स्वातंत्र्यलढ्यातील एकमेव अमेरिकन ज्याने भारतात ‘सफरचंद क्रांती’ घडवून आणली !

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असलेल्या विदेशी नागरिकांचा जेव्हा कधी विषय निघतो त्यावेळी ‘सॅम्यूअल इव्हान्स स्टोक्स’ उर्फ ‘सत्यानंद स्टोक्स’ हे नाव अतिशय आदराने आणि प्राधान्याने घेतलं जातं. या माणसाने फक्त गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्याचा लढाच लढला नाही तर हिमाचल प्रदेशमध्ये ‘सफरचंद क्रांती’ घडवून आणत हिमालयातील सफरचंदाना जागतिक कीर्ती मिळवून दिली.

सत्यानंद स्टोक्स यांची नात असणाऱ्या आशा शर्मा यांनी  ‘अॅन अमेरिकन इन गांधीज इंडिया’ नावाचं सत्यानंद स्टोक्स यांचं चरित्र लिहिलंय. या पुस्तकात त्यांनी  सत्यानंद यांचं भारतातील वास्तव्य, सफरचंद क्रांती आणि त्यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग याविषयी या पुस्तकातून महत्वाची माहिती आपल्यासमोर येते.

कोण होते सॅम्यूअल इव्हान्स स्टोक्स उर्फ सत्यानंद स्टोक्स..?

सॅम्यूअल इव्हान्स स्टोक्स हे एका प्रतिथयश अमेरिकन उद्योजक घराण्यातील होते. १९०४ साली वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी ते शिमल्याला आले होते. शिमल्यात लेप्रसी रोगाशी लढणाऱ्या लोकांचे हाल बघून त्यांची सेवा करण्यासाठी तिथेच वास्तव्याचा निर्णय त्यांनी घेतला.

सॅम्यूअल यांचा हा निर्णय त्यांच्या कुटुंबियांच्या पचनी पडणं शक्यच नव्हतं. त्यामुळे आपल्या कुटुंबियांशी त्यांचा दुरावा निर्माण झाला होता. नंतर मात्र मुलाच्या प्रेमापायी घरच्या मंडळींनी त्यांच्या निर्णयाचा स्वीकार केला.

भारतातील वास्तव्य आणि शिमल्यातील सफरचंद क्रांती

सॅम्यूअल यांनी शिमल्यापासून जवळच असलेल्या कोटगढ येथील एका चर्चमध्ये ख्रिश्चन मिशनर्यांसोबत राहून सॅम्यूअल लेप्रसी रोगाशी लढणाऱ्या गोरगरिबांची सेवा करायला सुरुवात केली. काही दिवसातच त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचा प्रश्न फक्त रोगराई हा नाही तर बेरोजगारी आणि त्यामुळे येणारं दारिद्र्य हा देखील आहे.

लोकांकडे खायला अन्न नाही आणि घालायला कपडे नाहीत. त्यामुळे आपण या भागात असं काहीतरी केलं पाहिजे ज्यामुळे लोकांचं दारिद्र्य कमी होईल आणि त्यांना काम मिळेल. त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न भागेल. त्यातूनच त्यांना एक कल्पना सुचली.

कोटगढमधील वास्तव्यात सॅम्यूअल यांना लक्षात आलं होतं की तिथलं वातावरण आणि अमेरिकेतील वातावरण यात बरचसं साम्य आहे. या वातावरणात सफरचंदांची लागवड फार चांगली होऊ शकेल. त्यातूनच कोटगढमध्ये सफरचंदांची लागवड करायची हा विचार त्यांनी मनाशी पक्का केला होता.

एकदा काही कामानिमित्त ते अमेरिकेत गेले असता तिथून परतताना ते आपल्यासोबत फिलाडेल्फिया येथील सफरचंदांची काही रोपे घेऊन आले आणि ते त्यांनी आजूबाजूच्या लोकांमध्ये वाटून टाकले. सफरचंदांची लागवड सुरु केली. त्यांनी हा प्रयोग केला त्यावेळी तो पुढे चालून हरियानात आर्थिक क्रांती घडवून आणेल याची त्यांना कल्पना देखील नसेल.

