एकदा बीडची सिटी बिर्याणी खाऊन बघा मग कळल बिर्याणी काय असते…

बीडचे वैशिष्ट्ये सांगायला गेलं तर हजार गोष्टी कमी पडतील. इथलं राजकारण तर देशभर फेमस आहे. तसेच बीडची अजून एक गोष्ट सर्वाधिक चर्चिले जाते ती म्हणजे बिर्याणी.  तुम्हाला सुद्धा अनेकवेळा तिथल्या मित्रांकडून ही गोष्ट ऐकायला मिळत असेल. 

बीडमध्ये जर बिर्याणी खायची असेल तर आपसूक नाव सांगितलं जाते ते सिटी हॉटेलच. सिटी हॉटेल मधली बिर्याणी जशी चवदार आहे. तसाच  या हॉटेलचा इतिहास देखील इंटरेस्टिंग आहे.

जुन्या बीडमध्ये राहणारे हाजी ताजुद्दीन कुरेशी, सरवर कुरेशी आणि इस्माईल कुरेशी हे तीन भावंड चामड्याचा व्यवसाय करायचे. घरची परिस्थिती तशी हालाखीची होती. चामड्याचा व्यवसायवर कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा. कुटुंबात मोठे असल्याने ताजुद्दीन कुरेशी यांनाच चामड्याच्या व्यापारासाठी औरंगाबाद, सोलापूर आणि हैद्राराबाद नेहमी जावं लागायचं. 

व्यवसायानिमित्त बाहेर जाणारे ताजुद्दीन यांना हॉटेलमध्ये जेवायचा मोठा शोक होता. 

त्यामुळे ते कधीही बाहेर जाताना घरी न जेवता जायचे आणि हॉटेलमध्येच जेवायचे आणि यातच ताजुद्दीन यांना बीडमध्ये हॉटेल टाकण्याची संकल्पना सुचली. व्यवसायातून जमा झालेल्या पैशातून १९५९ साली ताजुद्दीन यांनी बीडच्या पेठ बीड भागात पहिल्यांदा लकी नावाच हॉटेल सुरू केलं. 

सुरुवातीला चहा नाश्ता कॉफी असा या हॉटेलचा मेन्यू ठरला होता.  

चमड्याचा व्यवसाय सांभाळतच ताजुद्दीन आणि त्यांचे दोन भाऊ लकी हॉटेल सांभाळायचे चार वर्षे लकी  हॉटेल चालवल्यानंतर बीड मध्ये आपलं बिर्याणीच हॉटेल असावं म्हणून हे हॉटेल बंद करून सिटी हॉटेल सुरू करण्याच ठरवलं. 

हॉटेल व्यवसायात गोडी निर्माण झाल्यानंतर ताजुद्दीन यांनी आपल्या दोन मुलांना सोबत घेऊन १९६३ साली बीड शहरातील कारंजा रोडवर असलेल्या मर्कज मशिदीची जागा किरायाने घेतली आणि त्या ठिकाणी सिटी हॉटेल सुरू केलं.

हॉटेलचा मेन्यु होता मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन मसाला, चिकन मसाला आणि खिमा कलेजी.

हॉटेल मध्ये एका वेळेला तीस लोकांना बसून जेवण करता येईल अशी आसन व्यवस्था करण्यात आली. आणि विशेष म्हणजे हॉटेलमध्ये तयार होणाऱ्या बिर्याणीसाठी लागणारा मसाला स्वतः ते घरीच तयार करू लागल्याने खवय्यांची गर्दी वाढत गेली. यातूनच सिटी हॉटेलच्या बिर्याणीच नाव हळूहळू महाराष्ट्रभर पसरलं. चेन्नई असो की दिल्ली या ठिकाणचे लोक देखील बीडमधून जाताना सिटी हॉटेलमध्येच बिर्याणी खाण्यासाठी थांबू लागले. 

इथं बनवल्या जाणाऱ्या बिर्याणीसाठी लागणारे तांदूळ उच्च दर्जाचे असतात फ्रेश चिकन आणि मटन त्यासाठीं लागणारा सगळा मसाला आजही कुरेशी यांच्या घरीच बनवला जातो

१९८१ साली ताजुद्दीन कुरेशी यांचं निधन झाले. त्यानंतर त्यांची मुलं मुहंमद कुरेशी, बशिरोद्दीन कुरेशी आणि अमिनोद्दीन कुरेशी यांनी सिटी हॉटेलचा कारभार पूर्णपणे आपल्या हाती घेतला. आणि उत्कृष्ट नियोजन करून सिटी हॉटेलची विश्वासअर्हता आणि बिर्याणीची चव टिकवून ठेवली.

सुरुवाती पासून ते आजपर्यंत या हॉटेलमध्ये त्रिकोणी पराठा बनवला जातो. साठ वर्षात सिटी हॉटेलमध्ये खवय्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या रेसिपी बनत आहेत त्याची चव मात्र बदललेली नाही. १९६३ ला सुरू झालेल्या सिटी हॉटेलला आज साठ वर्षे पूर्ण झाले आहेत. 

दिवस बदलले, वर्ष बदलले मात्र सिटी हॉटेलमधल्या बिर्याणीची चव अजूनही तीच आहे.

त्यामुळे मुंबई, पुणे सोलापूर हैदराबाद दिल्ली चेन्नई  या ठिकाणाहून येणारे लोक देखील बीडमध्ये आल्यानंतर जेवणासाठी पहिली पसंती सिटी हॉटेललाच देतात. एवढंच काय तर अनेक राजकीय नेते सिनेसृष्टीतील कलाकार हे देखील बीडमध्ये आल्यानंतर सिटी हॉटेलचाच रस्ता विचारतात. 

आजही पुणे, मुंबई, सोलापूर,औरंगाबाद, लातूर या ठिकाणी सिटी हॉटेलची बिर्याणी पार्सल पाठवली जाते. ताजुद्दीन यांची तिसरी पिढी सध्या सिटी हॉटेलचे व्यवस्थापन सांभाळत असून ८४ वर्षाचे मुहंमद कुरेशी आजही हॉटेलमधल्या कॉलिटी आणि कॉन्टिटीवर लक्ष ठेऊन असतात. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.