भाजपला ऑपरेशन लोटस म्हणजे काय असतं हे येडियुरप्पांनी माहित करुन दिलं होतं

अटलबिहारी वाजपेयी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर भाजपने आपल्या राजकारणाची कूस बदलली होती. अशात कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जाहिर झाल्या होत्या. यावेळी प्रचारात ‘ऑपरेशन लोटस’ हा मुद्दा आघाडीवर होता. यामागची प्रमुख संकल्पना होती, घरोघरी जाऊन भाजपच्या धोरणांबद्दल, कामांबद्दल लोकांशी बोलायचं.

मात्र जशी निवडणूक पार पडली तशी या ‘ऑपरेशन लोटस’ मागची संकल्पना बदलली..

त्याला कारण होतं याच विधानसभा निवडणुकांचा निकाल. २२४ सदस्यांचा विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. बहुमताचा आकडा होता ११२+१=११३. मात्र हा आकडा गाठण्यात कोणत्याच पक्षाला यश आलं नव्हतं.

विधानसभेची टॅली काहीशी अशी होती, 

भाजप – ११०
काँग्रेस- ८०
जनता दल (सेक्युलर) – २८
अपक्ष – ६

म्हणजेच भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून उभी राहिली होती, पण स्पष्ट बहुमत नव्हते. हा आकडा गाठण्यासाठी भाजपला अजून ३ आमदारांची कमी होती. मात्र सर्वात मोठा पक्ष या आधारावर सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण मिळालं. भाजपचे राज्यातील दिग्गज नेते येडियुरप्पा यांची पुन्हा एकदा पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली.

पुन्हा एकदा का? कारण त्याआधी १२ नोव्हेंबर २००७ रोजी त्यांनी जनता दलाच्या पाठिंब्यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र खाते वाटपाबाबतच्या वादामुळे जेडीएसने सरकारला पाठिंबा देण्यास नकार दिला आणि अवघ्या ७ दिवसांमध्ये म्हणजे १ नोव्हेंबर २००७ रोजी येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

यावेळी येडियुरप्पा यांनी ६ अपक्षांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं. पण ते ताक देखील फुंकून पिणारे नेते होते. त्यामुळे अपक्षांच्या पाठिंब्यावर मोठी खेळी खेळू शकत नाही याची त्यांना माहिती होती. म्हणून त्यांनी भाजपचीच ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याची तयारी सुरु केली.

याच तयारीला नाव देण्यात आलं  “ऑपरेशन लोटस”

आता ताकद वाढवायची असेल तर विरोधकांपैकीच आमदार फोडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. याला जेडीएसच्या चार आणि कॉंग्रेसच्या तीन आमदारांचा होकार मिळाला. पण जर हे आमदार पक्ष बदलून भाजपमध्ये आले असते तर यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार आमदारकी जाण्याची वेळ आली असती.

त्यामुळेच त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.

यासाठी त्यांना मंत्रिपद आणि मोठे आर्थिक आमिष दाखवण्यात आल्याच्या त्यावेळी प्रचंड चर्चा रंगल्या होत्या. काँग्रेसकडून तर हे स्पष्ट आरोप झाले. पुढे पोटनिवडणुकीत या आमदारांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली. नशिबानं भाजपची आणि येडियुरप्पा यांची साथ दिली.

सातपैकी पाच ठिकाणी भाजपला विजय मिळवता आला.

यानंतर येडियुरप्पा यांच्यामागे आमदारांचे संख्याबळ ११५ झाले, जे भाजपला हवे होते. याच घटनेपासून ऑपरेशन लोटसचा नारळ फुटला होता. भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे दुसऱ्या पक्षातून आमदार फोडून स्वतःच बहुमत वाढवण्यात आलं होतं. मात्र या घटनेमुळे भाजपवर देशभरातून प्रचंड टिका झाली होती.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘मै जोड तोड के राजनीती पे विश्वास नही करता’ या वाक्याची आठवण करून देण्यात येतं होती. सोबतच त्यावेळचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांच्या पाठिंब्याशिवाय हे घडणं शक्य नसल्याचे आरोप देखील विरोधकांकडून करण्यात आले होते. मात्र हे संपूर्ण ‘ऑपरेशन लोटस’ हे येडियुराप्पांनीच घडवून आणलं होतं.

तेव्हा येडियुरप्पा यांनी स्पष्टीकरण दिले कि त्यांना सरकार बनवण्यासाठी मतदान दिले होते, त्यामुळे एक स्थिर सरकार देणं हि त्यांची जबाबदारी होती. त्यामुळे हे पाऊल उचलेले असं म्हणत एक प्रकारे ऑपरेशन लोटसचं समर्थनचं केलं होतं.  

निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर माध्यमांशी बोलताना येडियुरप्पा स्पष्टपणे म्हणाले होते कि, ऑपरेशन लोटस आता इथंच थांबवण्यात येतं आहे. सोबतच सर्व मतदारांचे त्यांनी आभार देखील व्यक्त केले होते. ज्या अपक्षांनी आपल्याला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला होता त्यांना देखील मंत्रिपदाबाबत आश्वस्त करण्यात आलं होतं.

मात्र त्यानंतर २००९ रोजी कर्नाटकच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील ऑपरेशन लोटस राबवण्यात आलं. दुसऱ्या पक्षातून निवडून आलेले उमेदवार राजीनामा देऊन भाजपमध्ये आले आणि सत्तेच्या सोबतीने एक प्रकारे विकास कामात सहभागी झाले होते.

मात्र त्यानंतर पुढे २०१० मध्ये येडियुरप्पा यांचे ग्रह फिरले. २०११ मध्ये त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागला. २५ दिवस तुरुंगात देखील काढावे लागले. बाहेर आल्यानंतर त्यांचं भाजपसोबाबत बिनसलं. त्यामुळे आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पक्षातून बाहेर पडले. 

कर्नाटक जनता पक्ष नावाने नवीन पक्ष बनवला. २०१३ मध्ये निवडणुकीत उतरले तेव्हा याच येडियुरप्पा यांनी ‘ऑपरेशन लोटस’ ला अनैतिक असल्याचं सांगितले आणि यात आपण सहभागी झाल्याबद्दल खेद देखील व्यक्त केला होता.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.