नाद कुठे करताय? जगातला एकमेव हिंदू शेख अरबी सुलतानांना उधारीवर पैसे द्यायचा

आखाती देशाच्या वाळवंटातले शेख म्हटलं की आठवतं उंटावर बसलेला चार पाच बायका खंडी भर पोरं असलेला उंच तगडा फुल पांढऱ्या पारंपरिक पोषाखातला अल हबीबी अरब माणूस. पूर्वी रानोमाळ भटकत फिरणाऱ्या अरबी टोळ्यांच्या प्रमुखाला शेख म्हणायचे.

वाळवंटात सापडलेल्या तेलामुळे ही शेख मंडळी गब्बर  झाली. उंटावरून थेट लॅम्बोर्गिनीमध्ये ट्रान्सफर झालं. सुनसान अरबस्थानात दुबई सारख्या स्वप्ननगरी उभ्या राहिल्या. खजुराच्या जागी खिशात हिरे मोती घेऊन हिंडणारा शेख जगातला सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असेल हे बघितल्यावरच कळतं. कुठेही गेलं कि शेखांना आदर मिळतो.    

आजही तिथल्या फक्त रॉयल फॅमिलीमधल्या माणसांनाच शेख हि उपाधी मिळते. 

पण याच अरब देशांमध्ये एक हिंदू शेख आहे हे तुम्हाला माहिती आहे काय? हा जगातला एकुलता एक हिंदू शेख आहे एवढंच नाही तर तो एवढा श्रीमंत आहे कि आजही तो तिथल्या सुलतानाला पैसे कर्जाऊ देतो.

त्याच नाव आहे कनकसीभाई खिमजी.  

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा भारतीय हिंदू माणूस कट्टर मुस्लिम अरबी देशातला शेख कसा बनला? सांगतो सगळं व्यवस्थित सांगतो.

त्यासाठी आपल्याला जावे लागेल जवळपास दीडशे वर्षांपूर्वीच्या इतिहासात.

गुजरातच्या कच्छ मांडवी भागातून रामदास ठाकरसी नावाचे एक व्यापारी आपल्या मुलासोबत जहाजात माल भरून नेहमी आखाती देशांमध्ये जायचे. भारतातली मिरची, मसाले, चहा, धान्य यांना अरबी देशात प्रचंड मागणी होती. याचा फायदा हे गुजराती व्यापारी उठवायचे.

रामदास ठाकरसी यांची जहाजे पहिल्यांदा आफ्रिकेतल्या झांझिबारला जायची मग तिथून ओमानची राजधानी मस्कतला यायची. वाटेत प्रत्येक बंदरात थांबून आपल्या जहाजातील माल विकायचा त्यांचा शिरस्ता होता. अरबी देशातल्या व्यापाराच्या सोयीसाठी म्हणून त्यांनी एका ट्रिप वेळी आपल्या सगळ्यात मोठ्या मुलाला ओमानमध्ये ठेवलं. त्याच नाव खिमजी रामदास.

 खिमजी रामदासने तिथे चांगलाच जम बसवला. काही दिवसातच त्याने आपला बाडबिस्तरा ओमानला हलवायचं ठरवलं.

अरब देशात जाऊन राहणारे ते पहिल्या पिढीचे भारतीय.

सुरवातीला तिथल्या लोकांना हे रुचले नाही पण तिथल्या सुलतानाचा वरदहस्त असल्यामुळे कोणी काही करू शकलं नाही. ओमानचा व्यापार वाढावा म्हणून सुलतान या परदेशी व्यापाऱ्यांना आपल्या देशात आमंत्रण देत होता. टिपिकल गुजराती चिवटपणा असल्यामुळे खिमजी रामदास ओमानच्या वाळवंटात टिकले एवढंच नाही तर आपल्या गोड बोलण्यामुळे तिथल्या लोकांचीही मने जिंकून घेतली.

याच खिमजी रामदास यांचा नातू म्हणजे कनकसीभाई खिमजी.

ओमानच्या सगळ्यात मोठ्या म्हणवल्या जाणाऱ्या रामदास ग्रुप ऑफ कंपनीजचे सर्वेसर्वा. त्यांचा जन्म १९३५ साली झाला. कनकसिभाई यांचे शिक्षण मुंबईला झाले. त्याकाळी अजून ओमान देश गरीब होता, आधुनिक शिक्षणाच्या व्यवस्था देखील पोहचल्या नव्हत्या.

खुद्द ओमानचा राजकुमार काबूस बिन सैददेखील भारतात पुण्याला शिकायला होता.

कनकसी भाई यांनी १९७०च्या दशकात वडिलांच्या मृत्यूनंतर कंपनीचा कारभार आपल्या हाती घेतला. साधारण याच वर्षी राजपुत्र काबूस बिन सैद याने वडिलांच्या विरोधात उठाव केला व त्यांना हटवून स्वतः सुलतान बनला.

