रवासी हे लोणंद पर्यंतच प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेला एका फेरीतून २०० ते ५०० रुपयेच आर्थिक उत्पन्न मिळते.

मार्च २०२२ मध्ये २६२ प्रवाशांनी पुणे फलटण प्रवास केला. तर एप्रिल महिन्यात ६०५, मे महिन्यात १०३९, जून महिन्यात १ हजार ५७५ आणि ऑगस्ट महिन्यात २३९ प्रवाशांनी प्रवास केला. तर चालू महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात १६५ प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

प्रवाशांची सोय व्हावी या हेतूने रेल्वे प्रशासनाने पुणे-फलटण डेमू रेल्वे सुरु केली. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने रेल्वे प्रशासनाला रोज आठ लाख रुपयांचा तोटा सहन करत ही डेमू सुरु ठेवावी लागत आहे.

पुणे रेल्वे प्रवासी मंचाच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी बोल भिडूशी बोलताना सांगितले की,

पुणे ते फलटण डेमूचा मार्ग चुकला आहे. अगोदर ही रेल्वे पुणे ते लोणंद अशी होती. मात्र पुढे ती फलटण पर्यंत वाढविली. पुणे ते लोणंद दरम्यान प्रवासी असतात पण फलटण लोणंद दरम्यान रेल्वेत अजिबात प्रवासी नसतात. या मार्गावर प्रवासी डेमू ऐवजी रिक्षा, बस वापरतात. तिकीट सुद्धा १० ते १५ रुपये आहे.

तर दुसरीकडे जेजुरीला राज्याभरातून भाविक येत असतात. पुण्यातून जाणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा मोठी आहे. मात्र जेजुरीचे रेल्वे स्टेशन हे मंदिरापासून ३ किलोमीटरवर आहे. त्यामुळे पुण्यावरून हजारो लोक जेजुरीला जातात मात्र स्टेशन लांब असल्याने बसने जातात. शहरातून रेल्वे स्टेशन पर्यंत रिक्षाने जावं लागत आणि रेल्वे स्टेशन पासून परत गावात जायला सुद्धा रिक्षाने जावं लागत.

त्यामुळे या सगळ्या प्रवाशांना रेल्वे मुकली आहे. जेजुरीच नाही तर इतर रेल्वे स्थानक सुद्धा गावापासून दीड ते दोन किलोमीटर लांब आहेत. त्यामुळे प्रवासी रेल्वे ऐवजी वाहनांना प्राध्यान देतात.

सासवड रोड, नीरा, लोणंद सारख्या रेल्वे स्टेशनवर गार्डच तिकीट काढतो. त्यामुळे तो जो पर्यंत तिकीट काढतो तेवढ्या वेळ रेल्वे थांबलेली असते. यामुळे वेळ जातो. हा मार्ग निवडताना रेल्वे प्रशासनाची चूक झाली आहे त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी आहे.

दौंड प्रवासी मंचाचे अध्यक्ष विकास देशपांडे यांनी बोल भिडूशी बोलताना सांगितले की, 

सरकारने प्रवासी संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवे. प्रवासी संघाची स्थापना करून त्यांना बळ दिलं पाहिजे. तरच प्रवाशांची संख्या वाढली जाईल. दुसरीकडे पुणे दौंड मार्गावर सुद्धा डेमू सुरु आहे. या मार्गावर चांगले प्रवासी आहेत. मात्र मागच्या वर्षी तिकिटात २५ रुपयांनी वाढ केल्याने प्रवासी नाराज असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.

प्रवाशांची संख्या कमी असल्याने पुणे फलटण मार्गावर रेल्वेला ८ लाख रुपये खर्च करून २०० रुपये उत्पन्न मिळते. 

हे ही वाच भिडू

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.