महाभारत सिरीयल चक्क एका मुस्लिम लेखकाने लिहिली होती…

सध्या सोशल मीडियावर एका मुस्लिम आजोबांनी गायलेल्या महाभारताच्या  व्हिडिओ भरपूर व्हायरल होतोय. भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लोकांसाठी जबरदस्त एक जबरदस्त चपराक आहे.

पण महाभारतसुद्धा एका मुस्लिम कवीने लिहिलं होतं आणि त्यावर कैक लोकांनी आक्षेपसुद्धा घेतला होता त्याबद्दलचा हा किस्सा. 

महाभारत हि एक अशी सिरीयल होती जिचं नाव भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल. १९८८ मध्ये रिलीज झालेल्या या सिरियलची पॉप्युलॅरीटी इतकी होती कि श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे नितीश भारद्वाज, दुर्योधनाची भूमिका साकारणारे पुनीत इस्सर, भीष्म साकारणारे मुकेश खन्ना आजही घराघरात लोकप्रिय आहेत.

महाभारत बनवणारे बि.आर.चोप्रा यांनी भरपूर रिसर्च करून मालिका तयार केली होती. चोप्राना एक उत्तम गोष्ट लिहिणारा लेखक हवा होता. चोप्राना अनेक लोकांनी दिलीप कुमार यांचं नाव सुचवलं. दिलीप कुमार महाभारताचं नरेशन सांगतील हि गोष्ट बी आर चोप्राना पटणारी नव्हती. बरेच दिवस याबद्दलच चर्चा सुरु होती. 

मग खुद्द बी आर चोप्रानी महाभारताच्या नरेशनसाठी साउथचे तेव्हाचे टॉपचे स्टार एनटी रामाराव यांना घेण्याचा विचार केला. पण पुढे हि योजनासुद्धा बारगळली. मग बी आर चोप्रा वैतागले आणि त्यांनी त्यांच्या ओळखीच्या काही लेखकांना महाभारताची स्टोरी पाठवली. यातच एक कवी होते राही मासूम रजा.

एके दिवशी राही मासूम रजा यांचं बी आर चोप्रा यांच्या घरी आगमन झालं. ते आल्यावर चोप्राना म्हणाले आपल्या महाभारताच्या गोष्टीबद्दल आणि नरेशन बद्दल मी ऐकलंय. मी काहीतरी लिहून आणलंय, ते मी तुम्हाला ऐकवून दाखवतो. चोप्रा साहेब सावरून बसले आणि राही मासूम रजा यांच्या तोंडातून पहिली ओळ बाहेर पडली ती म्हणजे

मैं समय हूं…

त्यावेळी बी आर चोप्राना मोठं आश्चर्य वाटलं कि इतक्या साऱ्या बंदिश पाठ असणाऱ्या आणि विशेषता उर्दूमध्ये प्रभावी काम करणाऱ्या राही मासूम रजा यांनी इतकं सुंदर हे कस काय लिहिलं. चोप्रानी राही मासूम रजा यांनी लिहिलेलं सगळं मन लावून ऐकलं आणि त्यांनी ठरवलं कि आता महाभारताचं नरेशन राही मासूम रजा हेच लिहितील. 

एका मुस्लिम कवीने तेव्हा महाभारत लिहिणे यावर काही लोकांचा आक्षेप होता पण जेव्हा महाभारत सिरियलच नरेशन आणि डायलॉग लोकांपर्यंत पोहचले तेव्हा सगळेच चकित झाले होते. आजसुद्धा महाभारत सिरियलच यश हे राही मासूम रजा यांच्या लेखनाला मानलं जातं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.