सचिनची बॅटिंगमध्ये होणारी चूक फक्त त्या वेटरला माहिती होती….
सचिन तेंडुलकरची बॅटिंग बघणं म्हणजे शास्त्रशुद्ध खेळ काय असतो याची पर्वणीच. त्याने मारलेला स्ट्रेट ड्राइव्ह हा लुपवर लावून आजही लोकं आवडीने बघतात. अनेक विक्रम स्वतःच्या नावावर सचिनने नोंदवले आहे. जगभरात त्याचे पसरलेले चाहते , तो बॅटिंगला आल्यानंतर होणार टाळ्यांचा कडकडाट हे केवळ सचिनसाठी होतं.
सचिनबद्दलचा आजचा किस्सा, एका वेटरने त्याला त्याच्या खेळण्यातली कमी दाखवून दिली तेव्हापासून सचिनने त्या वेटरची हि टीप लक्षात ठेवून बॅटिंगमध्ये सुधारणा केली.
सचिनला सराव करताना बघितल तर किती श्रद्धेने आणि निष्ठने तो क्रिकेट खेळतो हे आपल्याला कळतं. अगदी भर पावसात केलेली त्याची प्रॅक्टिस असो किंवा डोळ्याला पट्टी बांधून त्याने केलेला सराव असो अश्या या क्रिकेटच्या देवाला एका वेटरने मोलाची टीप दिली जी सचिनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत कायम वापरली.
गोष्ट आहे २००१ सालची. भारत ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीज सुरु होती. गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम फुल फॉर्ममध्ये होती. आपण कलकत्त्याच्या कसोटीत लक्ष्मण आणि द्रविडच्या बॅटिंगच्या जोरावर फॉलो ऑन मिळूनही ऐतिहासिक विजय मिळवला होता. संपूर्ण क्रिकेट जगतात याची चर्चा सुरु होती. फक्त अजून भारताचा मुख्य बॅट्समन सचिन तेंडुलकर आपल्या खऱ्या फॉर्म मध्ये आला नव्हता.
पुढची मॅच चेन्नईला होती. भारतीय टीम तिथल्या ताज हॉटेलमध्ये उतरली होती. सचिन आपल्या खराब फॉर्ममुळे बऱ्यापैकी चिंतेत होता. एके संध्याकाळी त्याने रिसेप्शनला फोन करून कॉफी ऑर्डर केली. वेटरने कॉफी आणुन दिली आणि तो जरावेळ तिथेच घुटमळत राहिला. शेवटी धाडस करून त्याने सचिनला विचारलं,
मला तुमच्याशी क्रिकेटवर थोडं बोलायचं आहे, तुमची हरकत नसेल तर तुम्हाला चालेल का ? सचिननंही त्याला होकार दर्शवला.
त्यावेळी तो वेटर म्हणाला,
जेव्हा खेळताना तुम्ही जो आर्म गार्ड वापरता ना त्यामुळे तुमच्या बॅटचा स्विंग चुकीचा जातो. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, तुमची बॅटिंग मी रिपीट करून बऱ्याच वेळा बघतो. बॅटिंग करतेवेळी तुम्ही कशा प्रकारे खेळला तो बॉल मी प्रत्येकवेळी लक्ष देऊन बघतो. पण तुमच्या या आर्म गार्डमुळे बॅटचा स्विंग जरासा इकडेतिकडे जातो.
यावर सचिन म्हणाला,
तू जगातला पहिला माणूस आहेस ज्याच्या हे लक्षात आलं. कोणालाच हि गोष्ट माहीती नव्हती, मलाही असं बराच काळ वाटत होतं कि मी बॅटिंग करतेवेळी बॅटच्या स्वीन्गची काहीतरी गडबड आहे. खूप महत्वाची चूक तू माझ्या लक्षात आणून दिलीस.
कुठलाही कमीपणा न बाळगता सचिन तेंडुलकरने त्या वेटरने सुचवलेल्या गोष्टीचं स्वागत केलं. या घटनेनंतर सचिनने खेळून आल्यानंतर आपल्या क्रिकेट किटमधील एल्बो गार्ड बाहेर काढले आणि त्याला नव्याने डिझाईन केले. बॅटचा स्विंग चुकणार नाही वा हलणार नाही अशा प्रकारे सचिनने एल्बो गार्ड पुन्हा व्यवस्थित तयार करून घेतले.
२००१ सालच्या भारत ऑस्ट्रेलिया सिरीज मधल्या त्या चेन्नई मॅचमध्ये सचिनने धुव्वाधार शतक ठोकल. त्याचा फॉर्म परत आला.
सचिनला त्या वेटरबद्दल कायम कौतुक वाटत राहिलं कि जगभरात क्रिकेटवर बोलणारे, लिहिणारे, खेळण्याची शैली कशी असावी यावर चर्चा करणाऱ्या लोकांपैकी कुणाच्याही हि चूक लक्षात आली नाही ती केवळ या वेटरला माहिती होती.
पुढे सचिनने या संदर्भात ट्विट केले होते आणि तो वेटर परत कधी भेटेल असा प्रश्नही विचारला होता. यावर ताज हॉटेलच्या लोकांनी या घटनेची दखल घेत त्यावेळी सचिन हॉटेलमध्ये आल्याचा फोटो त्यांनी त्यांच्या अधिकृत अकाउंट वरून शेअर केला होता.
या वेटरचं नाव होतं गुरुप्रसाद. खरं तर ती घटना घडली तेव्हा तो वेटर नव्हता तर सिक्युरिटी गार्ड होता. क्रिकेटचं भयंकर वेड असलेला हा गडी सचिनचा वेडा फॅन होता. तेंडुलकरच्या सगळ्या मॅचेस त्याने रिपीट मोडवर पाहिल्या होत्या.
त्याच क्रिकेटचं नॉलेज हा खेळ भारतीय लोकांमध्ये किती खोलवर रुजलं आहे याचाच हा प्रत्यय म्हणावा लागेल.
हे हि वाच भिडू :
- वाईट संगतीला लागला आणि मुंबईत बॉम्बस्फोट केले, नाही तर तो देखील क्रिकेटचा सचिन असता…
- सचिनची आयडिया कामाला आली आणि द्रविडच्या बॅटिंगने किवी बॉलर्स पिसे काढली…
- सचिनच्या या चुका पाहून वाटतं “तो देव नाही, तुमच्या आमच्या सारखा चुकणारा माणुसच”.
- तो टेरर अटॅक खरं तर सचिन, धोनी आणि द्रविडला किडनॅप करण्यासाठी आखण्यात आला होता.