समलैंगिक सैनिकाची भूमिका असणारा चित्रपट बनवायच्या आधीच वादात सापडलाय

भारतीय सैन्य. असा मुद्दा जो सगळ्याच देशातील नागरिकांच्या खूपच जवळचा आहे. एक विशिष्ट आदर सैन्याबद्दल सगळ्यांच्या मनात असतो. त्यातही बॉर्डर, एलओसी कारगिल, टॅंगो चार्ली, उरी यांसारख्या चित्रपटांनी त्यात टाकलेली भर वेगळी. अशा चित्रपटांनी प्रभावित होऊन अनेक तरुण सैन्यात सामील होण्याचं स्वप्न उराशी बाळगून भविष्याची निवड करतात. मात्र चित्रपटांतून जे दाखवल्या जातं ते पूर्ण सत्य असतं असं नाहीये. एखाद्या गोष्टीचा संपूर्ण चेहरा यातून पुढे येत नसतो. त्यातून फक्त तेच दाखवल्या जात जे चित्रपट बनवणाऱ्याला दाखवायचं असतं. मात्र या निर्मात्यांनी देखील काय दाखवावं हे कुणी कंट्रोल करू शकतं  का? 

याचं उत्तर आहे ‘हो’. सैन्यावर आधारित एका चित्रपटाच्या वादावरून नुकतंच हे समोर आलं आहे.

चित्रपटांचा मोठा प्रभाव सर्वांवर असल्याने चित्रपटांना प्रबोधनाचं माध्यम अनेकांनी बनवलं आहे. अशा प्रबोधन करणाऱ्या चित्रपटांचा वेगळा निर्माता वर्ग, वेगळे प्रेक्षक तयार झालेत. मात्र जेव्हा केव्हा या चित्रपटांचा विषय निघालाय तेव्हा या कथांना समाजापुढे आणण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागलाय आणि करावा लागतो. असंच काहीसं घडलंय ‘निर्माता ओनिर’ आणि त्यांच्या आगामी चित्रपटाच्या कथेसोबत.

कोण आहेत ओनिर? आणि झालंय काय?

ओनिर हे भारतीय दिग्दर्शक, संपादक, पटकथा लेखक आणि निर्माता आहेत. ते ‘माय ब्रदर…निखिल’ या चित्रपटासाठी तो प्रसिद्ध आहेत. सामाजिक विकृती आणि त्यासंदर्भातील सत्य दाखवणारे चित्रपट ते बनवतात. असाच एक चित्रपट त्यांनी २०१० मध्ये बनवला होता, नाव होतं ‘आय एम’. या चित्रपटात एकल-मातृत्व, समलैंगिकता आणि समाजातील इतर समस्यांवर भाष्य करणाऱ्या ४ कथा दाखवण्यात आल्यायेत. त्याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. 

याच चित्रपटाचा सिक्वेल त्यांना आता काढायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी भारतीय लष्करातील एका मेजरची कथा निवडलीये. मात्र मंत्रालयाने त्यांची स्क्रिप्ट नाकारली असून प्रतिसादात म्हटले आहे की, अशा कथेमुळे भारतीय लष्कराची प्रतिमा खराब होईल. याचमुळे आता वाद निर्माण झाला आहे.

असं काय आहे या कथेत की ती नाकारण्यात आली?

असं सांगण्यात येतंय की, ही कथा पूर्णपणे वास्तवाशी संबंधित असून ती अशा भारतीय सैनिकांबद्दल आहे ज्याला त्याच्या लैंगिक ओळखीमुळे (Sexual Identity) सैन्य सोडावं लागलं होतं. ‘मेजर जे सुरेश’ असं या सैनिकाचं नाव आहे. २०२० मध्ये, या माजी भारतीय लष्कर अधिकाऱ्याने ब्लॉग लिहून समलिंगी असल्याने त्यांना सैन्यात आणि सामान्य जीवनात काय अनुभव आले हे सार्वजनिक केलं. आपल्या ब्लॉगमध्ये सुरेश यांनी सर्वोच्च लष्करी नेतृत्वाच्या कथित ‘होमोफोबिया’बद्दल देखील सांगितलं.

होमोफोबिया म्हणजे समलैंगिकांची भीती. समलैंगिक असे असतात ज्यांचे समान लिंगाच्या लोकांशी संबंध आहेत. पुरुषांमध्ये गे (Gay) आणि महिलांमध्ये लेस्बियन (Lesbian) असं यांना म्हटलं जात. जे लोक होमोफोबिक आहेत ते समलैंगिकांना घाबरतात आणि त्यांना टाळू इच्छितात. मानसशास्त्रानुसार या भीतीची अनेक कारणं असू शकतात. 

सुरेश यांच्या ब्लॉगमध्ये नेमकं याचाच उल्लेख त्यांनी केला. ज्यात त्यांनी समलैंगिक अधिकारांचा कथित अनादर आणि सैन्यात सन्मानाची कमतरता याबद्दल देखील लिहिले.

