पिक्चरचं ऑनलाईन तिकीट बुकींग करतांना तुम्हाला गंडवलं जातंय.

तुम्ही मोठमोठ्या थेटरात पिक्चर पाहायला जातात. पिक्चर लईच भारी आणि सुपरहिट झालेला असेल तर तिकीट मिळवण्यासाठी लईच घासाघीस करावी लागते. लाईनीत उभं रहावं लागतं. लाईनीत उभं राहूनही पाहिजे ती सीट भेटत नाही. पार पुढच्या रांगेत किंवा एका कोपऱ्यात मळकी असलेली सीट आपल्याला भेटते.

पण तुम्ही म्हणाल कुणी सांगीतलंय एवढी डोक्याला कटकट. त्यापेक्षा चार दोन रूपयं जास्त घालून घरबसल्या BookMyshow वर ऑनलाईन तिकीट बुकींग करायचं आणि मनपसंत सीट घ्यायची. भि़डूंनो तुमचं अगदी खरं आहे.

मात्र, भिडूंनो तुमच्या या आळशीपणाचा फायदा घेतला जातोय, तुम्हाला फसवलं जातंय. ऑनलाईन तिकीट खरेदी करतांना BookMyShow कडून ऑनलाईन फी चार्जेसच्या नावाखाली तुम्हाला गडंवलं जातंय. असं स्वत: RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सांगितलंय.

आता तुम्ही म्हणाल कसं काय गडवलं जातंय? थोडा धीर धरा जिथं कमी तिथं आम्ही आहोतच की. सगळं इस्कटून सांगतो.

झालं असं की, ऑनलाईन तिकीट खरेदी करतांना एक्स्ट्रा चार्जेस घेण्याचा अधिकार BookMyShow, PVR कंपन्यांना आहे का? असा प्रश्न हैद्राबादचे आरटीआय कार्यकर्ते विजय गोपाल यांनी आरबीयला विचारला होता. तेव्हा या प्रश्नांना उत्तर देतांना आरबीआयनं सांगितलं,

ऑनलाईन तिकीट खरेदी करतांना ऑनलाईन चार्जेस फी च्या नावाखाली तुमच्याकडून जे एक्स्ट्रा पैसै घेतले जातात ते घेण्याचा कसलाच अधिकार BookMyShow, PVR सारख्या कंपन्याना नाही, या कंपन्या एक्स्ट्रा चार्जेसच्या नावाखाली पैसे घेऊन आरबीआयच्या मर्चेंट डिस्काउंट रेट (एमडीआर) या नियमाचं उल्लघंन करत आहेत.

RTI

आता नेमकं मर्चेंट डिस्काउंट रेट ( MDR) म्हणजे काय?

जेव्हा आपण एखाद्या दुकानात खरेदी करतांना डेबीट किंवा क्रेडीट कार्डचा वापर करतो तेव्हा दुकानदार आपल्याकडून 2 टक्के किंवा 4 टक्के जास्त फी आकारतो. कारण डेबीट किंवा क्रेडीट कार्डवरून खरेदी केल्यामुळे दुकानदारांना एमडीआर भरावा लागतो आणि ती एमडीआरची फी दुकानदार आपल्याकडून वसूल करतो. सोप्यात सांगायचं ठरलं तर डेबीट आणि क्रेटीड कार्डवरून खरेदी केली तरच एमडीआर द्यावा लागतो. आणि तो एमडीआर हा दुकानदारांना भरावा लागतो ग्राहकांना नाही.

तुम्हाला सोपं उदाहरणं देऊन समजावतोत.

सध्या पुण्यातील राहुल थिएटरमध्ये ‘बदला’ नावाचा पिक्चर लागलेला आहे. या पिक्चरचं तिकीट आपण ऑनलाईन BookMyShow वरून खरेदी केलं तर त्यांची किंमत आपल्याला 157.82 रूपये मोजावी लागते. आणि हेच तिकीट आपण तिथं जाऊन रांगेत उभं राहून खरेदी केलं तर त्यांची किंमत आहे 138 रूपये. म्हणजेच ऑनलाईन फी चार्जेसच्या नावाखाली तुमच्याकडून 19.82 रूपये जास्त घेतले जातात. त्यामध्ये 16.08 रूपये हे बुकींग चार्जेस आहेत आणि 3.02 इंटीग्रेटेड जीएसटी भरावा लागतो.

म्हणजे 16.08 रूपये जी ऑनलाईन फी आहे ती BookMyShow नं बॅकेंनं भरायला हवी. मात्र ती ग्राहकांकडून सध्या उकळली जात आहे.

या सगळ्यामुळे आरटीआय कार्यकर्ते विजय गोपाल यांनी या कंपन्याविरोधात हैद्राबादमधील ग्राहक न्यायालयात तक्रार केली आहे. त्याची सुनावणी 23 मार्चला होणार आहे.

फक्त BookMyShow तुमच्याकडून जास्त पैसे उकळत नाही,

तर विविध कॅब सर्व्हीसेस, स्वीगी सारखे फुड डिलीवरी अँपसुद्धा BookMyShow सारखे पर्याय वापरत आहेत.

त्यामुळे ग्राहकांनी याविरोधात एकत्र येवून आवाज उठवला पाहिजे, असं, आरटीआय कार्यकर्ते विजय गोपाल यांचं म्हणणं आहे.

ग्राहकांनी काय करावं हवं.

जर तुमच्याकडून अशा पद्धतीनं जास्त पैसे उकळले जात असतील तर तुम्ही https://rbi.org.in/scripts/complaints.aspx या साईटवर जाऊन तक्रार करू शकता.

तसंच तो संबधीत व्यापारी, दुकानदार ज्या बँकेत या बद्दल ट्रांन्झक्शन करत असेल तीथं जाऊन चौकशी करू शकतात. जर बँकेनं ग्राहकांना 30 दिवसांच्या आत समाधानकारक उत्तर दिलं नाही तर बँकेच्या लोकपालाकडे तक्रार करा, असं आरबीयानं आरटीआय कार्यकर्ते विजय गोपाल यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिलं आहे.

दरम्यान, कार्यकर्त्यांनो या सगळ्या गोष्टीपासून सावध रहा. कारण तुमच्या आळशीपणाची तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागते. त्यामुळे आँनलाईन फीच्या नावाखाली गंडले जाऊ नका. बाकी BookMyShow जे जास्त पैसे उकळत आहे, त्याचा निकाल 23 मार्चला लागेलच आणि त्यांचा भांडा फुटेल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.