एका रात्रीत कोकणातलं एक गाव जगाच्या नकाशावरून धरणाच्या पाण्यात गायब झालं.

धाय मोकलून रडणारी माय आणि हंबरणारी गाय यामुळं सारं वातावरण सुन्न झालं होतं. धो-धो कोसळणाऱ्या पावसात डोळ्यातून ओंघळणारे अश्रु देखील दिसत नव्हते. समाधान होतं ते फक्त जीव वाचल्याचं ! वर्षानुवर्षे काबाड कष्ट करून उभा केलेला संसार, घाम गाळून बांधलेलं घर आज डोळ्यादेखत धरणाच्या पाण्यात गायब होताना हतबल होऊन पाहण्याशिवाय त्यांच्या हातात काहीच नव्हतं.

ही कर्मकहाणी आहे वैभववाडी तालुक्यातील अभागी ठरलेल्या आखवणे, भोम आणि नागपवाडीतील धरणग्रस्तांची ! ही कर्मकहाणी आहे सरकारी अनास्थेला आणि पुढाऱ्यांच्या स्वार्थी आश्वासनांना बळी पडलेल्या पण मनानं श्रीमंत असणाऱ्या कोकणी माणसाची. 

होय, आज आम्ही रस्त्यावर आलो. आमचा गळा केसानं कापला गेला. आमचा तळतळाट लागेल या अधिकाऱ्यांना, पुढाऱ्यांना ! असेच शब्द अरूण खोरे मध्यम पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांच्या तोंडून ऐकायला मिळतात. त्याला कारण देखील तसंच आहे.

2001 साल उजाडलं आणि वैभववाडी तालुक्यातील आखवणे, भोम, नागपवाडी हे तिन्ही गाव धरणामध्ये जाणार असल्याची घोषणा झाली. 60 कोटी रूपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या धरणामुळे वैभववाडी तालुक्यातील 15 आणि राजापूर तालुक्यातील 2 गावांमधील साडेपाच हजार हेक्टर जमिन ओलिताखाली येणार असल्यानं तिन्ही गावांतील ग्रामस्थांनी आडेवडे न घेता धरणाच्या बांधकामाला परवानगी दिली.

2005 – 2006मध्ये प्रत्यक्षात धरणाच्या बांधकामाला सुरूवात झाली. त्यानंतर 2019मध्ये याच प्रकल्पाची किंमत ही 1600 कोटीवर पोहोचली आहे. धरणाची पाणीक्षमता ही 3.5 टीएमसी आहे. धरण बांधताना पहिल्यांदा पुनर्वसन हे सुत्र वापरलं जातं. पण, इथे मात्र याच नियमाला फाटा देत पहिल्यांदा धरणाचं काम सुरू करण्यात आलं.

पण, आजची स्थिती पाहता बाई मी धरण धरण बांधिते माझं मरणं मरण काढिते अशी अवस्था धरणग्रस्तांची आहे.

मुल्यांकनाअंती मिळणाऱ्या पैशात घोटाळा झाल्याचा आरोप करत प्रकल्पग्रस्तांनी वर्षभरापूर्वी आंदोलनाची हाक दिली. मोबदला मिळेपर्यंत गाव सोडणार नाही. वेळ पडल्यास या धरणात बुडून मरू अशी भूमिका तिन्ही गावांतील काही लोकांनी घेतली. काहींनी मिळालेल्या मोबदल्यावर समधान देखील व्यक्त केलं.  पण, आंदोलनानंतर झोळीत पडली ती केवळ आश्वासनं. प्रकरण न्यायालयात गेलं पण, न्यायाची झोळी रितीच राहिली. 80 टक्के प्रकल्पबाधितांना मोबदला दिल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी प्रकल्प ठिकाणची परिस्थिती काही वेगळीच आहे.2013चा भू संपादन कायदा लागू करा, वाढीव मोबदला द्या यासाठी धरणे आंदोलन, उपोषण झालं. पण, पदरी पडली ती केवळ निराशा !