परदेशात शिकुन आलेला काबूस हा आधुनिक विचारांचा होता. त्याने ओमान मध्ये अनेक सुधारणा आणायला सुरवात केली.यापूर्वी ओमानमध्ये इलेक्ट्रिसिटी, नळाचे पाणी या सुविधा देखील नव्हत्या. वाळवंटातल्या विहिरीवर जाऊन पाणी भरून आणावे लागायचे. काबूसने हे सगळं चित्र बदललं.

या कामी त्याच्या मदतीला आले कनकसीभाई खिमजी.

दोघेही तरुण होते, विचार जुळत होते. शिवाय खिमजी कुटुंब पूर्वीपासून ओमानच्या राजघराण्याशी प्रामाणिक होते. या दोघांनी मिळून ओमान मध्ये अनेक उद्योग उभे केले. सुलतान काबूसने ओमान मध्ये वीज आणली, नवे बंदर बनवले. भारतीय रुपया हटवून ओमानी रुपयाला आपले चलन बनवले.

कनकसी भाई खिमजी  यांचा उपयोग त्याने देशातील पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी केला. त्यांना आपली एक महागडी बोट भेट दिली.

खिमजी यांच्या कंपनीने अनेक हॉटेल्स उभे केले, मोठमोठे कंज्यूमर प्रोडक्स, लाइफ स्टाइल, इंफ्राक्टक्चर प्रोजेक्ट्स आणि लॉजिस्टक्सच्या ४००हुन अधिक टॉप ग्लोबल ब्रॅण्ड्स बरोबर पार्टनरशिप केली. आपल्या क्वालिटी प्रोडक्ट्स मुळे खिमजी रामदास कंपनीने संपूर्ण आखाती देशात नाव कमावलं .

सत्तेत आल्यावर काही वर्षातच सुलतान काबूसने त्यांना ओमानची नागरिकता दिली. पहिल्यांदाच एक भारतीय व्यक्ती ओमानचा नागरिक बनला. 

तेलाचा पैसे ओमानमध्ये येऊ लागल्यावर त्याचा फायदा पक्क्या गुजराती असणाऱ्या खिमजीभाईंनी उचलला यात कोणतेही आश्चर्य वाटायला नको.त्यांची कंपनी अब्जावधी रुपयांची बनली. खिमजींनी एवढा पैसे कमावला की वेळ पडली तर ओमानचा सुलतान देखील त्यांच्याकडून उधार घेऊ लागला. ओमानमध्ये अनेक शाळा व विद्यापीठे सुरु करण्यातहि खिमजी रामदास कंपनीचा मोठा वाटा आहे. त्यांच्या आधारामुळे अनेक भारतीय ओमानला येऊन राहिले.

त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून सुलतान काबूसने त्यांना शेख हि पदवी दिली. यामुळे संपूर्ण जगातले ते एकमेव हिंदू शेख बनले.

आजही ही कंपनी फक्त ओमानच नाही तर संपूर्ण आखाती देशांमधली सर्वात मोठ्या कंपनीपैकी एक आहे आणि ८४ वर्षांचे कनकसीभाई तिथले सर्वात श्रीमंत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमानला भेट दिली तेव्हा कनकसीभाई यांची खास भेट घेतली होती. हजारो भारतीय तरुणांना आखाती देशात रोजगाराची संधी मिळवून देणारे कनकसीभाई यांना २००३ साली सरकारचा प्रवासी भारतीय सन्मान हा सर्वोच्च अवॉर्डदेखील मिळाला.

क्रिकेटवेड्या खिमजी यांनी ओमानमध्ये हा खेळ रुजवण्याचा प्रयत्न देखील केला.

तिथल्या क्रिकेटबोर्डचे ते चेअरमन देखील आहेत. भारत पाकिस्तान व ओमान वंशातील मुलांना घेऊन ओमानची राष्ट्रीय टीम बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आजही सुरु आहे. क्रिकेटच्या प्रसारासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना आयसीसीने लाईफ टाइम सर्व्हिस अवॉर्ड देखील दिला आहे.

फक्त आपलं गाव, आपला भाग, आपला देश यात अडकून न पडता धाडस करून क्षितिज विस्तारलं तर जगातलं सगळं यश मिळवता येते याच उदाहरण म्हणजे कनकसीभाई खिमजी.     

हे हि वाच भिडू.

 

3 Comments
  1. Chandrakant Mahajan says

    Very interesting information about Hindu Shaikh.👍👍👍👌👌👌

  2. kailas says

    प्रशसनीय व्यक्तिमत्व 🙏

  3. Mangesh says

    नुकतच या शेखच निधन झाल आहे😔

Leave A Reply

Your email address will not be published.