याच मुद्यावर ओनिर यांना चित्रपट तयार करायचा आहे. मात्र जर संरक्षण-थीमवर चित्रपट बनवायचा असेल तर त्यासाठी संरक्षण मंत्रालयाचं ना-हरकत-प्रमाणपत्र (एनओसी) आवश्यक आहे. म्हणून ओनिर यांनी त्यांच्या चित्रपटाची स्क्रिप्ट १६ डिसेंबर २०२१ ला संरक्षण मंत्रालयाला पाठवली. २० जानेवारी २०२२ ला त्यांना मंत्रालयाचं उत्तर आलं आणि उत्तर म्हणून मंत्रालयाने चित्रपटाला एनओसी देण्यास नकार दिला.

स्क्रिप्ट नाकारल्यानंतर ओनिर यांनी एक ट्विट केलं. त्यात लिहिलं होतं…

स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकतेला गुन्हेगारीच्या कक्षातून बाहेर करणारा ठराव पारित करण्याला ३ वर्ष झाली. पण एक समाज म्हणून, आपण समानतेच्या दृष्टीकोनातून खूप दूर आहोत, LGBTQI समुदाय जगातील ५६ देशांच्या सैन्यात स्वीकार्य आहे, परंतु तरीही भारतीय सैन्यात बेकायदेशीर आहे, असं ओनिर यांनी सांगितलं.

यानंतर ओनिर यांनी भारतीय लष्करातील ‘अस्वीकार्य समलैंगिकता’ या विरोधात ऑनलाइन याचिका (Online Petition) सुरू केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, “शतकांपासून आपण समान हक्कांसाठी लढत आहोत. आता ‘टेक इट इझी’ म्हणत सामान्य वागणुकीसाठी अजून थोडा वेळ थांबा असं मला म्हणू नका. तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनण्याची गरज आहे. तुमच्यात सहानुभूती नसल्याने मी थांबू शकत नाही!”

त्यांच्या या पेटिशनवरून वरून गांधी यांनी संरक्षण मंत्रालयाला प्रश्न विचारले. संरक्षण मंत्रालयाने ओनिरचा चित्रपट का नाकारला?  मंत्रालयाच्या या वृत्तीने कलम १४ चे उल्लंघन होत नाही का? आतापर्यंत किती एनओसी नाकारल्या गेल्या, किती प्रलंबित आहेत? दिग्दर्शकांना संरक्षणाशी संबंधित चित्रपट बनवण्यासाठी लष्कराकडून एनओसी घेण्याची गरज का आहे?असे हे प्रश्न होते. 

गृह राज्यमंत्री अजय भट्ट यांनी यावर लेखी उत्तर दिलं. त्यात त्यांनी म्हटलं…

एनओसी नाकारण्याचं कारण म्हणजे काश्मीरमध्ये काम करणारा सैनिक आणि स्थानिक मुलगा यांच्यातील प्रेमसंबंध दाखवणे, जे भारतीय सैन्याची प्रतिमा वाईट करतं शिवाय सुरक्षेचे प्रश्न उपस्थित करतात. ही प्रक्रिया मनमानी किंवा भेदभाव करणारी नसून त्यामुळे घटनेच्या कलम १४ चे उल्लंघन होत नाही. राष्ट्रीय सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, लष्करातील शिस्त, सशस्त्र दलांची परंपरा आणि सामान्य जनतेच्या मनात दलाची प्रतिमा यासारख्या घटकांचा विचार करून प्रत्येक प्रकरणाचा विचार केला जातो.

शिवाय असंही सांगितलं की १ जानेवारी २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ या काळात लष्कराला असे एकूण १८ प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी फक्त एक नाकारण्यात आला आहे आणि एक प्रलंबित आहे. बाकी सगळे पास झालेत.

या स्पष्टीकरणावर ओनिर परत बोलते झाले.

एक सैनिक आणि स्थानिक मुलगी यांच्यातील संबंध चांगले आहेत, परंतु समलिंगी पुरुषाला काही भावना असू शकत नाहीत. होमोफोबियाने त्याचा कुरूप चेहरा दाखवला आहे.

भारतीय सैन्याच्या शौर्याच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या संघर्षाच्या, त्यागाच्या अनेक कथा आपण चित्रपटांतून बघतो. मात्र भारतीय सैन्याचा असाही एक पैलू दाखवण्याचा प्रयत्न केला असता एका दिग्दर्शकाला साफ नकार देण्यात आलाय. कारण दिलंय ते सैन्याच्या प्रतिमेचं. मात्र नकार देऊन तयार होणारी प्रतिमा कितीपट साफ आहे? असे प्रश्न यातून उपस्थित केले जात आहेत. देशासाठी आदर्श असणाऱ्या सैन्याची अशी वागणूक योग्य आहे का? यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.