अनेकांनी गाव सोडण्यास नकार देत न्यायाची मागणी केली.  या साऱ्या घटनाक्रमात पावसाळा तोंडावर आला आणि कंत्राटदारानं डाव साधला. 90 टक्के काम पूर्ण झालेल्या धरणाची घळभरणी 2020मध्ये होणं अपेक्षित असताना ती मे 2019मध्येच पूर्ण करण्यात आली. त्यामुळे पावसाळा सुरू होताच धरणात पाणी साठायला सुरूवात झाली. दिवसेंदिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पाणी पातळी वाढत होती.

अशा परिस्थितीत जुलै 2019च्या पहिल्या आठवड्यात मोबदल्याचं कारण देत गाव सोडण्यास नकार देणाऱ्या जवळपास 100 घरांमध्ये मध्यरात्री पाणी शिरलं. गाढ झोपेत असलेली माणसं आणि दावणीला बांधलेल्या जनावरांना प्राणांची बाजी लावत स्थानिकांनी वाचवलं. पण, संसार मात्र तिथेच होता. अनेकांनी जगण्यासाठी आणि न्यायासाठी गावठणातल्या जमिनीत सरकारनं उभारलेल्या शेडमध्ये आसरा घेतला. तर, काहींनी तिथल्या डोंगरमाथ्यावर.  शेडमधील परिस्थिती मात्र जनावरांच्या गोठ्यापेक्षा देखील वाईट. ना विजेची व्यवस्था ना मोबाईल नेटवर्कची सोय.

धरणापासून जवळ असलेल्या मांगवली, हेत या गावांमध्ये गावठाणची व्यवस्था करण्यात आली आहे. पण, राहण्यासाठी दिलेली 10 बाय 10ची शेड कोकणातल्या मुसळधार पावसापुढे तग धरेल का? हाच प्रश्न आहे. शिवाजी जीनगरे यांनी आपल्या भावनानां वाट मोकळी करून दिली

“आज आम्ही मुंबईतून सर्व सोडून 100 वर्षाच्या आईसाठी गावी येऊन बसलोय आता यांच्या नावानं रडायचं का? धरणग्रस्तांचं पुनर्वसन करतानाचे सर्व नियम धाब्यावर बसवले गेले आहेत. गावठाणात पुनवर्सन करताना पावणेचार गुंठे जमिन दिली जाईल असं सांगितलं. पण, आता मात्र पावणे दोन गुठे जमिन दिली जात आहे. यामध्ये आम्ही राहायचं तरी कसं? आणि आमच्या जनावरांचं काय?अहो मायबाप सरकार आम्हाला नीटपणे जगू देत नाही किमान सन्मानानं मरू द्या तरी. आम्ही मेल्यावर जाळण्यासाठी स्मशानभूमी देखील नाही ही आहे आमची अवस्था ! आमचं जगणं मातीमोल केलंत पण आता सन्मानानं मरू द्या,”

 हे सांगताना दाटून आलेल्या भावनांचा बांध एव्हाना फुटला होता. खंबीरपणाचं उसनं अवसान आणणाऱ्या शिवाजी जीनगरे यांनी आपल्या अश्रुंना मोकळी वाट करून दिली होती. डोळ्यातून बाहेर आलेले अश्रू बरंच काही सांगत होते. शब्दांमध्ये कंप होता आणि डोळ्यात होती ती फसवणूक झाल्याची भावना !

आज देखील सर्वांची पावलं धरणाकडे वळतात. मुंबईहून उतरलेला चाकरमानी  गावठाणातल्या घरी न जाता पहिल्यांदा धरणाकडे जातो. दाटून आलेल्या शब्दात आठवणींना उजाळा देतो. निरागसपणे धरणाच्या टोकावरून शांत नितळ पाण्याकडे पाहत  राहतो. भिरभिरत्या नजरेनं काहीतरी शोधत राहतो. जड पावलांनी मागे वळून पाहत  चिखलवाटेत उफाळून आलेल्या भावनांना दाबत  माघारी फिरतो. मनात असते ती एकच गोष्ट माझं गाव, माझं घर, माझा संसार किमान एकदा तरी माझ्या नजरेला पडेल !

  • भिडू अमोल मोरे

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.