प्रेक्षकांना थेटरपर्यंत खेचून आणायला जे स्टारडम लागतं ते फक्त अंकुशकडे आहे

आम्ही कॉलेजला असल्यापासूनच अंकुशचं नाव ऐकून होतो. कॉलेजेस वेगळी असली तरी. अंकुश आणि भरत…

अंकुश तर हिरो होणार याची आम्हा मुलांना खात्री होती कारण आम्हा मराठी मुलांमध्ये सहसा न आढळणारा फॅशन सेन्स आणि एक स्मूदनेस होता त्याच्या वावरात आणि जोडीला देखणेपण. तो काही मराठी मालिकांमध्ये होता तिकडेही तोच लक्ष वेधून घ्यायचा. कालांतराने आमची पिढी कॉलेज जीवन संपवून पोटापाण्याच्या उद्योगाला लागली.

लग्न वगैरे करून गृहस्थाश्रमात शिरण्याची तयारी करू लागली. मराठी सिनेमा पाहणं फार क्वचित. तो काळ मांजरेकरांचा होता. मराठीतून हिंदीत दमदार झेप घेतली होती त्यांनी. त्याकाळात अंकुश जिस देश में आणि पिता मध्ये दिसला. आम्ही ज्याला साईड रोल्स म्हणतो अशा रोल्स मध्ये. म्हटलं आता हा हिंदीत साईड हिरो म्हणून वाया जाईल की काय ? जाम वाईट वाटलं. ये ऐसा सीन नही अपने स्क्रिप्ट में. अंकुश हिरो हैं.. उसको आना पडेगा हिरो बनके…

आणि मिलेनियमच्या दारातून मराठी सिनेमा कात टाकत आला. ‘सावरखेड एक गाव’ हा राजीव पाटील यांचा सिनेमा उत्तम कथा, गाणी, कलाकार घेऊन आला आणि अंकुश या गॅंगचा हिरो (श्रेयस तळपदे, उपेंद्र लिमये ही मातब्बर मंडळी असताना) आणि वाऱ्यावरती गंध पसरला सारखं सुंदर गाणं… अहा… मस्त वाटलं. गडी आपल्या रोलमध्ये आला होता. मग लगोलग केदार शिंदेंच्या जत्रा मध्ये दीपाली सय्यद बरोबर ये गो ये मैना, हे गाणं बघताना इतक्या वर्षानंतरही मला वाटतं बॉस कुठल्याही हिंदी सिनेमाच्या हिरोला टक्कर देणारा आहे हा आपला भाऊ.. त्याचं उभं राहणं, नाचणं… किलर!

अंकुश (आणि भरत, स्वप्नील ही सगळी मंडळी) मराठी सिनेमा इंडस्ट्रीने जवळपास तीस वर्षांपूर्वी हरवलेलं एक कवच..? नव्हे अस्त्र मिळवण्याच्या मार्गावर होती…आणि ते होतं…
स्टारडम!

अंकुशने बरेच मराठी सिनेमे केले आणि त्या सगळ्यात एक कलरफुल फ्रेशनेस आहे. अभिनेता तर तो चतुरस्त्र आहे आणि त्याचं कॉमेडीचं टायमिंग हे मला तरी राजा गोसावी आणि शरद तळवलकर यांच्यासारखं सहज ज्याला इंग्रजीमध्ये native म्हणतात तसं फुल टू आत वसलेलं असं आहे. परंतु त्याच्यामधलं स्टार मटेरियल, हिरोइझम संजयदादांनी सहीच बाहेर काढलं. स्टायलिशरित्या प्रस्तुत केलं. मला या जोडीचे चेकमेट पासून सगळे सिनेमे आवडतात. रिंगा रिंगा बऱ्याच लोकांना आवडला नाही तरी (भरत यात भाव खाऊन गेलाय मात्र) बायगो बायगो हे फेसाळबार गाणं त्यावर व्हाईट शर्ट (आपल्या लालबाग दादर माहीम पोरांचा फेव्हरेट शर्ट) घालून थिरकणारा अंकुश…

हे असलं तरी अंकुश सरळ साध्या भूमिकांमध्ये तितकाच ठाव घेतो मनाचा. च्यामारी त्याचा ‘डबल सीट’ मधला अमित इतका पाहिलाय, इतका जवळचा आहे की मीच आहे तो.. भावा… लव्ह यु असं निघालं माझ्या तोंडून…

अंकुश, भरत आणि केदार या तिघांची मैत्री ही आमच्या पिढीची गोष्ट सांगते इतकी प्रातिनिधिक आणि बोलकी आहे. कष्ट करणं हेच यशस्वी होण्याचा मार्ग आहे असा विश्वास असणं, मोठ्यांचा आदर ठेवणं, मित्रांसाठी वाटेल ते पण तोच मित्र वाईट मार्गाने जात असेल तर कान उपटून त्याला मार्गी लावणं… मुंबईच्या एका पिढीची यशोगाथा..जी कदाचित गँगवॉर मध्ये संपली असती..

मी 9 एक्स झकासमध्ये असताना एकाला म्हटलं होतं. मराठी मातीत संवेदनशील आणि आशयघन सिनेमा करणारे बरे लोक आहेतच पण प्रेक्षकांना थेटरपर्यंत खेचून आणायला जे स्टारडम लागतं, ते स्टारडम हे आपले भाईलोक आणतील. एक दिन आयेगा जब पिक्चर अंकुश चौधरीके नाम पर फुल होगी.
भारतमाताजवळ ऑफिस घेतलं. तिथून जात असताना एक मोठं पोस्टर चढत होतं.. पोस्टर नाही, मोठाला कट आऊट.…

दगडी चाळ

आपल्या अंकुशचा कट आऊट. आणि खाली फॅन्स हार तुरे घेऊन. दगडी चाळ तुफान हिट झाला सांगायला नको. पण त्यावेळी अंकुशचा तो भला थोरला कट आऊट बघताना काय वाटलं सांगता येत नाही… The stardom was here आणि आमच्या अंकुशने ते मिळवलं होतं.. फार मोठी गोष्ट आहे ही…
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा अंकुश!

  • भिडू गुरुदत्त सोनसुरकर

हे ही वाच भिडू-

 

1 Comment
  1. Amit says

    एकदम सही है ,

Leave A Reply

Your email address will not be published.