खरं तर सुरुवातीच्या काळात लोकांना सफरचंदाच्या लागवडीसाठी  तयार करणं हे मोठच आव्हानात्मक काम होतं. कारण सफरचंदाचं रोप वाढून मोठ व्हायला जवळपास ६ महिन्यांचा कालावधी लागतो. अशा वेळी इतका वेळ वाट बघणं लोकांसाठी त्रासदायक होतं.

सफरचंदाची लागवड करून करायचं काय आणि या मोठ्या काळात खायचं काय असाच प्राशन लोकांपुढे होता. असं असतानाही सॅम्यूअल यांनी लोकांशी संवाद साधला. या लागवडीतील दीर्घकालीन फायदे लोकांना समजावून सांगितले आणि शेवटी त्यासाठी लोकांना तयार केलं.

आजघडीला हिमालयातील सफरचंदांना जागतिक पातळीवर मोठी मागणी आहे. हे त्याकाळात सॅम्यूअल यांनी केलेल्या प्रयत्नांचंच फळ आहे.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग

सॅम्यूअल इव्हान्स स्टोक्स उर्फ सत्यानंद स्टोक्स

सॅम्यूअल यांना ज्यावेळी जालियानवाला बाग हत्याकांडाविषयी समजलं त्यावेळी ही घटना ऐकून ते हेलावून गेले. भारतीयांना ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असं तीव्रतेने वाटायला लागल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये काम करायला सुरुवात केली. भारताच्या स्वातंत्र्याची मागणी करणारं विपुल लिखाण त्यांनी तत्कालीन वृत्तपत्रांमधून केलं.

दरम्यानच्या काळात महात्मा गांधींचे अनुयायी असणाऱ्या चार्ल्स फ्रीर अॅड्र्यूज यांच्यामुळे सॅम्यूअल गांधीजींच्या संपर्कात आले गांधीजींसोबत काम करायला लागले. सॅम्यूअल यांच्या कामाने प्रभावित झालेल्या गांधीजींनी पंजाब प्रांताची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. ही जबाबदारी पार पडताना त्यांना अनेकवेळा तुरुंगवास भोगावा लागला.

१९३२ साली त्यांनी हिंदू धर्माचा स्विकार करून स्वतःच्या नावात बदल केला. सॅम्यूअल हे ‘सत्यानंद’ झाले. पुढे सत्यानंद यांनी प्रीयादेवी या भारतीय मुलीशी लग्न केलं आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ते भारतातच राहिले. प्रीयादेवी यांच्यापासून त्यांना झालेल्या ७ अपत्यांची नावे देखील त्यांनी भारतीयच ठेवली. मुळचे अमेरिकन असल्याने त्यांना ‘अँग्लो इंडियन’ म्हंटलं जात असे. ही गोष्ट त्यांना अजिबात आवडायची नाही. ते स्वतःला भारतीयच म्हणवून घेणं अधिक पसंत करत.

स्वातंत्र्य संग्रामादरम्यान सॅम्यूअल यांना ज्यावेळी तुरुंगात जायला लागलं त्यावेळी त्यांना अमेरिकन म्हणून खास वागणूक देण्यात आली जी त्यांनी आग्रहाने नाकारली. आपण भारतीय आहोत आणि भारतीय राजकीय कैद्यांना दिली जाणारी वागणूकच आपल्याला देण्यात यावी असं त्यांनी ब्रिटिशांना सांगितलं. १४ मे १९४६ रोजी भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच शिमल्यात त्यांचं निधन झालं त्यामुळे  स्वातंत्र्य भारतात शेवटचा श्वास घेण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली.

Leave A Reply

Your email address will not be published.